आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिशतकी वेड्यांच्या दुनियेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निव्वळ शतक अनेक जण ठोकतात. निवड समितीच्या डोळ्यात भरायचं तर किमान द्विशतकांचा ध्यास घे, असं सांगत भास्कर पिल्लेने पंतला दिशा दर्शवली.

तो जमाना थोडासा वेगळा होता. भारताच्या घटनेत साऱ्या राज्यभाषांना, म्हणजे मल्याळम- तामीळ- तेलुगू- कन्नड- मराठी- गुजराती- बांगला- अासामी- उडिया- पंजाबी- काश्मिरी इ. भाषांना, हिंदीला समानसा दर्जा दिलेला, थोडासा तरी अमलात आणला जात होता. मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ यांच्या रणजी सामन्यांचे धावते समालोचन, इंग्रजी व हिंदी या तथाकथित राष्ट्रभाषांप्रमाणे मराठीतूनही प्रक्षेपित केलं जायचं. अशाच एका रणजी सामन्यातील समालोचन कक्षातील एक प्रसंग आजही आठवतो.

मुंबईचा कप्तान संजय मांजरेकर ३७७ धावा झळकावून बाद झालेला. आमच्या विनंतीवरून समालोचन कक्षात दाखल झाला. खुर्चीवर आरूढ झाल्यानंतर त्याच्या तोंडातून पहिले सूर बाहेर आले, ते असे : ‘आयला! काय मज्जा आहे तुमची!’

समालोचकांची ‘मज्जा’ आहे, असे त्याला वाटणे स्वाभाविकच होतं. कारण आकाशवाणीचा समालोचन कक्ष, तसेच पत्रकार कक्ष हे आहेत वातानुकूलित आणि संजय नऊ-दहा तास राबला होता. ते मुंबईच्या कुप्रसिद्ध मैदानी उन्हात व उकाड्यात; पण ते कष्ट त्याला थोडेच शिक्षेसारखे वाटले होते? तंत्रशुद्ध फलंदाजी सादर करत राहण्याच्या (अन् करत राहण्याच्या) धुंदीत, तो सारा त्रास त्याला टॉनिकसारखाच. त्रिशतकी वेड्यांची दुनिया न्यारीच खरी!

खरं तर हे शब्दही माझे नाहीत. हे शब्द आहेत दस्तुरखुद्द सुनील गावसकर यांचे. दिवसाचा खेळ संपल्यावर त्रिशतकवीर संजयचा शोध घेत होता फलंदाजांचा बादशहा सुनील. ‘वेडे लोकच त्रिशतकाचा ध्यास घेत असतात!’ म्हणूनच एका वेड्या त्रिशतकवीराला दुसऱ्या वेड्याला भेटायचं होतं, हितगुज साधायचं होतं!

या वेड्यांच्या आठवणी आल्या त्या गेल्या आठवड्यातील तीन त्रिशतकवीरांमुळे. वानखेडेवरील रणजी सामन्यात, महाराष्ट्राचा हंगामी संघनायक स्वप्निल गुगलेच्या नाबाद ३५१ व त्या ओघात अंकित बावणेसह (नाबाद २५८) विक्रमी महा-महाभागीदारी अजिंक्य ५९४ ची. ऑक्टोबरच्या उकाड्यात सतत घामाघूम, सतत पाणी पिण्याची उपाययोजना, सुमारे अठरा-वीस वेळा, घामाने थबथबलेले ग्लव्हज ऊर्फ क्रिकेटचे हातमोजे बदलणं व दर सत्राअखेर ड्रेसिंग रूमसमोरील पट्ट्यात सुकण्यासाठी ठेवणं. दिल्लीच्या ऋषभ पंतचा त्यांना सवाई जबाब. जवळपास चेंडूमागे धाव या वादळी वेगात त्याची झेप ३२६ चेंडूंत ३०८ वर! …आणि त्याच सुमारास पाकिस्तानचा सलामीवीर अझर अलीच्या वेस्ट इंडीजविरुद्ध प्रकाशझोतातील व गुलाबी चेंडूवरील कसोटीत नाबाद ३०२!

