आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिध्वनी का नाही? सत्तेशी मोदी जोडले गेले, नेते कारकुनी करतात (प्रशांत दीक्षित )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकारात्मक, सुखद गोष्टी घडत असूनही त्याचे प्रतिध्वनी देशात का उमटत नाहीत, अशी खंत नरेंद्र मोदी यांना आहे. त्याचे उत्तर त्यांच्या कार्यशैलीत दडलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खासदारांची बैठक घेतली व संघाच्या शिरस्त्याप्रमाणे बौद्धिक घेतले. त्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण का केले? हे समजण्यासाठी विशेष कल्पकतेची गरज नाही. राहुल गांधी यांच्या भाषणाकडे वळण्यापूर्वीच लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा खटाटोप होता. मात्र, थेट प्रक्षेपणाची संधी मोदी यांनी फुकट घालविली. भूसंपादन विधेयकातील सुधारणांचा विषय घेऊन त्यांनी काँग्रेसच्या मोहिमेची चिरफाड केली असती तर राहुल यांचा मेळावा निष्प्रभ ठरला असता. मोदींनी या विधेयकाला हात न घालता आपले सरकार गरिबांसाठी किती काम करीत आहे याचे अहवाल वाचन केले. ही संधी हुकली व कमकुवत मुद्दे असूनही राहुल गांधी यांना आपले प्यादे एक घर पुढे सरकवता आले.

तथापि, या खासदार बैठकीत मोदींनी एक खंत व्यक्त केली. ती महत्त्वाची आहे. सरकार इतके काम करीत आहे, निरनिराळ्या योजना कार्यान्वित करीत आहे, गरिबांना थेट फायदा मिळेल अशी धोरणे आखत आहे, परदेशात करारनाम्याची नवी उद्दिष्टे साध्य करीत आहे, परदेशी नेते भारताचे (म्हणजे मोदींचे) कौतुक करीत आहेत, इतक्या साऱ्या सकारात्मक, सुखद गोष्टी घडत असून त्याचे प्रतिध्वनी देशात का उमटत नाहीत, असा सवाल मोदी यांनी खासदारांना केला. इको इफेक्ट क्यूं नहीं दिखता, या त्यांच्या उद््गारात खंत डोकावत होती. सरकार कार्यक्षम असून, गरिबांसाठी निर्णय घेत असूनही हे सरकार श्रीमंतांचे आहे, असा प्रचार होतो, याचे त्यांना वाईट वाटत होते. याबाबत त्यांनी माध्यमांवरही तिरकस शैलीत टीका केली आणि माध्यमांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असेही सुचविले. भाजपबद्दल नकारात्मकच विचार करणाऱ्यांकडून प्रशंसेच्या अपेक्षा करता येणार नाहीत, अशी कबुली त्यांनी दिली. विरोधात जाणाऱ्या या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी कामाचे प्रतिध्वनी का उमटत नाहीत, असा मोदींचा सवाल होता.

त्याला उत्तरही त्यांनीच दिले. सत्ता से हम जुड नहीं पा रहे, असे ते उत्तर होते. सत्तेशी आपण (म्हणजे खासदारांंनी, कार्यकर्त्यांनी) स्वत:ला जोडून घेतलेले नाही. सत्ता हाती असूनही सत्तेपासून आपण दूर आहोत, असे दाखवण्यातच अनेक जण धन्यता मानतात. त्यामुळे केलेल्या कामाचे मुक्तपणे श्रेय घेत नाहीत, असे मोदी यांना म्हणायचे होते. याची कारणे आपल्या डीएनएमध्ये आहेत, असाही युक्तिवाद त्यांनी केला. कित्येक वर्षे विरोधी पक्षात काढल्यामुळे कार्यकर्त्यांची विशिष्ट मानसिकता तयार झाली आहे, त्या विरोधी मानसिकतेतून ते बाहेर पडलेले नाहीत, हे सत्ता आपली न वाटण्याचे एक कारण. याचबरोबर सत्ता ही वाईटच असते, हा मनावर झालेला दृढ संस्कार. यामुळे नेते व कार्यकर्ते हे बचावात्मक भूमिकेत वावरतात आणि सरकारला त्याचा फटका बसतो, असे मोदी यांना सुचवायचे होते.

