आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता परिवाराचे आव्हान, पाय खेचणारे आता हातात हात घालून उभे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालूप्रसाद, मुलायमसिंह, नितीशकुमार, देवेगौडा, ओमप्रकाश चौटाला, शरद यादव यांच्यातील समान धागा म्हणजे हे एकेकाळी जनता पक्षात होते, नंतर जनता दलात होते आणि या दोन्ही पक्षांची वाताहत याच लोकांनी केली.

राजकीय चर्चेत पूर्वी "संघ परिवार' असा शब्दप्रयोग वापरला जायचा. काही काळ संघातही हा शब्दप्रयोग उपयोगात आणला गेला. संघात शब्द आणि त्याचे अर्थ याबद्दल कमालीची जागरूकता असते. परिवार म्हटला की परिवाराचा एक प्रमुख आणि त्याच्या आज्ञेत सर्वांनी राहायचे, असा अर्थ होतो. संघाला ही संकल्पना मान्य नसल्यामुळे संघाने "संघ परिवार' असा शब्दप्रयोग सोडून दिला. या शब्दप्रयोगाची जागा आता "जनता परिवार' या शब्दाने घेतली आहे. या जनता परिवारात समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय लोकदल, जनता दल युनायटेड, जनता दल (सेक्युलर) आणि समाजवादी जनता पार्टी असे सहा पक्ष एकत्र आले आहेत. त्यांचा मुखिया म्हणून मुलायमसिंह यांची निवड करण्यात आली आहे.
एकमेकांचे पाय खेचणारे नेते आता हातात हात घालून उभे आहेत, हे एक आश्चर्यच आहे. असे आश्चर्य घडण्याचे कारणही तसेच आहे. भारतीय जनता पक्षाने वर दिलेल्या सर्व नेत्यांपुढे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुलायमसिंह यादव आणि नितीशकुमार यांच्या पक्षाचा दणदणीत पराभव झाला. बिहारमध्ये पुढल्या वर्षी निवडणुका आहेत. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. या दोन्ही राज्यांत समाजवादी पार्टीला आणि नितीशकुमार यांच्या जनता दलाला भाजपशी टक्कर द्यायची आहे.
"समानशिले व्यसनेषु संख्यम्' म्हणजे समान गुणधर्माचे लोक संकटात एकत्र येतात. लालूप्रसाद, मुलायमसिंह, नितीशकुमार, देवेगौडा, ओमप्रकाश चौटाला, शरद यादव यांच्यातील समान धागा म्हणजे हे एकेकाळी जनता पक्षात होते, नंतर जनता दलात होते आणि या दोन्ही पक्षांची वाताहत याच लोकांनी केली. दुसरा समान गुण म्हणजे यातील प्रत्येक नेता अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. पंतप्रधान बनण्याची यांच्यात सुप्त इच्छा आहे. योगायोगाने देवेगौडा पंतप्रधान झाले होते. पंतप्रधानपद नाही मिळाले तरी प्रदेशातील मुख्यमंत्रिपद किंवा किंगमेकरचे पद प्रत्येकाला हवे आहे. तिसरा यांचा समान गुण म्हणजे हे सर्व नेते स्वत:ला सेक्युलर समजतात. त्यांच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी कम्युनल पार्टी आहे. चौथा समान गुण म्हणजे यातील प्रत्येक नेता जातींचे राजकारण करण्यात अतिशय कुशल आहे. मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांनी यादव अधिक मुस्लिम असे समीकरण बांधलेले आहे. नितीशकुमार यांनी कुर्मी जात आणि महादलित यांचे समीकरण बांधलेले आहे. चौटालांची राजनीती जाट जातींना घेऊन चालते आणि देवेगौडा लिंगायत राजकारणात तज्ज्ञ आहेत. एवढे समान गुण असल्यामुळे या सर्वांना भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्यात काही अडचण पडली नाही.

