आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Prakash Bal About Reality Of Nehru And Netaji

परामर्श : नेहरू, नेताजी आणि वास्तव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या महायुद्धात अमेरिकेनं उडी घेतली आणि दोस्त राष्ट्रांचं पारडं जड झालं होतं. त्यामुळे जर्मनी व जपान कधीही पूर्ण विजय मिळवणार नाहीत, हे स्पष्ट झालं होतं. नेताजींची देशभक्ती, निष्ठा, ध्येयवाद यांना दाद देत असतानाच या वास्तवाचं त्यांचं आकलन तोकडं होतं, हे आपण आज मान्य करणार आहोत की नाही?

नेहरू, नेहरू, नेहरू. नुसता गजर प्रसारमाध्यमांतून गेला पंधरवडाभर चालू आहे. नेहरूंना नेताजींविषयी आकस व द्वेष होता; नेताजी परत आले, तर आपल्या सत्तेला आव्हान मिळेल, असं नेहरूंना वाटत होतं, असा धोशा प्रसारमाध्यमं लावत आहेत.

वस्तुस्थिती काय आहे?
नेहरू व नेताजी यांची वैचारिक व व्यक्तिगत स्तरांवर त्या काळातील काँग्रेसमधील कोणत्याही नेत्यांपेक्षा एकमेकाशी जास्त जवळीक होती. पण १९३८ नंतर नेताजींच्या भूमिकांत फरक पडू लागल्यावर त्यांच्याशी नेहरूंचे मतभेद निर्माण झाले. नेताजींची देशभक्ती व ध्येयवाद याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. नेताजींचं व्यक्तिमत्त्व नेहरूंएवढंच उत्तुंग होतं. मतभेद होते, ते स्वातंत्र्यासाठी कोणती रणनीती आखावी याविषयी. हे मतभेद निर्माण झाले तो काळ जगावर युद्धाचं सावट धरलं जाण्याचा होता. फॅसिस्ट विरुद्ध लोकशाही शक्ती असा संघर्ष आकाराला येत होता. अशा वेळी ‘जपान, जर्मनी, इटली या देशांनी काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे; आपल्या देशात काय व्हावं, काय होऊ नये, हे ठरविण्याचा त्यांना हक्क आहे, जगानं त्यांना हे का सांगावं,' असं काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना नेताजी यांनी म्हटलं होतं. ही भूमिका काँग्रेसच्या तोपर्यंतच्या भूमिकेशी विसंगत होती. ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ ही युद्धातील रणनीती अवलंबताना ‘शत्रूचा शत्रू’ कोणत्या विचाराचा आहे व तो त्याच्या देशात काय करतो, याकडं दुर्लक्ष करणं, म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेणारं ठरेल, शेवटी स्वातंत्र्याचा लढा हा लोकशाही मार्गानंच चालला पाहिजे, अशी गांधी, नेहरू व अगदी सरदार पटेल यांचीही भूमिका होती. म्हणूनच नेताजींनी पुन्हा १९३९ मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू नये यासाठी गांधी, नेहरू यांच्यासह पटेल यांनीही प्रयत्न केले होते. या संबंधातील सर्व तपशील नेहरूच्यांप्रमाणं पटेल यांच्याही कागदपत्रांचे व पत्रव्यवहाराचे जे खंड प्रकाशित झाले आहेत, त्यात उपलब्ध आहे. तरीही नेताजी १९३९ मध्ये पुन्हा निवडून आल्यावर म. गांधी यांनी ठाम भूमिका घेतली आणि त्यामुळं नेताजींना अध्यक्षपद सोडावं लागलं. पक्ष त्यांच्या बाजूला असतानाही गांधीजींच्या ‘हुकूमशाही’ वृत्तीमुळं व नेहरू हे महात्माजींच्या प्रभावाखाली असल्यानं हा निर्णय घ्यावा लागला, असं आज साडेआठ दशकांनंतर म्हणणं सोपं आहे, पण अनुचित आहे. येथेच नेतृत्वाच्या दूरदृष्टीचा कस लागतो.

नेताजी जर्मनी, जपान वा इटलीत काय होतं, त्याबाबत अध्यक्षीय भाषणात जे म्हणत होते, त्याचा संदर्भही लक्षात घ्यायला हवा. अलीकडेच ‘इकॉनाॅमिक टाइम्स’ या वृत्तपत्रात जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक बेंजामिन झकारिया यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. नेताजींचे जर्मनीतील नाझी पक्षाशी १९३३ पासून कसे संबंध होते, युरोपातील फॅसिस्ट यूथ लीगशी ते कसे निगडित होते, याचा तपशील त्यांनी दिला आहे. या सगळ्या गोष्टी ब्रिटिशांना माहिती होत्या. तशा त्या गांधी व नेहरू यांनाही माहीत होत्या. यासंबंधीची सर्व माहिती स्वतंत्र भारताच्या हातात आली. त्यामुळं जर नेताजींसंबंधीचे कागदपत्र नष्ट केल्याचा आरोप नेहरूंवर होत असेल, तर त्यामागं नेताजींविषयीची ही माहिती जाहीर होऊन त्यांची प्रतिमा डागाळू नये, असा विचार असू शकतो, असा अंदाज या प्राध्यापकानं वर्तवला आहे.

