आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Prakash Bal About Policy Of BJP Government

जनकौलाचा संघाकडून विस्कोट? (प्रकाश बाळ)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मूडीज’ असो किंवा डॉ. रघुराम राजन व नारायण मूर्ती हे मान्यवर असोत, त्यांची सारी बौद्धिक जडणघडण ही उदारमतवादी विचाराविश्वात झाली आहे. ‘स्वातंत्र्य’ हा या उदारमतवादाचा गाभा आहे. मोदी हे ‘स्वातंत्र्य’ अबाधित राखत विकास घडवून आणतील, अशी जी अपेक्षा ठेवून त्यांना पाठिंबा दिला जात होता, तसं घडताना दिसत नाही, म्हणून ही चिंता बोलून दाखवली जात आहे.

‘दैव देतं आणि कर्म नेतं’, अशी भाजपची व एकूणच संघ परिवाराची परिस्थिती होणार की काय, ही शंका येण्याजोग्या घटना सध्या घडत आहेत.
मोदी यांनी दाखवलेल्या‘अच्छे दिन’च्या स्वप्नामुळे मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवून त्यांच्या हाती सत्ता दिली. प्रत्यक्षात वर्ष उलटायच्या आतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खायचे दात जनतेला दिसू लागले. त्यानं चलबिचल सुरू झाली. पण ‘मोदी हे सहन करणार नाहीत, ते या मंडळींना गप्प बसवतील’, अशी सर्वसाधारणतः अपेक्षा होती. तीही पुरी होताना दिसली नाही. ‘मोदी विकास करतील, हिंदू अजेंडा राबवणार नाहीत’, अशा विश्वासानं ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यांचा भ्रमनिरास होण्यास सुरुवात झाली.

...आणि मग अनेक साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ इत्यादींनी या प्रकारांच्या निषेधार्थ त्यांना मिळालेले पुरस्कार परत करण्याचं पाऊल उचललं. हे वारं पसरत गेलं. ‘मोदी यांच्याबद्दलचा पोटशूळ असल्यानं असं करण्यात येत आहे, ही डावी मंडळी आहे व त्यांची दुकानं आता बंद झाल्यानं ते असा विरोध करत आहेत’, अशा आशयाचे आरोप भाजप नेते करू लागले. मात्र, गेल्या आठवड्यात ‘मूडीज’ ही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डॉ. रघुराम राजन आणि ‘इन्फोसिस’चे प्रणेते नारायण मूर्ती अशा तिघांनी एकाच वेळेस भारतातील सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली. असं वातावरण राहिल्यास आर्थिक विकासाला त्याचा फटका बसेल, असा गंभीर इशारा डॉ. राजन व नारायण मूर्ती यांच्या जोडीनं ‘मूडीज’ या संस्थेच्या अहवालातही देण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर भारतातील अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत आहे, असं मत नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं आहे.