स्वप्निल गुगले- अंकित बावणे यांच्या प्रचंड भागीदारीदरम्यान आपसात व असहाय क्षेत्ररक्षकांशी चेष्टामस्करी. ‘तुम्ही बोअर कसे झाला नाहीत? कंटाळलात ना?’ अशी छेड काढली गेली, त्याचे प्रत्युत्तर : ‘अरे वेड्यांनो, फलंदाजी करताना कुणी कंटाळतो, बोअर होतो थोडाच?’ …आणि खेळ संपण्याच्या सुमारास, दणकट बांध्याचा बावणे, दोन धावांचे रूपांतर तीन धावांत करू लागल्यावर दमछाक झालेला २५ वर्षीय गुगले ओरडला, ‘काय चालवलंयस तू? पायात गोळे यायला लागलेत!’ खेळपट्टी निर्जीव, पाटा आहे. ‘आपल्याला बडी धावसंख्या उभारण्याशिवाय गत्यंतर नाही,’ असं ते एकमेकांना समजावत राहिले.

ही जोडी जमलेली असताना यष्टिरक्षक ऋषभ पंत त्यांना डिवचत राहिला. ‘समोरची ड्रेसिंग रूम दिसतेय ना? त्यातल्या पहिल्या पायऱ्यांवर चेंडू भिरकावून देणारा षटकार चढव.’ गुगले-बावणे यांनी काही षटकार जरूर मारले, पण पंतचे आव्हान स्वीकारण्याचा मोह त्यांनी टाळला. तिसऱ्या-चौथ्या दिवशी यष्टिरक्षणाचे पॅड्स उतरवून फलंदाजांचे पॅड्स चढवणाऱ्या पंतने त्यांना लक्ष्यभेद करून दाखवला!

कर्णधार उन्मुक्त चंद व यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत हे, सातत्याच्या शोधात असलेले दिल्लीचे सितारे. दिल्लीचा नवा मार्गदर्शक व गेल्या जमान्यातील भरवशाचा फलंदाज के. पी. भास्कर ऊर्फ भास्कर पिल्ले याने त्यांना अनुभवाचे बोल ऐकवले. दोन वर्षांपूर्वी देशातील उदयोन्मुख खेळाडूंत तुझं नाव सर्वप्रथम घेतले जायचं, आज तू नेमका कुठे आहेस? असं त्यानं उन्मुक्त चंदला छेडलं. ‘गेल्या मोसमात माझी तीन शतकं!’ पुढचा प्रश्न : ‘आणि एकूण धावा?’ अंतर्मुख होत उन्मुक्त चंद म्हणाला, सुमारे साडेचारशे, गुरुजींचा पुढचा प्रश्न : ‘भारतीय संघात या पुरेशा ठरतील?’

मग पाळी पंतची. ‘ओडिशाविरुद्ध दीड शतक झालेलं. मग द्विशतकाचा विचार कसा नाही केलास? निव्वळ शतक अनेक जण ठोकतात. निवड समितीच्या डोळ्यात भरायचं तर किमान द्विशतकांचा ध्यास घे.’ भास्करनी त्याला दिशा दाखवली.’ आणि सीमारेषा सत्तर यार्डांवर असेल, तर शंभर यार्डांवरचे षटकार मारायचे आव्हान स्वीकारलंच पाहिजे का?’

पण डावखुऱ्या पंतचे हीरो डावरा अॅडम गिलख्रिस्ट व वीरू सेहवाग. षटकारांवर त्याची हुकूमत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून त्याचे ४२ चौके, ९ षटकार! सेहवागने पाठ थोपटली, पंत (पँट) तू तर गोलंदाजांची पँट उतरवलीस आणि गुरू भास्करांचा उपदेश ध्यानात ठेवून शतकात तृप्ती मानली नाही!

जाता जाता एक इशारा
पंत-गुगले यांची त्रिशतके अभिनंदनीय; पण पाटा खेळपट्ट्यांवर, सुमार दर्जाच्या गोलंदाजांसमोर, त्रिवार जीवदानांच्या आधारे. ती अविस्मरणीय कमी अन् विस्मरणीय अधिक!
बातम्या आणखी आहेत...