यावर केवळ ‘फॅसिस्ट’ या शब्दामुळं फसू नका, त्या शक्ती ‘राष्ट्रवादी’ होत्या, असा एक युक्तिवाद अलीकडच्या काळात केला जात आला आहे. प्रत्यक्षात हिटलरची ज्यू वंशविच्छेदाची भूमिका तो १९३३ मध्ये सत्तेवर आल्यावर पहिल्या दोन-तीन वर्षांतच स्पष्ट झाली होती. नेताजी जेव्हा हिटलरला भेटले, तेव्हा तर जर्मनी व जर्मनव्याप्त पोलंड वगैरे ठिकाणी ज्यूंच्या छळछावण्या उभ्याही राहिल्या होत्या.
आणखी एक मुद्दा म्हणजे नेताजी एप्रिल १९४१ मध्ये गुप्तपणे देश सोडून गेले. त्यानंतर दोन महिन्यांनी जून १९४१ मध्ये सोविएत युनियन युद्धात उतरला. त्याच वर्षी नेताजी जर्मनीमार्गे जपानला पाणबुडीनं गेले. त्याच सुमारास ७ डिसेंबर १९४१ ला जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला, म्हणून अमेरिकेनं युद्धात उडी घेतली. युद्ध संपायला आणखी चार वर्षे लागली, पण दोस्त राष्ट्रांचं पारडं जड झालं होतं. जर्मनी व जपान कधीही पूर्ण विजय मिळवणार नाहीत, हे स्पष्ट झालं होतं. नेताजींची देशभक्ती, निष्ठा, ध्येयवाद यांना दाद देत असतानाच या वास्तवाचं त्यांचं आकलन तोकडं होतं, हे आपण आज मान्य करणार आहोत की नाही?

नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवण्याचा जो वाद आहे, तोही वास्तवाकडे डोळेझाक करण्याचा प्रकार आहे. नेताजींनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा वेगळा पक्ष काढला होता. नेताजींचे पुतणे अमिया व शिशिर हे डाव्या राजकारणाशी संबंधित होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तेलंगणात सशस्त्र उठाव झाला होता. अशा परिस्थितीत सर्व डाव्या व जहाल संघटनांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांवर गुप्तहेर खात्याची नजर होती. तशी ती आजही अगदी मोदी वा त्यांच्या आधीच्या काँग्रेसप्रणीत आघाडीच्या सरकारांच्या काळातही आहेच की! तशी ती नसती तर मेधा पाटकर, बाबा आढाव यांच्यापासून इतर अनेक जणांना महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तहेर खात्यानं ‘नक्षलवादी’ ठरवलं नसतं!

असाच प्रकार ब्रिटिश गुप्तहेर खात्याला भारत सरकारनं माहिती पुरवण्याचा आहे. भारतीय गुप्तहेर खात्याचा स्वातंत्र्यानंतर २० वर्षे ‘एमआय 5’ या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेशी संबंध होता. या ‘एमआय 5’चा अधिकृत इतिहास प्रसिद्ध झाला आहे. त्यात या ‘नेताजी व त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती’ देण्याच्या प्रकरणाचा उल्लेख आहे. ही गोष्ट नेहरूंना माहीत असण्याची शक्यता फार कमी आहे, असं हा इतिहास लिहिणा-या लेखकानं आपलं मत नोंदवलं आहे. साम्यवादी शक्तीचं काय चाललं आहे, याविषयीची ही दोन्ही देशांतील गुप्तहेर संघटनांतील देवाणघेवाण होती. हा सगळा तपशील भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेचे माजी उपप्रमुख व २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतरच्या प्रधान आयोगाचे सदस्य व्ही. बालचंद्रन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त लेख लिहून दिला आहे. हे जे काही ऐतिहासिक व विद्यमान वास्तव आहे, त्याचं हेतुतः मिथकात रूपांतर करण्याची संघ परिवाराची रणनीती असल्यानं सध्याचा नेताजी विरुद्ध नेहरू हा वाद उभा राहिला आहे.
prakaaaa@gmail.com