मोदी यांच्या विकासाच्या पवित्र्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही मतं आहेत. ‘मूडीज’ किंवा डॉ. राजन व नारायण मूर्ती हे काही भाजप विरोधक नाहीत. उलट मोदी यांच्या विकासाच्या ‘मॉडेल’चा पाठपुरावा करणारेच हे तज्ज्ञ आहेत. ‘मूडीज’नं तर मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत कसा जगात आघाडीवर राहू शकतो, हे गेल्या वर्ष- दीड वर्षात कायम सांगितलं आहे. आज ही संस्था आणि डॉ. राजन व नारायण मूर्ती अशी मतं व्यक्त करीत आहेत; कारण ‘मूडीज’ असो किंवा वित्तीय व उद्योग जगतातील हे दोघं मान्यवर असोत, त्याची सारी बौद्धिक जडणघडण ही उदारमतवादी विचारविश्वात झाली आहे. ‘स्वातंत्र्य’ हा या उदारमतवादाचा गाभा आहे. मोदी हे ‘स्वातंत्र्य’ अबाधित राखत विकास घडवून आणतील, अशी जी अपेक्षा ठेवून त्यांना पाठिंबा दिला जात होता, तसं घडताना दिसत नाही, म्हणून ही चिंता बोलून दाखवली जात आहे. मात्र, संघ परिवाराची विचारसरणी व कार्यपद्धती यांत ‘स्वातंत्र्या’ला कोठेच वाव नव्हता व आजही नाही. ही विचारसरणी एकचालकानुवर्ती तत्त्वानुसार चालणारी आहे. मोदी हे संघाचे प्रचारक प्रथम आहेत आणि नंतर भारताचे पंतप्रधान. त्यामुळे त्यांचा पिंडच या विचारांवर पोसला गेला आहे अाणि त्यांचं व्यक्तिमत्त्व या कार्यपद्धतीच्या चौकटीतच घडलं आहे. साहजिकच उदारमतवादाचा गाभा असलेल्या ‘स्वातंत्र्या’चं मोदी यांना वावडंच आहे. फक्त सत्ता हाती येण्यासाठी डावपेचांच्या स्तरावर त्यांना भारताची राज्यघटना हा ‘स्वतःचा धर्म’ वाटला आणि त्यांनी संसदेच्या इमारतीच्या पायरीवर डोकं ठेवलं. मोदी यांनी ‘विकासा’चं स्वप्न दाखवत राज्यकारभार करायचा आणि ‘हिंदू राष्ट्रा’च्या उद्देशाकडं वाटचाल करण्याच्या दिशेनं सांस्कृतिक व सामाजिक आघाड्यांवर ठोस पावलं संघानं टाकायची, अशी ही ‘कामाची विभागणी’ झाली होती. संघ ज्यांना ठाऊक आहे, त्या भारतातील अनेक विश्लेषकांनी या वस्तुस्थितीवर २०१४च्या निवडणुकीनंतर नेमकं बोट ठेवलं होतं. पण ते दिवस उत्साहाचे, स्वप्न बघण्याचे, ती प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा ठेवण्याचे होते. केवळ भारताच नव्हे, तर जगभर मोदी यांच्याकडं याच दृष्टीनं बघितलं जात होतं. संघ कसाही असेल, पण मोदी असे नाहीत, हा विश्वास होता. आता तो विश्वास विरत चालला आहे, हे ‘मूडीज’चा अहवाल आणि डॉ. राजन व नारायण मूर्ती यांचं मतप्रदर्शन दर्शवतं. त्याचबरोबर सध्या घडणाऱ्या घटना म्हणजे संघ व मोदी यांच्यात ‘कामाची’ अशी ‘विभागणी’ झाली असल्याच्या निदर्शक आहेत, असं विश्लेषण अमेरिकेतील एका विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले मान्यवर राजकीय विश्लेषक डॉ. आशुतोष वार्शने यांनी गेल्या पंधरवड्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मधील आपल्या लेखात केले आहे. आज डॉ. राजन, नारायण मूर्ती किंवा ‘मूडीज’सारख्या संस्थेला जी भीती वाटत आहे, त्यामागची कारणमीमांसा डॉ. वार्शने यांच्या या लेखात आहे.

मोदी यांना जो विकास करायचा आहे, त्यासाठी भांडवल व तंत्रज्ञान पाश्चिमात्य देशांकडून घ्यावं लागणार आहे. ‘अशा प्रकारच्या असहिष्णू वातवरणामुळे मोदी सरकारच्या विश्वासार्हतेला धक्का बसेल’, असं ‘मूडीज’ आपल्या अहवालात म्हणत असेल, तर हे भांडवल व तंत्रज्ञान मिळेल कसं? मग ‘मेक इन इंडिया’ घडेल कसं? साहजिकच बेरोजगारीला आळा बसणार नाही. गरिबी व विषमता कमी होणार नाही. अशा परिस्थितीत ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषण अमलात येणार नाही. या पार्श्वभूमीवर २०१९च्या निवडणुका आल्या की, २०१४ची ‘अबकी बार मोदी सरकार’ ही घोष्णा मतदारांच्या दृष्टीनं ‘अब क्यूं व्होट देंगे मोदी सरकार को’ अशी बदलणारच नाही, ही हमी कोणी देईल काय? म्हणूनच मतदारांनी इतक्या विश्वासानं दिलेल्या कौलाचा असा विस्कोट एक- दीड वर्षाच्या आत करण्याची संघाला एवढी घाई का झाली आहे, असा प्रश्न पडतो. निदान डावपेचासाठी तरी पुढील निवडणुकीपर्यंत ‘विकासा’वर भर देत आपलं बस्तान पक्कं बसवायचं आणि नतंर कौल पुन्हा मिळवून ‘हिंदू अजेंडा’ राबवण्याच्या दिशेनं पावलं टाकायची, असा विचार संघानं का केला नाही? ‘गायपुराण’ लावून, अल्पसंख्याकांना लक्ष्य बनवून, वैचारिक विरोधकांवर रोख ठेवून संघ स्वतःच्या पायावर धोंडा का पाडून घेत आहे? भारतीय समाजाचा पोतच उमजला नसल्यानं हे घडत आहे की, ‘स्वातंत्र्य’ हा ‘हिंदुत्वा’च्या चौकटीचा व कार्यपद्धतीचा भागच नसल्यानं, नेते व कार्यकर्ते यांची जडणघडणच ‘मठ्ठ व घट्ट’ या रीतीनं झाल्यानं असं होत आहे?

या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत हे कुतूहल शमणार नाही!

prakaaaa@gmail.com