आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याचे रूपांतर "स्वच्छ' पैशात (अर्थपूर्ण)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील काळा पैसा बाहेर आल्याशिवाय विकास खऱ्या अर्थाने गती घेऊ शकत नाही. विकासासाठी शुद्ध भांडवल हवे आहे. जे सोन्यासारख्या धातूत अडकून पडले आहे. ते बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने सुवर्णठेव योजना आणण्याचे जाहीर केले आहे. त्याला देशप्रेमी भारतीय नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे.

संपत्तीचा वापर अंतिमत: देशाच्या उभारणीसाठी झाला पाहिजे. त्यासाठीच संपत्तीच्या निर्माणाला महत्त्व आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या अतिशय असुरक्षित झालेल्या भारतीयांवर गेले काही शतके संपत्ती उशाशी ठेवण्याची वेळ आली आहे. जगातील सर्वाधिक सोने आयात करणारा आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा (२४००० टन) करणारा देश म्हणून आज भारत ओळखला जातो. संपत्तीच्या साठ्याची ही समृद्धी त्याच्या सार्वजनिक आयुष्यात मात्र अजिबात दिसत नाही. भारताची लोकसंख्या आज १२६ कोटी असून त्याच्या अर्थव्यवस्थेने दोन ट्रिलियन डॉलरचा जगाला तोंडात बोट घालायला लावणारा पल्ला ओलांडला आहे. मात्र, त्यातील सुमारे एक ट्रिलियन म्हणजे निम्मी संपत्ती घराघरांतील आणि मंदिरांतील सोन्याच्या साठ्याच्या रूपाने सडते आहे. तिचा देशाच्या उभारणीसाठी काहीच उपयोग होत नाही. हे वास्तव स्वीकारून भारताला बहुचर्चित विकासदर कधीच गाठता येणार नाही. त्यामुळे या वास्तवात बदल केला पाहिजे, असे वेळोवेळी बोलले गेले, मात्र त्या दिशेने ठोस काही केले जात नव्हते. किमान एका वर्षाच्या सुवर्णठेवीवर व्याज देण्याची योजना आणून सरकारने आता या मूळ मुद्द्याला हात घातला असून त्याचे स्वागत केले पाहिजे.
सोन्याचे रूपांतर स्वच्छ भांडवल म्हणजे पैशांत करण्याची ही योजना आहे. तीत सोन्यात दडविलेला काळा आणि स्वच्छ असा दोन्ही प्रकारचा पैसा नागरिकांनी बाहेर काढायचा आहे. त्यांनी तो मोकळ्या मनाने काढावा, यासाठी या ठेवीवर त्यांना व्याज देण्यात येणार आहे. त्या व्याजाला संपत्ती, प्राप्तिकर आणि भांडवली असे कोणतेही कर लावले जाणार नाहीत. शिवाय हे सोने कोठून आणले, हे विचारले जाणार नाही. फक्त बँकेत केवायसी भरून द्यावी लागेल. सोने शुद्ध आहे ना, हे अर्थातच तपासून घेतले जाणार आहे, कारण हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमधील भेसळ ४५ टक्क्यांपर्यंत पोचल्याचे केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून सोन्याचे भांडवलात रूपांतर करणारी ही योजना त्याचाच एक भाग आहे.

वर्षाला एक हजार टन सोने आयात करण्याचा विक्रम भारताने आपल्या नावावर जमा केला असून हे वर्ष त्याच दिशेने चालले आहे. मार्च १५ मध्ये १२५ टन, एप्रिलमध्ये १११ टन, तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६० टन सोन्याची आयात भारताने केली आहे. जगाला झुकविणारा डॉलर खरे तर देश मजबूत करण्यासाठी वापरला गेला पाहिजे; पण त्याचा मोठा घास आज सोन्याने खेचून घेतला आहे. त्यामुळे सोन्याची आयात वाढली की अर्थव्यवस्था संकटात सापडते आणि सरकारच्या पोटात गोळा येतो. आयात-निर्यात व्यापारात तूट येऊन चालू खात्यातील तूटही वाढते; ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचा संदेश जगाला जातो. म्हणूनच कधी सोन्याच्या आयातीवर कर वाढविला जातो, कधी आयातीतील २० टक्के सोन्याच्या दागिन्यांची निर्यात झालीच पाहिजे, असे नियम करावे लागतात. मग कोठे सोन्याची आयात थोडी कमी होते. वर्षानुवर्षे असेच चालले असून आता त्यात दडलेले भांडवल बाहेर पडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, अशी वेळ आपल्या देशावर आली आहे.

