आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पुरंदरे इतिहासकारच; पण..!'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्यामुळे, इतिहास म्हणजे काय, हा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे. राष्ट्राच्या अस्मितेची काही प्रतीकं असतात. या प्रतीकांपासून स्फूर्ती व प्रेरणा घ्यायची असते. त्यासाठी या प्रतीकांकडे डोळसपणे पाहण्याची गरज असते. त्यांचं दैवत बनवायचं नसतं. या प्रतीकांभोवती भावनात्मक कुंपण घालून त्यांची डोळस ओळख करून घेण्याच्या इराद्यानं जवळ जाऊ पाहणा-यांना अटकाव करणं, हा या प्रतीकांच्या नावानं भावनांचा बाजार मांडून आपला स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न असतो.
विद्यमान राजकारणासाठी इतिहासाच्या वापर करण्याच्या प्रवृत्ती प्रबळ बनत गेल्याचा जो अनुभव भारतात गेल्या दोन-तीन दशकांत येत आहे, तो असा भावनांचा बाजार मांडण्याचाच प्रकार आहे.

इतिहासाकडे कसं बघायचं?
घडलेल्या घटनांची सनावळ्यांच्या आधारे केलेली जंत्री म्हणजे इतिहास मानायचा काय? सम्राट, राजे-महाराजे यांच्या पराक्रमाच्या व शौर्याच्या रंजक कथा हा इतिहास मानायचा काय? विशिष्ट काळात जनसमूह काय करीत होते, त्यांचा जीवनव्यवहार कसा होता, काळाच्या ओघात या जनसमूहांच्या जगण्यात काय व कसा फरक झाला, हा इतिहास मानायचा काय? विशिष्ट काळातील लोकापवादाच्या आधारे एखाद्या व्यक्तीवर केलेलं लिखाण हा इतिहास मानायचा काय? त्या त्या काळातील पोवाडे, कीर्तनं, भारुडं इत्यादी लोककलांचा मागोवा घेत केलेलं लिखाण हा इतिहास ठरू शकतो काय? या सा-या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशीच आहेत. ऐतिहासिक लिखाणाच्या या वेगवेगळ्या छटा आहेत. यापैकी प्रत्येक छटेचं स्वतःचं असं वेगळेपण आहे आणि त्या प्रत्येक छटेच्या विशिष्ट अशा मर्यादाही आहेत. यापैकी कोणता प्रकार निवडायचा, याचं स्वातंत्र्य ऐतिहासिक लिखाण करू पाहणा-याला असतं, निदान असायला हवं. मात्र, आपण जो प्रकार निवडला आहे, त्याच्या मर्यादा असं लिखाण करू पाहणा-यानं कायम लक्षात ठेवायला हव्यात आणि ‘मी सांगतो तोच खरा इतिहास’, असा पवित्रा घेणं टाळलं पाहिजे. लेखकाची दृष्टी निरपेक्ष व तटस्थ असणं आणि कोणतीही ऐतिहासिक घटना वा व्यक्ती यांचा मागोवा त्या काळाच्या संदर्भात घेण्याचा कटाक्ष ठेवणं, ही त्याच्या लिखाणाच्या विश्वासार्हतेची कसोटी असते.
ऐतिहासिक घटना, प्रसंग, व्यक्ती, जनसमूह यांच्याबद्दलचं लेखकाचं विश्लेषण त्याच्या दृष्टिकोनानुसार ठरेल. पण आपल्या दृष्टिकोनाची गरज म्हणून लेखकानं पुराव्यानिशी दिसत असलेल्या ऐतिहासिक वस्तुस्थितीचा विपर्यास जसा करता कामा नये, तसंच त्यानं नसलेले पुरावे उभेही करता कामा नयेत.

