आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनची चलाखी ओळखा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-चीन यांच्या संबंधांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या चीन दौऱ्यानंतर उदंड चर्चा झाली; पण चीनवर भारताने फार विश्वास ठेवावा अशी परिस्थिती पूर्वीही नव्हती व आताही नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १४ ते १७ मे या कालावधीत चीनचा दौरा झाला. चीनच्या दौऱ्यापूर्वी या दौऱ्याविषयी अगोदरपासूनच भरपूर चर्चा सुरू होती. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि लडाखचा फार मोठा प्रदेश गिळंकृत केला. चीनने आपल्या देशाचा विश्वासघात केला. पारंपरिकदृष्ट्या चीनशी भारताशी कसलेच वाकडे नव्हते. तरीही चीनने कुरापत काढून हिमालयातून भारतात सैन्य घुसवले. भारत-चीनच्या संबंधातील हा अत्यंत ताजा इतिहास आहे. यामुळे नरेंद्र मोदी चीनला निघाले, तेव्हा काय होणार, चीन-भारत संबंध सुधारणा का, व्यापार सुधारणार का, असे अनेक प्रश्न चर्चेला आले. चीन आज जगातील एक महासत्ता आहे. चीनचा भूप्रदेश आणि लोकसंख्या, लष्करी बळ भारतापेक्षा जास्त आहे. चीनच्या आर्थिक विकासाचा दर भारतापेक्षाही फार प्रचंड आहे. भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तान चीनचा परममित्र आहे. अरुणाचल प्रदेश चीनचा आहे, असा चीनचा दावा असतो. पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशात भेटीला गेले असता, चीनने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा चीनचा प्रदेश आहे आणि या प्रदेशात चीनच्या परवानगीशिवाय भारतीय पंतप्रधानांनी जाऊ नये, असे चीनचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा चीनचा दौरा झाला.

विदेश कूटनीतीत चीन कसलेला खेळाडू आहे. आलेल्या पाहुण्यांना कसे प्रसन्न ठेवायचे हे चीनला फार चांगल्या प्रकारे माहीत आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांचा चीन भेटीचा पहिला टप्पा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या गावी ठरविण्यात आला आणि तेथे चीनचे राष्ट्रप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गेले. चीनच्या दृष्टीने भारताचे पंतप्रधान चीनच्या पंतप्रधानांच्या समकक्ष आहेत. राजनैतिक संकेताप्रमाणे (प्रोटोकॉलप्रमाणे) मोदींच्या भेटीसाठी चीनच्या पंतप्रधानांनी जाणे प्रस्तुत ठरले असते, परंतु तसे झाले नाही. खुद्द शी जिनपिंग स्वत: गेले. दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट झाली, दौरे झाले की परस्पर सहकार्याचे काही करार होतात. त्यात काही विशेष बाब नसते. कारण दोन्ही देशांना आपापला राष्ट्रीय स्वार्थ साधायचा असतो. करार करून कोणीही कोणावरही उपकार करीत नाही. चीनने भारतात अब्जावधी डॉलर गुंतवण्याचा करार केला आहे. सैन्यदलामध्ये हॉटलाइन उभी करण्याचे ठरले आहे. भारताने चिनी प्रवाशांना ई-ट्रांझिट व्हिसा देण्याचा करार केलेला आहे. चीनमध्ये नवीन चिनी काॅन्स्युलेट उघडण्याचे ठरले आहे. अशा प्रकारची आर्थिक, तांत्रिक देवाणघेवाण दोन देशांमध्ये सतत चालूच राहते. त्यात काही विशेष घडले आहे, असे मानण्याचे काही कारण नाही.

