आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावरनंतर भारताचा धोका वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावरमध्ये अतिरेक्यांकडून झालेली शाळकरी मुलांची हत्या हा पाकिस्तानसाठी टर्निंग पॉइंट ठरेल, दहशतवादाचा भस्मासुर उलटल्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते व लष्करी अधिकारी यांना थोडाफार शहाणपणा येईल, त्यांचे डोळे उघडतील, वर्षानुवर्षे राबविलेल्या धोरणातील धोक्यांची त्यांना जाणीव होईल, अशी आशा काही जण व्यक्त करतात. भारताविरुद्ध सुरू असलेल्या दहशतवादी मोहिमांना आळा बसेल, असा निष्कर्ष या आशावादातून काढण्यात येतो.

भविष्याबद्दल आशावादी असणे केव्हाही चांगले. मात्र तो आशावाद वास्तवतेवर आधारित असावा. म्हणजे फसवणूक होत नाही. आशावाद हे केवळ स्वप्नरंजन असले, तर परिस्थितीचे दाहक चटके बसल्यावर नैराश्य येऊ लागते. भारतीयांना नैराश्याच्या दिशेने नेण्याचे बुद्धिमंतांनी टाळले पाहिजे आणि प्रखर वास्तवाला तोंड देण्यासाठी त्यांना तयार केले पाहिजे.

पेशावरसारख्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बदलेल हे शुद्ध स्वप्नरंजन आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत यांच्यातील परस्परसंबंध व भौगोलिक प्रदेश यांची जाण असणारी व्यक्ती असले स्वप्नरंजन करणार नाही. पाकिस्तानला दहशतवादाचे चटके बसत आहेत हे खरे आहे; पण ते आताच बसत नसून गेली अनेक वर्षे बसत आहेत. पेशावर येथे हल्ला करणारी तेहरिक -ए- तालिबान, पाकिस्तान (टीटीपी) ही संघटना २००७ पासून पाकिस्तानी सरकारच्या विविध केंद्रांवर हल्ले करीत आहे. जूनमध्ये या संघटनेने कराची विमानतळावर हल्ला केला व अलीकडे वाघा सीमेवर आत्मघातकी हल्ला केला. या दोन्ही हल्ल्यांत बरेच पाकिस्तानी मारले गेले आहेत.
किंबहुना, कराची विमानतळावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने या संघटनेच्या छुप्या तळांवर अमेरिकी ड्रोन व लष्करी शिपायांची कुमक पाठवून जोरदार हल्ले केले. वझिरिस्तानमध्ये केलेल्या या हल्ल्यांमध्ये चार हजारांहून अधिक स्थानिक नागरिक (यामध्ये कोवळी मुलेही आहेत) मारले गेले. त्याचा बदला म्हणून पेशावरमधील शाळेवर हल्ला झाला.

यातील मुख्य मुद्दा हा की टीटीपी ही संघटना प्रथमपासून पाकिस्तानी लष्कर, तेथील सरकार यांच्याविरोधात आहे. अमेरिकेला मदत करणा-या लोकांविरुद्ध ते उभे राहिले आहेत. पेशावरमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या वझिरिस्तानमधील कारवायांना जोर चढेल. कारण या संघटनेने पाक लष्कराला आव्हान दिले आहे. यामुळे पुढील काळात अनेक दहशतवादी मारले गेल्याच्या बातम्या पाकिस्तानमधून येतील आणि दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पाकिस्तानी लष्करी अधिकारी व राज्यकर्ते सांगतील. आपल्याकडील शांतताप्रेमी मंडळी अशा कारवायांचे दाखले देऊन पाकिस्तानबद्दल मवाळ भूमिका घेण्याचा आग्रह धरतील.

मात्र वस्तुस्थिती वेगळी असेल. पाकिस्तानमध्ये केवळ टीटीपीचे दहशतवादी नाहीत. ओसामा बिन लादेनने हल्ला केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव टाकला व तालिबानविरुद्ध लढण्यास सज्ज होण्याचे फर्मान काढले. मुशर्रफ यांना ते मानावे लागले. कारण तसे केले नसते तर अमेरिका भारताकडून मदत घेईल आणि पाकिस्तान एकटा पडेल, ही धास्ती मुशर्रफना होती. ही भीती वस्तुस्थितीला धरून होती. कारण त्या वेळी भारत व अमेरिका हे कधी नव्हे इतके जवळ आले होते. मात्र, अमेरिकेला साथ देताना दहशतवाद्यांची साथ सुटणार नाही याची दक्षताही मुशर्रफ व पाकिस्तानी आयएसआय या गुप्तचर संघटनेने घेतली. मग अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा असे वेगवेगळे गट तयार झाले.

