आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिभावान गणितज्ञ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणितज्ञ जॉन नॅश यांनी वॉन न्यूमन व मॉन्जेस्टरॉन या दोघांच्या ‘गेम थिअरी'मधली अजून पुढची व त्या वेळच्या ज्ञान-विज्ञानाला एकदम अनोखी असलेली वाट शोधून काढली. त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नुकतेच एका अपघातात निधन झाले. नॅश यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा धांडोळा.
प्रख्यात गणितज्ञ व अर्थशास्त्रज्ञ जाॅन फोर्ब्स नॅश यांचा ८७ वा वाढदिवस अगदी जवळ आला होता, म्हणजे येत्या १३ जून रोजी होता. मात्र, त्यांचे व त्यांची पत्नी अॅलिशिया यांचे गेल्या २३ मे रोजी एका अपघातात निधन झाले. १९९६ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या गणितज्ञाचे आयुष्य विलक्षण प्रेरणादायी अाहे. विविध क्षेत्रातल्या अत्यंत उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना गेल्या अनेक वर्षांपासून नोबेल पारितोषिके प्रदान केली जातात. या शास्त्रज्ञांबद्दल आपल्या मनात एक गूढ असते, प्रेम आणि आदरही असतो. त्यांच्या प्रतिभेला व अथक परिश्रम करून या जगातले काही गूढ उकलण्याच्या त्यांच्या ध्यासाला आपण मनोमन सलामच करतो.

जॉन नॅश यांच्या अपघाती निधनाचे वृत्त वाचल्यानंतर मनाला विलक्षण हळहळ वाटली. त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम, आदर हे भाव जितके जॉन यांच्यासाठी मनात दाटून आले तितकेच ते त्यांची पत्नी अॅलिशियासाठीही आले. जॉन नॅश यांच्या जीवनाला अनेक पदर आहेत...त्यांची जीवनकहाणी आहे काहीशी चढ-उतरणीची, बुद्धिमत्तेच्या भरारीचे उंच शिखर गाठणारे संशोधन अवघ्या २२ व्या वर्षी करणाऱ्या एका प्रज्ञावंताची.

जॉन नॅश यांच्या आयुष्याचे गणित ढोबळमानाने तीन टप्प्यांत विभागता येईल १. कुशाग्र बुद्धिमत्तेचा लखलखाट (सन १९५९ पर्यंत) २. १९५९ मध्ये अवघ्या काही आठवड्यांच्या काळात पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा मानसिक विकार झाल्यानंतर झपाटल्यागत जवळजवळ २५ वर्षे वावरलेले नॅश अन््् सर्वात महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे तिसरा, तो म्हणजे गणितज्ञ जॉन नॅश यांचे झालेले पुनरागमन, तेही १९८४-८५च्या दरम्यान.

बुद्धिमत्तेची भरारी
१९५० च्या मे महिन्यात जॉन यांच्या केवळ २७ पानी प्रबंधाला अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाने गणित या विषयातील डॉक्टरेट बहाल केली. जॉन नॅश यांनी त्या वेळी बोलबाला असलेल्या वॉन न्यूमन व मॉन्जेस्टरॉन या दोघांच्या ‘गेम थिअरी'मधली अजून पुढची व त्या वेळच्या ज्ञान-विज्ञानाला एकदम अनोखी असलेली वाट शोधून काढली. या बुद्धीच्या तेजाने तळपत असलेल्या ऐन उमेदीच्या काळात जॉन नॅश यांचे आयुष्य एकदम दिमाखदार होते. १९५७ मध्ये अॅलिशियाशी विवाह, एका मुलाचा जन्म, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन - प्राध्यापकीचे काम, भरपूर प्रसिद्धी व मान इ. सर्व काही देदीप्यमान होते. फाॅर्च्युन मासिकाच्या मुखपृष्ठावर जॉन नॅश यांचे छायाचित्र छापून आले होते व आतल्या पानांमध्ये नव्याने उभरणाऱ्या या गणितज्ञाच्या सिद्धांताचा आधुनिक अर्थकारणावर कसा मोठा परिणाम होईल याची माहिती देणारा लेख होता. नॅश यांना मिळत असलेल्या यशाची सारी गणिते मस्त जुळत होती, गाडी सुसाट होती. पण या सगळ्यामध्ये जॉनच्या दुसऱ्या टप्प्याची पाळेमुळे दडलेली होती. नॅश यांचे विद्यापीठातील इतरांबरोबरचे वागणे काहीसे घमेंडखोर, विक्षिप्त असे. जॉन यांचे अजून एका स्त्रीशी गुप्त प्रेमसंबंध होते. एक मुलगाही झाला होता त्या संबंधातून.