मोदी यांनी हा वेगळा दृष्टिकोन दिला आहे व त्यामध्ये तथ्यही आहे. सत्ता या जबरदस्त शक्तीबद्दल भारतीय मानसिकतेत परस्परविरोधी प्रवाह जोरकसपणे वाहत असतात. सत्ता प्रत्येकाला हवी असते व सत्ताधाऱ्यांनी कल्याण करावे, अशीही अपेक्षा असते. मात्र, सत्ता सोडणाऱ्याची लोकप्रियता ही सत्ता राबवणाऱ्यापेक्षा अधिक असते. देवाच्या राज्यात सत्तेला महत्त्व नाही, म्हणून सत्ता नको. पण सत्ता असल्याशिवाय जगणे सुलभ होत नाही, म्हणून सत्ता हवी, अशा पेचात भारतीय माणूस सापडलेला असतो. भारतीय माणसाच्या या पेचाचा उपयोग काँग्रेसने फार चतुराईने ६० वर्षे करून घेतला. सत्तेकडे लक्ष ठेवून काम करायचे, सत्ता स्वत:साठी प्रभावीपणे राबवायची, मात्र भाषा कायम सत्ता सोडण्याची ठेवायची, अशा दुहेरी रीतीने काँग्रेस काम करीत राहिली. पक्षाने आधीच महात्मा गांधींवर हक्क प्रस्थापित केला होता व त्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारले, यामुळे सत्ता असूनही सत्तेपासून दूर, अशी प्रतिमा सामान्यजनांच्या मनावर रुजवण्यात काँग्रेसला यश आले.

मोदी वेगळी भूमिका मांडत आहेत. सत्ता राबवण्यासाठीच मी पंतप्रधानपद घेतले आहे व सत्ता राबवूनच देशामध्ये बदल घडवून आणणार आहे, असे ते बजावत आहेत. यात व्यापारी, व्यवहारी बाणा असला तर प्रामाणिकपणाही आहे. सत्ता हवी आहे, असे स्पष्टपणे म्हटल्यामुळे जबाबदारी वाढली. ‘सत्ता नको’ची पळवाट बंद झाली. काम करून दाखवण्याची आवश्यकता आली. जबाबदारी उघड स्वीकारली की रिझल्ट दाखवावेच लागतात. मोदींनी जबाबदारी उघडपणे स्वीकारली आहे. ते काही रिझल्टही दाखवत आहेत; पण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रतिध्वनींची गरज आहे. रिझल्टचे प्रतिध्वनी का उमटत नाहीत याचे उत्तर मोदींच्याच कार्यपद्धतीत आहे. खासदार, नेते व कार्यकर्ते सत्तेशी जोडून घेत नाहीत, कारण त्यांना मोदींनीच तसे जोडून घेतलेले नाही. सर्व कारभार मोदी, जेटली, शहा यांच्या हाती एकवटला आहे. सत्तेशी फक्त मोदी जोडले गेले आहेत व दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे कारकुनी काम अन्य नेत्यांच्या वाट्याला आले . ते रबरी शिक्के झाले आहेत. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना स्थान नाही. त्यांचे मत विचारात घेतले जात नाही.

हाच प्रकार मित्रपक्षासह समाजातील अन्य घटकांबाबत घडतो आहे. कोणालाही बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती मोदींकडे नसल्यामुळे त्यांच्याबद्दल आदर, कौतुक असले तरी आपलेपणा वाटत नाही. संघ परिवारातील अनेक संस्थांना हे सरकार आपले वाटत नाही, कारण त्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग नाही. खुद्द अडवाणी, सुषमा स्वराज अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांना हे सरकार आपले वाटते का, याची शंका असेल तर खासदारांचे काय? समाजातील बुद्धिजीवी वर्गाबरोबर पंतप्रधानांची ऊठबस नसल्यामुळे तो वर्गही सरकारशी स्वत:ला जोडत नाही. हेच अन्य अनेक स्तरांवर होत आहे. मोदींचा जनतेशी थेट संवाद असला तरी तो तात्पुरता व एकमार्गी आहे. जनतेच्या बाजूने तो कधी तुटेल हे सांगता येत नाही. किंबहुना तशी सुरुवातही झाली आहे.

प्रतिध्वनी न उमटण्यामागे भारतीय मानसिकता, माध्यमांचा एकारलेपणा, बुद्धिजीवींतील द्वेषभाव अशा गोष्टींपेक्षाही मोदींची कार्यशैली हे महत्त्वाचे कारण आहे. भाषणातील सर्वसमावेशकता त्यांनी वागणुकीत आणली तर त्यांना प्रतिध्वनी उठताना दिसतील व सरकारचे कामही जनतेपर्यंत पोहोचेल. याबाबत मोदींनी काँग्रेसकडूनही चार-दोन गोष्टी शिकण्याची गरज आहे.
prashant.dixit@dbcorp.in