सुवर्णठेवीच्या योजनेतून नेमके काय साध्य होईल, ते आता पाहू. एक तर दडलेले सोने व्यवहारात आल्यामुळे एवढे प्रचंड सोने आयात करण्याची गरज राहणार नाही, म्हणजे सोन्याची देशाची गरज देशातीलच सोने पूर्ण करील आणि दुसरे म्हणजे जे सोने ठेवींच्या रूपात बँकांत ठेवले जाईल, त्याचा वापर बँका कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी (एसएलआर)साठी वापरू शकतील. याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेकडे विशिष्ट रक्कम ठेवावी लागते. त्यामुळे ती बँकेसाठी व्यवहारात राहत नाही. बँक त्या रकमेचा वापर कर्जासाठी करू शकत नाही. तेवढा देशात पतपुरवठा कमी होतो. या योजनेतील सोन्याची ठेव म्हणजे बँकेकडील पैसाच आहे, असे मानले जाईल. ज्यामुळे ती बँक अधिक कर्जपुरवठा करू शकेल, म्हणजेच देशाला जी शुद्ध भांडवलाची चणचण जाणवते आहे, ती काही प्रमाणात दूर होईल. बँका हे सोने विकून परकीय चलन विकत घेऊ शकतील, जे आयात-निर्यातीसाठी वापरले जाईल. बँका या सोन्याची नाणी तयार करून आपल्या ग्राहकांना विकू शकतील, तसेच ज्वेलर्सना कर्जाऊ देऊ शकतील. अशा विविध मार्गानी सोन्याच्या साठ्याचे रूपांतर पैशात होईल आणि तो पैसा देशाच्या उभारणीसाठी वापरला जाईल.

एका सरकारी अंदाजानुसार भारतीयांनी घरात ठेवलेले आणि धार्मिक स्थळांनी साठविलेल्या सोन्याची आजची किंमत ६० लाख कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. ६० लाख कोटी रुपये म्हणजे भारताच्या वार्षिक करसंकलनाच्या चारपट! कल्पना करा की भारताच्या स्वच्छ भांडवलात ६० लाख कोटी रुपयांची भर पडली तर काय काय होईल. किमान आज आपल्या पंतप्रधानांना एफडीआयची खुशामत करण्यासाठी परदेशी जावे लागणार नाही आणि जाचक अटी मान्य करून जगातील श्रीमंत देशांची गुंतवणूक घ्यावी लागणार नाही. अर्थात आर्थिक असुरक्षिततेच्या मानसिकतेमुळे सोन्याला कवटाळून बसलेले बहुतांश भारतीय एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने बाहेर काढण्याची आज तरी शक्यता नाही.

सरकारने अजून या योजनेला अंतिम रूप दिलेले नाही. देशात दोन जूनपर्यंत त्यावर खुली चर्चा करून अधिकाधिक सोने भांडवलात रूपांतरित कसे होईल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. या योजनेत अधिकाधिक नागरिकांनी आपले ‘काळ्याचे पांढरे’ करून घ्यावे आणि देशाच्या उभारणीसाठी सोने बँकेत जमा करावे, अशी अपेक्षा आपण करूयात. खरे म्हणजे संपतीचा हा चोरीचा मामला एकदाचा संपविण्याची वेळ आली आहे. पैसा असो नाही तर सोने, ते खेळते- प्रवाही ठेवून जगातील प्रगत देशांनी त्यांचे जीवनमान उंचावून घेतले. सामाजिक सुरक्षिततेच्या योजना राबवून आर्थिक असुरक्षितता कमी केली आहे. पैसा आणि संपत्ती हे चांगले सामूहिक जीवन जगण्याचे एक साधन आहे, हे ठसवून मानवी प्रतिष्ठा राखण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यासाठी कमीत कमी लपवाछपवी असलेली समन्यायी आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण केली आहे. मानवतेचा संदेश देणाऱ्या भारताला तसे करणे एवढे जड का जावे बरे !
ymalkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...