चीन हा अत्यंत विस्तारवादी आहे. आपल्या सीमेवरील तिबेट त्यांनी केव्हाच घशात घातले आहे. आपले शेजारी देश म्यानमार, सिलोन, इंडोनेशिया यांच्यावर त्याची बारीक नजर असते. आक्रमण करून भूप्रदेश ताब्यात घेणे, असे चीन लगेचच करणार नाही; परंतु त्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट मात्र तो प्रचंड प्रमाणात करील. चीनने शांततेच्या काळातील एक नवीन सिल्करूटचा मार्ग निर्माण केलेला आहे. इंग्रजीत त्याला मॅरिटाइम सिल्क रोड असे म्हणतात. हा समुद्री सिल्क मार्ग आहे. जो चीनपासून सुरू होतो आणि पॅसिफिक व हिंदी महासागरातून अरबी महासागरातून जाऊन आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे घेऊन परत चीनकडे येतो. समुद्रमार्गे व्यापार हा हजारो वर्षांपासून चालूच आहे; परंतु समुद्रातून केवळ वस्तू आणि पदार्थांचा व्यापार होत नाही, समुद्रातून वेगवेगळ्या संकल्पना, महत्त्वाकांक्षा, नवीन प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणण्याची आकांक्षा यांचाही प्रवास होत असतो. चीनने श्रीलंकेमध्ये बंदर बांधण्याचे काम हाती घेतले आहे. पाकिस्तानमध्ये बंदर बांधण्याचे काम पूर्ण करीत आणलेले आहे. या सर्व ठिकाणी चीनचे नाविक तळ उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनचा हा समुद्री सिल्क मार्ग भारतावरती सागरी कडे करण्याचा मार्ग ठरू शकतो. कुठलाही देश आम्ही सैनिकी कामासाठी अशा प्रकारचे मार्ग तयार करीत आहोत, असे म्हणत नसतो. आणि चीन तर असे कधीही म्हणणार नाही; परंतु चीनचा इतिहास लक्षात ठेवला तर असे काही न म्हणता करण्याची चीनची सवय आहे, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही.

चीन आज जागतिक शांतता, विकास, पर्यावरण रक्षण, मानवी अधिकार, दहशतवाद विरोध याची भाषा करत असतो. जागतिक रंगमंचावर स्थान मिळवायचे असेल तर या संकल्पनांवर बोलावे लागते. चीन मानवी अधिकाराच्या बाता करतो, पण चिनी नागरिकांना मानवी अधिकार किती आहेत? चीन दहशतवादाविरुद्ध बाता करतो, मग चीनची मदत भारतातील नक्षलवादी आणि माओवादी यांना का होत असते? चीन पर्यावरणाच्या रक्षणाच्या बाता करतो; जागतिक आकडेवारी सांगते की, सर्वाधिक पर्यावरणाचा ऱ्हास चीनमध्येच होत आहे. चीन जागतिक शांततेच्या बाता करतो, मग दहशतवादाची कर्मभूमी, जन्मभूमी असणाऱ्या पाकिस्तानला चीन सर्व प्रकारे मदत का करतो? जागतिक शांततेचा, मानवतावादाचा चीनने बुरखा पांघरलेला आहे. या बुरख्याआड चिनी ड्रॅगन लपून बसलेला आहे. जागतिक रंगमंचावर दृष्टी टाकली तर असे दिसते की, चीन चिनी युगाच्या संधीची वाट बघत बसला आहे. तो आज कुठल्याही जागतिक संघर्षात सहभागी होत नाही. तो अफगाणिस्तानात नाही, युक्रेनमध्ये नाही, तो वाट बघतो आहे, महासत्ता अमेरिकेच्या कोसळण्याची. महासत्ता रशिया कोसळला. उद्या अमेरिकासुद्धा जागतिक नंबर एकच्या क्रमांकावर राहू शकेल, असे नाही. साम्राज्याचा उदय आणि अस्त हा सूर्याेदयासारखा निसर्गक्रमाने होत असतो. एकेकाळी रोम ही महासत्ता होती, काही काळ इंग्लंड ही महासत्ता राहिली, रशिया आणि अमेरिका यात महासत्तेसाठी चढाओढ सुरू झाली या दोन बैलांच्या टकरीत एक बैल शिंग मोडून पडला आणि दुसरा रक्तबंबाळ झालेला आहे. उद्या अमेरिकेचे महत्त्व कमी-कमी होत गेले की, चीनचे महत्त्व आपोआप वाढत जाणार आहे. तेव्हा चीन कसा वागेल? भारत-चीन संबंध कसे राहतील? हे तेव्हाचा काळ ठरवील; परंतु आपल्याला परिस्थितीवर स्वार व्हायचे असेल तर आर्थिक सामर्थ्याबरोबर सैनिकी सामर्थ्य आणि सैनिकी सामर्थ्याबरोबर एकात्म सामाजिक जीवनाचे सामर्थ्य याला कोणताही पर्याय नाही. हे सामर्थ्य केवळ शासन निर्माण करील, या भ्रमातही आपण राहू नये. ते आपले आपल्याला निर्माण करायला लागेल.

ramesh.patange@gmail.com
बातम्या आणखी आहेत...