स्किझोफ्रेनियाचा अॅटॅक
१९५९ मध्ये जॉन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया झाला असल्याचे निदान झाले. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दुसरा टप्पा होता. दुभंग व्यक्तिमत्त्व, नसलेले आवाज, शब्द-संदेश आदी ऐकायला येणे ही या विकाराची लक्षणे. जॉन अव्वल दर्जाचे गणिती असल्याने त्यांना त्यांच्या डोक्यामधून येणारे आवाज (हे आवाज शरीरातून येणारे नसतात तर कानाच्या पडद्यावर बाहेरील ध्वनिलहरी आपटल्या की मग आपण अर्थ लावतो त्याचा) जणू एलियन माणसे कूटशब्दातील संदेश देत आहेत असे भास त्यांना व्हायचे. अशा कूटशब्दांबद्दल न्यूजवीक मासिकात बरीच माहिती त्या वेळी छापून येत होती. जॉन यांना गणिताच्या आधारे ते कूटशब्द संदेश उलगडायचे होते. याचा अर्थ स्पष्ट होता की, नॅश यांना त्या वेळी पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया या मानसिक रोगाने पूर्ण ग्रासले होते. त्याच्या परिणामी आयुष्याच्या गणिताची कोडी गहन झाली व जवळपास २५ वर्षे या चुकलेल्या समीकरणांनी जॉन नॅश यांची गणितज्ञ म्हणून असलेली कारकीर्द मंदावली. १९६३ मध्ये अॅलिशियाबरोबरचे लग्न कायदेशीर घटस्फोट होऊन संपले. उत्तम करिअर, नोकरी-एक मुलगा, मुलगी असणारे नॅश त्यांना झालेल्या मनोविकारामुळे चौकटीतल्या आयुष्यातून उठले. अंदाजे पंचवीस वर्षांचा हा कालावधी जाॅनची सगळी गणिते चुकण्याचा व समीकरणे बिघडवण्याचा ठरला; पण या टप्प्यात त्यांना जिवंत ठेवले अॅलिशियाने, त्यांची आई, बहीण व त्यांच्या गणितज्ञ मित्रांनी.

गणितज्ञ जॉनचे पुनरागमन
१९५९ ते १९८५च्या दरम्यान जॉनशी घटस्फोट झाल्यानंतरही सतत साथ देणाऱ्या अॅलिशियाने काही गणिती कामे मिळवून देऊन जॉन यांना त्यांच्या गणितज्ञ मंडळींपासून वेगळे पडू न देण्याने काही फरक झाले. हा त्यांच्या आयुष्यातील तिसरा टप्पा होता. एव्हाना पन्नाशीची चाहूल लागलेल्या जाॅन यांचा स्किझोफ्रेनियाचा त्रास बराच आटोक्यात आला होता. या विकाराच्या काही रुग्णांमध्ये असे होते. जर त्यांना घरच्या मंडळींकडून असलेली नीट देखभाल, समाजाशी जोडलेलं असणं हे सारे स्किझोफ्रेनिया तीव्र असण्याच्या काळात औषधाबरोबरीने मिळाले तर अनेक रुग्ण बऱ्यापैकी सामान्य आयुष्य जगू शकतात, वयपरत्वे विकाराला आटोक्यात ठेवू शकतात, हे सांगणारे अनेक संशोधनात्मक अभ्यास सद्य:स्थितीत झालेले आहेत. जाॅन यांना ‘गेम थिअरी'मधील ‘नॅश संतुलन' या शोधाबद्दल १९९६ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये जाॅन नॅश यांनी म्हटले आहे की, "मी अविवेकी विचार करण्याचे सोडून देऊ शकलो म्हणून परत आलो.' नॅश यांनी जरी जाहीरपणे अॅलिशिया व मित्र परिवाराला सारे श्रेय दिले नसले तरी ती सर्व मंडळी होतीच त्यांच्या चुकणाऱ्या गणिताच्या जागी पुन्हा नवीन आकडेमोड करत नवं गणित मांडायला त्याला बळ देण्यासाठी. हे ऋण तर त्याने नोबेल पारितोषिक स्वीकारताना मान्य केलेच आहे. स्किझोफ्रेनियामुळे मनात वास्तवावर आधारित नसलेले जे विचार येत असत त्यावर नॅश यांनी प्रयत्नपूर्वक मात केली होती. अशी आहे अर्थशास्त्रातील ‘गेम थिअरी'वाल्या जॉन नॅश यांची व त्यांना भक्कम पाठबळ देणारी पत्नी अॅलिशिया या दोघांची विलक्षण कहाणी! एकमेकांना जीव लावणाऱ्या व मृत्यूलाही एकत्र सामोरे गेलेल्या प्रतिभावंत दांपत्याची...

swachar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...