Home | Editorial | Agralekh | article of indian cricket television commentator suresh saraiya

क्रिकेटचा आवाज गेला! (अग्रलेख)

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 20, 2012, 01:00 AM IST

भारतीय क्रिकेटने टेलिव्हिजन युगात प्रवेश केल्यानंतर रेडिओच्या काळातील क्रिकेट समालोचनाची खुमासदार शैली जिवंत ठेवणारे एक समालोचक होते सुरेश सरैय्या.

  • article of indian cricket television commentator suresh saraiya

    क्रिकेटचे सामने टेलिव्हिजनवर दिसत नव्हते, त्या काळात आपल्या शब्दसामर्थ्याने मैदानावर रंगणारा क्रिकेटचा खेळ श्रोत्यांसमोर जसाच्या तसा उभा करणारे जॉन आर्लट, रिची बेनॉ, अ‍ॅलन मॅक्गिलव्हरी, टोनी कोझियर यांच्यासारखे अनेक रथी-महारथी झाले. विजय मर्चंट, बॉबी तल्यारखान यांच्यासारख्यांनी भारतीय क्रिकेट समालोचन क्षेत्रावर आपल्या शैलीचा वेगळा ठसा उमटवला होता. भारतीय क्रिकेटने टेलिव्हिजन युगात प्रवेश केल्यानंतर रेडिओच्या काळातील क्रिकेट समालोचनाची खुमासदार शैली जिवंत ठेवणारे एक समालोचक होते सुरेश सरैय्या. क्रिकेटचे ज्ञान आणि आपल्या आगळ्यावेगळ्या समालोचनाच्या शैलीने तमाम भारतीय क्रिकेटविश्वावर तब्बल चार दशके अधिराज्य गाजवणारा समालोचक गेला. स्वत: आंतरमहाविद्यालयीन स्तरापर्यंत क्रिकेट खेळलेल्या या अवलियाने अन्य क्रिकेट समालोचकांपेक्षा क्रिकेट ज्ञानाचा समालोचनाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आणि परिणामकारकरीत्या वापर केला. चांगले क्रिकेट समालोचन ऐकण्याची सवय त्यांनी श्रोत्यांना लावली. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे असे म्हणतात. सरैय्या त्या आकड्यांच्या सान्निध्यात राहूनही त्यात कधी गुरफटले नाहीत. क्रिकेटची आकडेवारी देण्याचे त्यांनी कधीच टाळले नाही. आवश्यक तेथे ते अस्र प्रभावीपणे वापरले, परंतु धावा आणि विकेट याच्यापलीकडे जाऊन त्यांनी कसोटी क्रिकेटचा सामना आपल्या मार्मिक भाषाशैलीने रंगवला. कंटाळवाण्या क्रिकेट सामन्यात जेव्हा जान आणण्यात खेळाडू अपयशी ठरले, तेव्हा सरैय्यांच्या विविधांगी ज्ञानाने क्रिकेट रसिक श्रोत्यांना जांभई देण्यापासून रोखले. विनोदी भाषाशैली आणि स्पष्ट शब्दोच्चार याच्या बळावर त्यांनी इंग्रजी समालोचनाद्वारेही सर्व भाषिक श्रोत्यांची मने जिंकली. क्रिकेट रसिक त्यांच्या समालोचन शैलीवर खुश होतेच, परंतु दस्तुरखुद्द क्रिकेटपटूंनीही सरैय्यांच्या समालोचन शैलीला शंभर टक्के गुण दिले होते. याचे मुख्य कारण म्हणजे, श्रोत्यांना ते सतत क्रिकेट सामन्यांचा स्कोअरही देत राहायचे. क्रिकेटच्या आणि अन्य विषयांवरील चर्चेच्या ओघात त्यांनी मैदानावरील क्रिकेटवर कधी अन्याय होऊ दिला नाही. क्रिकेटपटूंची नावे उच्चारतानाही त्यांनी खेळाडूंवर आणि श्रोत्यांवर कधीच अन्याय केला नाही. कोणत्याही क्रिकेटपटूच्या नावाचा नेमका काय उच्चार आहे याची सामन्याच्या एक-दोन दिवस आधी मैदानावर जाऊन व त्या क्रिकेटपटूशी प्रत्यक्ष चर्चा करून खातरजमा करून घ्यायचे. क्रिकेटपटूही त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा करायचे. त्यायोगे त्यांनी अनेक क्रिकेटपटूंच्या अंतरंगात डोकावून पाहिले. काही क्रिकेटपटूंच्या व्यथा पाहिल्या, दु:खे पाहिली, जी त्यांनी समालोचन करताना कल्पकतेने श्रोत्यांसमोर मांडली. 