त्यावर टीका करताना काही जणांनी हा संधिसाधू लोकांचा गट आहे असे म्हटले. परंतु या टीकेचा तसा काही अर्थ नाही. राजकारणात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट निवडून येणे आणि दुसरी गोष्ट एक तर सत्तेवर जाणे किंवा सत्तेच्या जवळ राहणे. या दोन गोष्टी साध्य करण्यासाठी दोन प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. पहिला प्रयत्न सिद्धांत आणि कार्यकर्त्यांच्या आधारावर पक्ष बांधावा लागतो. हा मार्ग अतिलांबचा आहे. त्यासाठी वीस-पंचवीस वर्षे वाट बघावी लागते. दुसरा मार्ग जातींच्या भावना जागवून जातिसमूहात खोटा आशावाद भरावा लागतो, एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभे करावे लागते. हा मार्ग जवळचा समजला जातो. सिद्धांताच्या आधारावर पक्ष बांधण्याचे काम करायला राजकीय नेत्याकडे वेळ नसतो आणि कार्यकर्त्यांकडे तेवढा धीर नसतो. या दुसऱ्या मार्गाने जनता परिवारातील नेते निघाले आहेत. व्ही. पी. सिंग यांच्या मंडल राजकारणाने हा मार्ग प्रशस्त झाला आहे. यासाठी ही संधिसाधूंची युती आहे असे म्हणता येत नाही.
भारताचे राजकारण जातीय आधारावरच चालणार, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारंवार सांगत असत. त्यांच्या ‘स्टेट अँड मायनॉरिटी’ या ग्रंथात आणि ‘कम्युनल डेडलॉक अँड हाऊ टू सॉल्व्ह इट’ या दोन्ही प्रबंधांत याबद्दलची त्यांची मते वाचायला मिळतात. बाबासाहेब म्हणतात, भारतातील राजकीय बहुमत हे इंग्लंडप्रमाणे राजकीय बहुमत नसते, तर ते जातीय बहुमत असते. लोक जातीच्या आधाराने मतदान करतात. राजकीय पक्ष जातींच्या आधाराने उभे राहतात. हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे. हे वास्तव समाजकारणासाठी, राजकारणासाठी आणि अर्थकारणासाठी अतिशय वाईट आहे. त्यामध्ये मूलगामी बदल करणे फार आवश्यक आहे. जातीयवादी राजकारणामुळे जातिअंत होण्याऐवजी जातींची भरभराट होत चालली आहे. समाजकारण मागे पडले आहे. आर्थिक क्षेत्रात काही मूठभर धनिक जाती सर्व देशाच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवून आहेत. ज्या सामाजिक लोकशाहीची आणि आर्थिक लोकशाहीची भाषा डॉ. बाबासाहेब करीत असत ते परिवर्तन अतिशय दूरचे परिवर्तन झाले आहे. यातून मार्ग काढण्याचे काम विचाराच्या आधारे करणाऱ्या पक्षांनी केले पाहिजे. भारतीय जनता पार्टी सिद्धांतावर राजकारण करणारी पार्टी आहे. काँग्रेस पार्टीदेखील सिद्धांतावर आधारित काम करणारी पार्टी आहे. काँग्रेसने अधिकृतरीत्या जातींच्या आधारावर राजकारण करण्याचा पवित्रा घेतलेला नाही. काँग्रेसने नेहमीच सारा देश डोळ्यापुढे ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला जातीयवादी नेता म्हणता येत नाही. त्याच्या जातीचे लोक त्याला आपला मानतात हा भाग वेगळा.
लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गाने अामूलाग्र बदल जी व्यवस्था घडवून आणते तिला लोकशाही म्हणतात, ही डॉ. बाबासाहेबांनी दिलेली व्याख्या आहे. ही व्याख्या प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी अखिल भारतीय दृष्टी, काही सिद्धांत आणि सर्व जनहिताय राजकारण केले पाहिजे. जनता परिवार त्याला पर्याय होऊ शकत नाही. या पर्यायाने नितीशकुमार कदाचित बिहारमध्ये सत्तेवर राहण्यात यशस्वी होतील, परंतु लोकशाही पराभूत होईल. ते होऊ द्यायचे नसेल तर काँग्रेस आणि भाजप यांनी पुनर्विचार केला पाहिजे. दोन्ही पक्षांची युती ही हवेतील कल्पना ठरेल, परंतु युती न करतादेखील काही बाबतीत सहमती निर्माण केली जाऊ शकते. कोणत्याही जातवादी गटांना जवळ करता कामा नये. जनता परिवाराचे जातवादी, स्वार्थी, मतलबी राजकारण की सर्व जनहिताचे राजकारण, असा हा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने राजकीय परिपक्वता दाखवणे आवश्यक आहे.
ramesh.patange@gmail.com
बातम्या आणखी आहेत...