या पार्श्वभूमीवर बाबासाहेब पुरंदरे इतिहासकार आहेत की नाहीत?
...तर निश्चितच आहेत. शिवकालीन घटना व प्रसंग आणि शिवाजीराजे यांचं जीवन यांची सांगड रंजकरीत्या घालून त्यांनी ती कथा वाचकांपुढे मांडली. त्या अर्थानं पुरंदरे यांनी शिवचरित्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवलं, हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा खरा आहे. मात्र पुरंदरे यांनी सांगितलेल्या शिवचरित्रापलीकडे बराच मोठा गुंतागुंतीचा शिवकालीन घटनापट आहे. तो त्यांनी लक्षात घेतलेला नाही. अर्थात त्यांना जसा शिवाजी दिसला, तसा त्यांनी तो रंजकरीत्या मांडला, लोकांना तो भावला, असं म्हणायला हरकत नाही. याच निकषावर जेम्स लेननं जे लिहिलं, तोही इतिहासच होता. शिवाजीराजांना हिंदू समाजात एखाद्या आराध्यदैवताचं स्थान का मिळालं आहे, या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा लेनचा प्रयत्न होता. त्याचं विश्लेषण कोणाला पटणार नाही, रुचणार नाही, त्यानं दिलेल्या घटना वा प्रसंग वा लोकापवादानं अनेकांची माथी भडकतीलही. पण लेननं एक विशिष्ट चौकट आखून हे लिखाण केलं होतं. म्हणूनच पुरंदरे जसं रंजकरीत्या शिवचरित्र लिहितात, तसंच लेननं एक वेगळा लेखनप्रकार निवडला
एवढंच. पण आपण लेनवर तुटून पडलो आणि गंमत म्हणजे लेनवर तुटून पडणारेच आज पुरंदरे इतिहासकार नाहीतच, असं म्हणत आहेत. राष्ट्रीय प्रतीकांकडे कसं डोळसपणे बघायला हवं, हे अमेरिकेचं उदाहरण दाखवून देतं. थॉमस जेफरसन हा अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक.
कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीशी त्याचे कसे शरीरसंबंध होते व त्यापासून त्याला कशी व किती मुलं झाली, याचा तपशील एका चरित्रात प्रसिद्ध झाला. पण जेफरसनच्या काळाच्या संदर्भातच त्याकडं बघितलं गेलं. वादळ वगैरे सोडाच, विरोधाच्या वा-याची झुळूकही आली नाही.
आपल्याकडे असं घडत नाही; कारण आजच्या राजकारणासाठी शिवाजीराजांचा उपयोग करून घ्यायचा असतो.

वाद होत राहतो, तो नेमका शिवाजीराजांकडे कसं पाहायचं, याच मुद्द्यावर. ते ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ होते? मुस्लिमांचे कर्दनकाळ होते? हिंदुपदपातशाहीचे संस्थापक होते? जाणते राजे होते? शिवाजीराजे खरे कोण होते? शिवाजीराजांचा काळ हा सरंजामीचा होता. ते त्या काळाचं अपत्य होते. त्यामुळं त्यांना त्या काळाच्या चौकटीतच बघायला हवं. त्यांचं जीवन या
चौकटीनं बांधलेलं होतं, हे कधीच विसरता कामा नये. तरीही त्या काळातील इतर सुभेदार, राजे-महाराजे यांच्यापेक्षा शिवाजीराजांचं वेगळेपण ठसतं; कारण ते आपल्या काळाच्या पुढचं पाहत होतं. प्रशासकीय व महसुली व्यवहार यांबाबत त्यांनी नव्या पद्धती बसवल्या. संरक्षणाच्या दृष्टीनं असलेलं समुद्राचं महत्त्व त्यांनी जाणलं. निरपेक्ष न्यायाची व्यवस्था बसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून आपला मुलगा संभाजी यालाही तुरुंगात ठेवण्यास
त्यांनी मागंपुढं पाहिलं नाही. शिवाजीराजांचं मोठेपण व वेगळेपण आहे, ते अशा त्यांच्या कारभार पद्धतीत.

शिवाजीराजांचा ‘महाराष्ट्र’ हा सध्याच्या दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपुरताच मर्यादित होता. ‘हिंदुपदपातशाहीचे संस्थापक’ वगैरे बिरुदं त्यांना चिकटवणं, ते रामदासांकडे गेले की तुकारामांकडे हा वाद घालणं; दादोजी कोंडदेव त्यांचे गुरू होते की नाही, यावरून रण माजवणं हे अनैतिहासिक आहे. शहाजीराजे मुस्लिम राज्यकर्त्यांचे सुभेदार होते. आपल्या मुलाला पत्नीसह स्वप्रदेशात परत पाठवताना त्यांनी सोबत या दोघांची जबाबदारी घेण्यासाठी विश्वासू असा माणूस पाठवला इतकीच दादोजी कोंडदेव यांची शिवाजीराजांच्या आयुष्यातील भूमिका होती. पण ते वादाचा मुद्दा ठरतात. कारण आजच्या राजकीय उद्दिष्टांसाठी समाजातील विविध गट प्रतीकांच्या शोधात असतात आणि त्यापैकी काहींना परस्परविरोधी कारणांसाठी
शिवाजीराजे हे आपलेच, असं दाखवायचं असतं. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय हा वादाचा विषय ठरतो.
prakaaaa@gmail.com