1969 च्या मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचनाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाची प्रतीक्षा तमाम भारतीय करत असताना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटीने सरैय्यांनी आपल्या कसोटी समालोचनाचे शतक कधी गाठले ते कुणाला कळलेच नाही. खरे तर क्रिकेट समालोचन हेच स्वप्न कायम उराशी बाळगून जगलेला हा माणूस कुणालाच कळला नाही. नवसारीहून मुंबईत आलेला एक क्रिकेटवेडा तरुण ऐन तारुण्यात क्रिकेट समालोचकांच्या हुबेहूब नकला करायचा. मात्र, क्रिकेट समालोचक होण्यासाठी या तरुणाने आपल्या आवाजाची आणि ढंगाची वेगळी शैली निर्माण केली. आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट दिलीप सरदेसार्इंसारख्या भारताच्या माजी कसोटीपटूंबरोबर खेळलेल्या सुरेश सरैय्या यांना अधिक वरच्या दर्जाचे क्रिकेट खेळू शकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी क्रिकेट समालोचनावर लक्ष केंद्रित केले. 1952 मध्ये औरंगाबाद येथे एनसीसीच्या शिबिरात काल्पनिक क्रिकेट सामन्याचे अफलातून समालोचन करून सुवर्णपदक पटकावणा-या सुरेश सरैय्या यांची गाडी त्या रुळावरूच अखेरपर्यंत धावली. झिम्बाब्वे व श्रीलंकेचा अपवाद वगळता त्यांनी क्रिकेट खेळणा-या सर्व प्रमुख देशांमध्ये जाऊन आकाशवाणीसाठी क्रिकेट समालोचन केले. शंभरावर कसोटी सामन्यांचे आणि दीडशेच्या जवळपास एकदिवसीय सामन्यांचे समालोचन त्यांनी केले. या आकडेवारीपेक्षाही क्रिकेट सामना लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारा हा समालोचक मोठा होता. आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राखणारा होता. पोटापाण्यासाठी पत्करलेल्या जनसंपर्क अधिका-याच्या पेशाचा लाभ समाजाला करून देण्यात अग्रेसर होता. क्रिकेट समालोचन करता करता जेथे जेथे गेला, तेथील दु:खे पाहिली, चांगल्या गोष्टी टिपल्या, त्या खुल्या दिलाने श्रोत्यांबरोबर सहजतेने वाटून टाकल्या. कधी क्रिकेटपटूंच्या काळजालाही हात घातला. कधी त्यांची खिल्लीही उडवली. स्वत: क्लब पातळीवरचे क्रिकेट खेळले असल्याने क्रिकेटपटूंशी त्यांच्या तांत्रिक उणिवा आणि चांगल्या गोष्टी याबाबत चर्चा करण्याचे धाडस दाखवले. क्रिकेटपटूंना त्यांनी बोलते केले. समालोचन कक्षात येण्याचे टाळणा-या क्रिकेटपटूंच्या गळ्यातही ती घंटा त्यांनी अनेकदा बांधली. क्रिकेट समालोचनाच्या क्षेत्रात त्यांनी आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणा-या सर्वांना गुरू मानले होते. प्रत्येकाकडचे चांगले गुण घेत घेत त्यांनी कसोटी समालोचनाचे शतक कधी गाठले ते कळलेच नाही. या वाटचालीत आपल्या सर्व वयोगटाच्या सहका-यांशी ते सहजपणे वावरले. ‘वाटाण्या’ अशी हाक सुरेश सरैय्या आल्याची वर्दी असायची. प्रथमच तसा उल्लेख केल्यानंतर काही व्यक्ती रागवायच्याही, परंतु नंतर मिश्कील स्वभावाच्या सरैय्यांशी बातचीत झाल्यानंतर आधीची कटुता विरून जायची. जॉन आर्लट यांच्या क्रिकेट समालोचनावर ते फिदा होते. त्यामुळे सरैय्यांना ‘नवसारीचा आर्लट’ असेही संबोधले जायचे. अशा मिश्कील स्वभावाच्या क्रिकेट सरस्वतीचे वरदान असलेल्या भाषाप्रभूला पत्नीही तशीच लाभली होती. आकाशवाणीवर ‘आपली आवड’ या कार्यक्रमाद्वारे तमाम मराठी श्रोत्यांवर कित्येक दशके राज्य करणा-या मीरा प्रभू या त्यांच्या पत्नी होत्या. एका भाषाप्रभूच्या प्रेमात दुस-या भाषाप्रभूने पडण्याचा हा दुर्मिळ योग असावा. त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या पत्नीचे निधन त्यांना एकाकीपणाची जाणीव करून गेले. त्यानंतरचा कालावधी केवळ क्रिकेट कसोटींच्या समालोचनाचे शतक या एकमेव आशेवर हा अवलिया जगला. ते शतक पूर्ण झाले आणि क्रिकेट रसिकांना दर्जेदार समालोचनाची मेजवानी देण्याचे त्यांचे कार्यही संपुष्टात आले!

Trending