या प्रत्येक गटाबद्दल पाकिस्तानचे धोरण वेगळे राहिले. अफगाणिस्तानमध्ये पाकला मानणा-या तालिबानची सत्ता असली पाहिजे, भारताला कधीही स्वस्थता मिळता कामा नये या व्यूहरचनेनुसार आयएसआय काम करते. म्हणून काही दहशतवादी गटांवर कारवाया झाल्या तरी भारताला छळणा-या, भारतावर सातत्याने हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांवर कधीही हात उगारला जात नाही. अफगाणिस्तानमध्ये करझाई यांना जगणे नकोसे करणा-या अफगाणी तालिबान्यांबाबतही मवाळ धोरण स्वीकारले जाते. आताही तसेच होईल. टीटीपीवर घणाघाती हल्ले होतील, पण भारताविरुद्ध काम करणा-या दहशतवादी गटांना मोकळे सोडले जाईल. कदाचित त्यांना अधिक कुमक पुरवून मोठे आत्मघातकी हल्ले करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल. भारत व अफगाणिस्तान या दोन्हींकडे अस्थिरता निर्माण करून या पट्ट्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे जनरल झिया यांचे ते स्वप्न होते व पाकिस्तानची प्रत्येक राजवट त्यानुसारच काम करते.

पाकिस्तानला हे शक्य होत आहे ते अमेरिकेच्या नव्या भूमिकेमुळे. अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्यास अमेरिकेने सुरुवात केली आहे. तेथे व्हिएतनामसारखी अवस्था होता कामा नये याची काळजी अमेरिका घेत आहे. पूर्णपणे आपल्या अंकित राहणारी राजवट तेथे आणता येणार नाही हे लक्षात आल्यावर पाकधार्जिण्या तालिबानींना अफगाण सरकारमध्ये सामील करून घेण्याची तयारी अमेरिकेने दाखवली. हे पाकला आवडणारे आहे. अफगाणिस्तानावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. ते होत असेल तर पाकने भारतात कितीही हैदोस घातला तरी अमेरिकेला त्याचे सोयरसुतक नाही.

त्याचबरोबर चीनने येथे शिरकाव केला आहे. चीनच्या सीमेवरील प्रांतामध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी धिंगाणा घातल्यामुळे चीन अस्वस्थ असला तरी पाकला सरळ करणे चीनला जमते. भारताला त्रास देण्याची भूमिका पाक चोख बजावत असेल तर चीन खुश होईल. कारण दक्षिण आशियातील एकमेव शक्ती म्हणून चीनला स्वत:ची ओळख करायची आहे. भारत हा त्यातील मोठा अडसर आहे.

लादेनने २००१ मध्ये अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर भारतासाठी योग्य वातावरण निर्माण झाले होते. आता तसे नाही. उलट परिस्थिती विपरीत होत चालली आहे. याला तोंड देण्यासाठी अंतर्गत सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बरेच डावपेच खेळावे लागतील. अफगाणिस्तानमध्ये निदान जरब राहील इतके अमेरिकी सैन्य ठेवण्यासाठी ओबामा प्रशासनाचे मन वळवावे लागेल. पाकिस्तानमधील अण्वस्त्रे कधीही तालिबानी वा अन्य संघटनांच्या हाती पडतील हा धोका सातत्याने जगाच्या लक्षात आणून द्यावा लागेल. या धास्तीपोटी अमेरिका आपले दल काबूलमध्ये ठेवण्यास तयार होऊ शकेल.

याचबरोबर चीनचे डावपेचही यशस्वी होऊ न देण्याची खेळी खेळावी लागेल. पंतप्रधान मोदी यांनी आशियाई देशांबरोबर, मुख्यत: भारताच्या शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध सुधारण्यास दिलेले प्राधान्य याच दृष्टीने महत्त्वाचे आहे. या राष्ट्रांमध्ये विजेचे कॉमन ग्रीड तयार झाले किंवा कॉमन मार्केट तयार झाले तरी चीनला बराच अटकाव होऊ शकतो. भारताला केंद्रस्थानी ठेवून निर्माण होणारी आशियाची अशी बाजारपेठ ही अमेरिकेसह युरोपलाही मोह पाडण्यास पुरेशी आहे. पाकिस्तान अतिरेकी कारवाया करू शकतो, पण बाजारपेठ देऊ शकत नाही. अतिरेकी कारवायांना तोंड देण्यासाठी सुयोग्य बाजारपेठ हे मोठे अस्त्र आहे. मात्र त्यासाठी देशातील कायदे सुलभ करावे लागतील. पारदर्शी करव्यवस्था लावावी लागेल. भारतात व्यवसाय करणे फायदेशीर आहे, हे जगाला पटवून द्यावे लागेल. तरच गुंतवणूक वाढेल. त्यातून पैसा येईल. या पैशातून लष्कर व पोलिसांचे सामर्थ्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाने वाढविता येईल. अतिरेकी हल्ले झाले तरी त्यातून होणारा विध्वंस कमीत कमी करता येईल. मात्र देशातील व्यावसायिक कायदे बदलण्यासाठी संसदेत कामकाज झाले पाहिजे. तसे ते होण्यासाठी बेजबाबदार विधाने करणा-या आत्मघातकी संसदपटू व नेत्यांना आवर घालावा लागेल.

हे चक्र सर्वांनी समजून घेतले पाहिजे. पेशावरनंतर पाकिस्तानचे डोळे उघडण्याऐवजी ते राष्ट्र आक्रमक होण्याचा संभव अधिक आहे. अमेरिकेला भारताबद्दल अनास्था आहे, चीन विरोधात आहे व देशात भलत्याच विषयांवरून संघर्ष सुरू आहे. या परिस्थितीत अनेक पातळ्यांवर भारताला सज्ज व्हावे लागेल. बाजारपेठ हे त्यातील मुख्य अस्त्र असेल.