आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of India PM Dr.Manmohan Singh's Foreign Relation

पंतप्रधानांचे पंचशील (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे परराष्ट्र धोरण व भारतीय नागरिकांच्या इच्छा-अपेक्षा यांचा जवळचा संबंध गेल्या 65 वर्षांत तयार झाला आहे. 2004 मध्ये सत्तेवर आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी लोकहित आणि परराष्ट्रकारण यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला, शिवाय शेजारील देश व एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची प्रतिमा मलिन होऊ दिली नाही, हे विशेष. दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत परराष्ट्र खात्यातील ज्येष्ठ अधिकार्‍यांना संबोधित करताना डॉ. मनमोहनसिंग यांनी भारताच्या परराष्ट्रकारणातील पाच मूलभूत तत्त्वे स्पष्ट करताना गेल्या नऊ वर्षांत यूपीए सरकारच्या कार्यकाळात भारताने आपल्या सहकारी आणि मित्रदेशांशी संबंध अधिक सलोख्याचे व शांततापूर्ण राखल्याचे सांगितले. सुमारे 60 वर्षांपूर्वी पंडित नेहरूंनी बांडुंग येथील परिषदेत पंचशील तत्त्वांची मांडणी केली होती. त्याच अनुषंगाने डॉ. मनमोहनसिंग यांनी अधोरेखित केलेली ही पाच तत्त्वे होती - देशाच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती भारतासाठी अनुकूल करणे, जेणेकरून परदेशात राहणार्‍या भारतीयांना सुरक्षा मिळेल व त्यांच्या प्रगतीला हातभार लागेल; जगाच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारताचा अधिकाधिक सहभाग वाढवणे; आपल्या शेजारील देशांशी, इतर महासत्तांशी स्थिर-दीर्घकालीन-सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे आणि या देशांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय समुदायात आर्थिक विकास व सुरक्षितता याबद्दल प्रयत्न करणे; क्षेत्रीय संघटन शक्तीवर भर देणे व लोकशाही संस्था सक्षम करणे आणि भारताची विविधता, सेक्युलॅरिझम व उदारमतवादी लोकशाही मूल्यांची परराष्ट्र धोरणाशी सांगड घालणे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या या पंचतत्त्वात अभिमान किंवा अभिनिवेश नाही, तर त्यामागे वास्तवाचे भान आहे, भारतापुढील आव्हानांचे स्पष्ट चित्र आहे. यूपीए-2 सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांनंतरच डॉ. मनमोहनसिंग यांच्या सर्वच धोरणांवर आरोपांचा चौफेर मारा सुरू झाला होता. यातील अधिकांश आरोप हे केवळ त्यांची प्रतिमा मलिन करणारे तसेच त्यांच्या नि:स्पृहतेवर, त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे होते. त्यांच्या नेमस्तवादाचा अधिक्षेप करणारे होते! जनतेमध्ये संभ्रम-चीड-असंतोष निर्माण करणारे होते. हे आरोप करणारे काही संत-महात्मे-कर्मयोगी नव्हते किंवा या लोकांचा समाजावर नैतिक प्रभावही नव्हता. चीनची घुसखोरी व पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांनंतर तर या मंडळींना राष्ट्रप्रेमाचा ज्वर आला होता. जणू काही डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकारच या हल्ल्यांच्या मागे असल्याचा प्रचार सुरू होता. गेल्या महिन्यात ‘इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकाने डॉ. मनमोहनसिंग यांच्या नऊ वर्षांच्या काळातील परराष्ट्र धोरणाचा आढावा घेताना त्यांच्या संयमी, दूरदर्शी-द्रष्टेपणाबद्दल प्रशंसा केली आहे. देशात यूपीए