आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचा भरगच्च रोमांच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फार जुनी गोष्ट नाही. अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची. जागतिक क्रिकेटची सूत्रे भारताकडे अजून यायची होती. तेव्हा परकीय संघ भारतात यायला फारसे उत्सुक नसायचे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारख्यांचे संघ आले तरी अनेकदा त्यांचे वरिष्ठ खेळाडू विश्रांती घ्यायचे. नवख्या खेळाडूंना भारत दौऱ्यावर धाडले जायचे. जागतिक क्रिकेटमध्ये भारत प्रबळ झाल्यापासून हे चित्र पुरते बदलले आहे. अनेक दिग्गज खेळाडू वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटशी नाते जोडायला उत्सुक असतात. अगदी ‘आयपीएल’सारख्या काही आठवड्यांच्या उरुसातसुद्धा दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटू प्रशिक्षक, समालोचक, खेळाडू वगैरे म्हणून सहभागी व्हायला धडपडतात. भारतीय क्रिकेटमध्ये आलेला धो-धो पैसा आणि क्रिकेटला भारतात मिळणारे प्रचंड ‘ग्लॅमर’ याची ही किमया आहे.

क्रिकेट भारतात रुजले त्याला आता दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. क्रिकेटच्या सत्ताकारणावर आणि अर्थकारणावर भारताने जशी मजबूत पकड निर्माण केली आहे तितकीच घट्ट पकड भारताने आता क्रिकेटच्या मैदानावरसुद्धा मिळवली आहे. विशेषत: भारतीय फलंदाजांना मात देण्याचे आव्हान जगातील दर्जेदार खेळाडूंपुढे असते.

ऑस्ट्रेलियाला पर्थच्या मैदानात नमवल्याशिवाय एखादा संघ जागतिक दर्जाचा म्हणवला जात नाही. बोचऱ्या वाऱ्यात, ढगाळ हवामानात हवेतच फिरकी घेत येणाऱ्या चेंडूंसमोर भक्कम बचाव करत जोवर एखादा लॉर्ड््सवर शतक ठोकत नाही तोवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. वेस्ट इंडीजमधल्या सबिना पार्कवर छातीचा वेध घेणारे, डोळ्यासमोर अंधारी आणणारे चेंडू निधडेपणाने फटकावल्याखेरीज मोठा फलंदाज बनत नाही. तसेच काहीसे भारताचेही झाले आहे. चेन्नईच्या आखाड्यात किंवा कोलकात्याच्या ईडन गार्डनवर लाख प्रेक्षकांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात भारताला लोळवल्याखेरीज ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला जग जिंकल्यासारखे वाटत नाही.

वन-डे, टी-ट्वेंटीच्या माऱ्यातही कसोटी क्रिकेटची शालीनता टिकून आहे. खेळाडूंचा कस, गुणवत्ता पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्येच दिसते. दिवस-दिवस पाय रोवून उभा ठाकणारा फलंदाज आणि एका-एका विकेटसाठी घाम गाळणारा गोलंदाज पाहण्यासाठी दर्दी प्रेक्षक आजही गर्दी करतात. ‘साडेपाच तास किल्ला लढवला,’ ‘लंचपर्यंत सेंच्युरी’, ‘टी टाइमनंतरच्या सेशनमध्ये चार विकेट खोलल्या’, असला काही थरार अनुभवायचा तर कसोटी क्रिकेटला पर्याय नाही. सनथ जयसूर्या, वीरेंद्र सेहवाग, सईद अन्वर, मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, गिलख्रिस्ट आदी हिंसक फलंदाजांनी नव्वदच्या दशकानंतर कसोटी क्रिकेटचे रुपडेच पालटवले. पहिल्याच दिवसात तीनशे किंवा त्यापेक्षा जास्त धावा फटकावायच्या आणि प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळण्यासाठी आपल्या गोलंदाजांना पुरेसा वेळ द्यायचा. या रणनीतीमुळे एरवी रटाळ ठरणारे कसोटी सामने कमालीचे गतिमान झाले. थरार वाढला. कसोटी सामने निकाली ठरू लागले.

या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेला यंदाचा क्रिकेट मोसम भरगच्च आणि रोमांचक आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे सध्याच्या क्रिकेटमधले सर्वोत्तम संघ भारत दौऱ्यावर येताहेत. विशेष म्हणजे यांच्याविरोधातले कसोटी सामने सर्वाधिक आहेत. आठ एकदिवसीय आणि तीन टी-ट्वेंटीच्या तुलनेत तेरा कसोटी सामन्यांची रंगत क्रिकेटरसिकांना लुटता येईल. मराठी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे मुंबई, नागपूरपाठोपाठ आता पुणेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे.

पुण्याप्रमाणेच राजकोट, विझाग, धर्मशाला, रांची आणि इंदूर या सर्व ‘टायर-टू’ शहरांमध्येही पहिल्यांदाच कसोटी सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय स्वागतार्ह आहे. ‘इंटरनॅशनल व्हेन्यू’ होण्यासाठी पुण्याने खूप संघर्ष केला. पुण्यातील नेहरू स्टेडियम महापालिकेच्या मालकीचे असल्याने आयोजनात नेहमीच अडचणी यायच्या. म्हणून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) अवघ्या दशकभरात गहुंज्याला अद्ययावत स्टेडियम उभे केले. याचे मोठे श्रेय सध्याचे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांच्याकडे जाते. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद या शहरांमध्येही ‘एमसीए’ने अशीच धडाडी दाखवण्याचे मनावर घ्यावे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या क्रिकेटपटूंच्या प्रगतीसाठी या शहरांमध्येही किमान देशांतर्गत क्रिकेटचा थरार तरी पोचला पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...