आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम कुशल व समर्थ शासक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री भागवत पुराण श्रेष्ठ पुराण म्हणून भारतभर लोकप्रिय आहे. परमेश्वर-ब्रह्म-नारद वेदव्यास अशा दिव्य गुरु-शिष्य परंपरेने ते भूतलावर अवतरले. मधुर भाषेत तत्त्वज्ञान, श्रीकृष्णाचे गोड चरित्र यात वर्णित आहे, ही आणि अशी बरीच कारणे याला आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मन्वंतरात परमात्म्याने अवतार घेऊन भूतलावरील अत्याचाराला पायबंद घातला, त्या सर्वांची चरित्रे यात वर्णिलेली आहेत, हेही कारण आहेच.

श्रीभागवतकार समन्वयवादी दृष्टिकोन बाळगून सर्व एकच एक प्रभूची कार्यानुषंगाने घेतलेली विविध रूपे होत, असे सांगतात; तेव्हा वादविवाद, संघर्ष होण्याचे कारणच उरत नाही. सर्व देवदेवताही त्या परमात्म्याचीच रूपे, असा विशाल दृष्टिकोन पुराणाचा आहे, हेही त्याच्या श्रेष्ठत्वाचे कारण आहे. श्रीरामचरित्रही अशाच दृष्टीने यात वर्णिलेले आहे. या अवताराचे प्रथमस्कंध (अ.3), द्वितीय स्कंध (अ.7), पंचम स्कंध (अ. 19), नवम स्कंध (अ. 10, 11), द्वादश स्कंध (अ. 4) अशा स्थळी श्रीरामचरित्राचे उल्लेख आहेत. या सर्वच स्थळी श्रीरामप्रभू ईश्वराचे अवतार होते, असे म्हणून तो सर्वतंत्र स्वतंत्र परमात्माच असे सिद्ध केले आहे. हे पुराण ईश्वरास्तित्ववादी आहे. त्यानुसार श्रीरामही ईश्वरच, हे त्याचे मत उचितच आहे. श्रीरामाचे चक्षुर्वैसत्य चरित्र महर्षी वाल्मीकीने सर्वात आधी लिहिले. महर्षी श्रीरामाचे समकालीन तर होतेच, तसेच ते श्रीरामाचे कार्य जवळून पाहणारे प्रत्यक्षदर्शी होते. काही प्रसंगांत तर त्यांनी श्रीरामांना प्रत्यक्ष सल्लाही दिला होता. सीतेची प्रसूती, तिच्या पुत्राचे संगोपन, अध्यापन, राम-सीतेचे मिलन महर्षींनीच केले होते. त्यामुळे त्यांचे चरित्र लेखन अत्याधिक विश्वसनीय आहे. परवर्ती ऋषींनी या आधारे रामचरित्र रेखाटले आहे.

श्रीभागवतकारही श्रीरामचरित्र सांगतात, त्याला या महर्षी लिखित रामायणाचाच आधार घेतात, हे निर्विवाद खरे आहे. इतरत्र उल्लेखरूपात श्रीरामचरित्र आले असून नवम स्कंधात मात्र ते अंमळ विस्तृत वर्णित आहे. (अ. 10, 11) त्यात सूर्यवंशातील खट््वांग, त्याचा पुत्र दीर्घबाहू, त्याचा रघू, त्याचा अज, त्याचा दशरथ आणि त्याचा राम असा वंश सांगून श्रीरामाचा जन्म, विश्वमित्र यज्ञरक्षण व त्याप्रसंगी अनेक राक्षसांचा वध, पुढे सीता स्वयंवर, श्रीरामबंधूंचा विवाह, परशुरामाचा दर्पनाश, यौवराज्याभिषेक प्रसंगी सावत्र आईच्या हट्टापायी श्रीरामाचा सीता-लक्ष्मणासह वनवास, पंचवटी (नाशिक) येथे राहत असता रावणकृत सीताहरण, पुढे वाली वध, सुग्रीव साहाय्याने सीतेचा शोध, सेतुबंधन, रावणाचा वध, बिभीषणाला श्रीलंका राज्य देऊन अयोध्येत प्रवेश, राज्याभिषेक, प्रजेला संशय आला म्हणून सीता त्याग, वाल्मीकीकडून सीतेचे संगोपन, तेथे सीतेला जुळे, राम-सीता मिलन, सीतेचा भूप्रवेश, एका प्रसंगी लक्ष्मणाचा त्याग, नंतर अयोध्यावासी प्रजेसह वैकुंठगमन असे प्रसंग वर्णित आहेत.

श्रीरामचरित्र साधे सरळ आहे. ते एका आदर्श नरश्रेष्ठाचे चरित्र आहे. श्रीरामच आदर्श पुत्र, पती, बंधू, मित्र, शासक असल्याने त्याचे कुटुंबीय, मित्र, शत्रूसुद्धा आदर्शच आहेत. महर्षी वाल्मीकी आणि परवर्ती ऋषींनी श्रीरामचरित्र तसेच रेखाटले आहे, परंतु भागवतकार मात्र ते साक्षात ईश्वरच अशा स्वरूपात श्रीरामचरित्र सांगतात. ते मर्यादा पुरुषोत्तम असून भ्रांत समाजासमोर आदर्श उभा करण्यासाठीच त्यांनी स्वत:वर अनेकानेक बंधने घालून घेतली होती. कोणतीच शास्त्रमर्यादा त्यांनी ओलांडली नाही, कुणाला ओलांडू दिली नाही. ते स्वत: राजर्षीप्रमाणे धर्माचरण करून प्रजेसमोर एक आदर्श उभा करीत (भा. 9-10-55). तो त्रेतायुगाचा काळ होता, तरी जणू सत्ययुगच असावे एवढी न्यायप्रिय परम धर्माचरणी प्रजा रामराज्यात होती. (भा. 9-10-52)श्रीराम कुशल व पण समर्थ शासक होते, प्रजा हेच दैवत, प्रजेचे सुखसमाधान असावे यासाठी करावयाची कार्ये हीच त्यांची तपश्चर्या होती. प्रजेला सीता रावणाच्या लंकेत काही काळ राहिली होती एवढ्यावरून शंका वाटते, ही गोष्ट श्रीरामांना कळली; तेव्हा प्रजानुरंजनार्थ त्यांनी प्राणप्रिय पत्नीचा त्याग केला, कारण पत्नीला कलंक लागला, अशा कलंकित पत्नीशी प्रपंच करणारा राजा प्रजेला नको होता, हे त्यांनी ताडले. सीता त्याग श्रीरामांना प्राणांत वेदनादायी ठरला, तरी तो मुकाट सहन केला. वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण हे सारे एकाच तत्त्वाची कार्यानुषंगाने विविध रूपे. भक्तांनी, उपासकांनी ती समजून घ्यावीत, हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ असा वाद घालू नये, उपासना कुणाही अवताराची केली तरी ती त्या निर्गुण सच्चिदानंद परमेश्वराचीच; ही दृढ धारणा बाळगावी, असा दिव्य संदेश भागवतकार देतात, तो यथार्थ आहे. अशा श्रीरामावरून राजकारण, श्रीकृष्णावरून भांडण, परशुरामाची हेटाळणी, वामनाच्या पुतळ्याचे दहन, हे अडाणीपणाचे लक्षण तर आहेच; पण असंस्कृतपणाचा कळसही आहे.
संदर्भ -श्री भागवतार्थदर्शन (नवम स्कंध, पुणे)