सरकारच्या कारभारावर वादळ निर्माण होत असताना भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल मात्र डॉ. मनमोहनसिंग आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आत्मविश्वासाने सामोरे जात होते, हे चित्र भारतात दिसत नसल्याची खंत या नियतकालिकात व्यक करण्यात आली आहे. रशिया, चीन, जपान, जी-20 देशांचा समूह, अमेरिका, आसियान, मध्य पूर्व आशियातील देश, दक्षिण आशिया यांच्याशी डॉ. मनमोहनसिंग यांनी केवळ आर्थिक संबंध दृढ केले नाहीत, तर या देशांशी सुसंवाद व मैत्रीचे-सलोख्याचे संबंध दृढ केले, असे या नियतकालिकात म्हटले आहे. नव्वदच्या दशकात भारताला जागतिकीकरणाच्या पर्वात नेण्याचे महत्कार्य डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्रिपदी असताना केले होते. त्या वेळी त्यांच्यावर भाजपबरोबरच डाव्यांनी, समाजवाद्यांनी कठोर टीका केली होती. स्वकीयांचाही विरोध त्यांनी पत्करला होता. पण हे सर्व राजकीय अडथळे पार करत त्यांनी देशामध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता. प्रगतीची आस पेरली होती. भारत जगात एक सामर्थ्यशाली देश होऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण केला होता. हाच दृढनिश्चय त्यांच्याजवळ आज कायम आहे. म्हणूनच 21 व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात प्रवेश करत असताना डॉ. मनमोहनसिंग आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारताच्या आर्थिक क्षमतांचे पारदर्शी चित्र ठेवतात. ते कोणत्या गर्जना करत नाहीत की, वल्गना करत नाहीत. शेजारील पाकिस्तान किंवा चीनशी असलेले तणाव केवळ संवादाच्या मार्गाने सुटू शकतात, यावर ते ठाम आहेत. कोणत्याही देशाचे परराष्ट्रधोरण हे युद्धखोर असू शकत नाही. जागतिकीकरणात संपूर्ण सहभागी झालेल्या भारतासारख्या देशाला तर युद्ध परवडणारे नाही. त्यामुळे चीन असो वा पाकिस्तान, या देशांशी असलेले प्रश्न सोडवताना त्यांनी आर्थिक संबंधांचे वेगळे दरवाजे उघडे केले व तेथे सुसंवादाची भाषा कायम ठेवली. या देशांनाही त्यांच्या अर्थव्यवस्थांचे प्रश्न आहेत. त्यांच्याही जनतेला युद्ध नको आहे. त्यांनाही प्रगती हवी आहे. लष्करी सामग्रीवरील खर्च, अण्वस्त्र सज्जता व आधुनिक लष्करी तंत्रज्ञान याबाबत आता भारत-चीन-पाकिस्तान परस्परांना टक्कर देऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. हे तणाव सोडवण्यासाठी आक्रमक व्हावे, असा पवित्रा भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून सर्वत्र घेत असतात. पण हा पवित्रा दुसरे देशही भारताविरुद्ध घेऊ शकतात! त्यामुळे आर्थिक सहकार्य, नागरिकांमधील संवाद, परस्पर विश्वास आणि प्रगती यांवर आधारलेली डॉ. सिंग यांची वर उल्लेख केलेली पंचतत्त्वी चिकित्सा हाच भारताच्या आधुनिक परराष्ट्रकारणाचा चेहरा आहे. या चेहर्‍यामागे विविधता, सेक्युलॅरिझम आणि उदारमतवाद ही भारतीय मूल्ये आहेत. ही मूल्येच डॉ. मनमोहनसिंग यांनी आत्मविश्वासाने-आत्मसन्मानाने आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणली आहेत. वास्तववाद व आदर्शवाद यांचा हा सुरेख संगम आहे. त्यांची टिंगलटवाळी करून त्यांच्या तथाकथित धोरणलकव्यावर विखारी टीका करणार्‍यांना डॉ. मनमोहनसिंग यांनी गेल्या नऊ वर्षांत देशासाठी काय साध्य केले आहे हे समजून घेण्याची इच्छा नाही. त्यांना फक्त पंतप्रधानांना नामोहरम करण्याच्या राजकारणात रस आहे.