आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय नौदलाची वाढती सुसज्जता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई युद्धाच्या क्षेत्रात आता पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांचे तसेच मानवरहित विमानांचे युग सुरू झाले आहे. या बदलाला अनुसरून भारतानेही रशियाच्या सुखोई कंपनीच्या सहकार्याने पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांचा विकास सुरू केला आहे. त्याच वेळी अशाच पण मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानाची भारतीय हवाई दलातील आवश्यकता लक्षात घेऊन त्याचा स्वदेशातच विकास करण्यास सुरुवात झाली आहे. अलीकडेच बंगळुरू येथे पार पडलेल्या एअरो इंडिया हवाई प्रदर्शनात पाचव्या पिढीच्या स्वदेशी विमानाची प्रतिकृती प्रथमच सर्वांसमोर मांडण्यात आली होती. नियोजित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होणे हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
भविष्यात कोणत्याही हवाई दलाची सामरिक शक्ती वाढवण्यासाठी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांचा प्रामुख्याने वापर होणार आहे. त्यामुळे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल असलेल्या भारतीय हवाई दलासाठीही अशा प्रकारच्या विमानांचा विकास करण्यात येत आहे. अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) नावाने पाचव्या पिढीच्या स्वदेशी लढाऊ विमानाचा प्रकल्प राबवला जात आहे. हैदराबादस्थित एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने या विमानाचे आरेखन तयार केले असून त्यात तेजस, सुखोई-30 एमकेआय, राफाल विमानांच्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तेजससारखा लहान आकार, राफालसारखी बहुविध भूमिका पार पाडण्याची क्षमता आणि सुखोई-30 सारखी चपळता आदी बाबींचा या विमानात समावेश असणार आहे. तसेच राफालप्रमाणे एएमसीएही हवाई दल आणि नौदलासाठी वापरता येणार आहे. मात्र प्रत्यक्ष उड्डाण चाचण्या सुरू झाल्यावरच या वैशिष्ट्यांचे विमानाच्या कार्यक्षमतेवर कसे परिणाम होतात ते लक्षात येईल. सध्या तरी या वैशिष्ट्यांच्या आधारे तयार करण्यात आलेली पहिली प्रतिकृती विंड टनेलमधील परीक्षणांनंतर एअरो इंडियात ठेवण्यात आली होती.
स्वदेशातच पाचव्या पिढीचे लढाऊ विमान विकसित करण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे. हे विमान रशियाबरोबर विकसित करण्यात येत असलेल्या टी-50पेक्षा लहान असणार आहे. एकूण 20 टन वजनाचे हे विमान एकआसनी असून ते स्टिल्थ असणार आहे. त्यामुळे शस्त्रास्त्रे ठेवण्याची व्यवस्था विमानाच्या आतमध्ये करण्यात येणार आहे. तसेच विमानाच्या बाह्य भागाला वैशिष्ट्यपूर्ण कोन करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर शत्रूच्या रडारलहरी शोषून घेईल, असा विशेष रासायनिक लेप याच्या शरीरावर लावलेला असेल. या वैशिष्ट्यांमुळे विमानाच्या शरीरावरून शत्रूच्या रडारलहरींचे कमीत कमी परावर्तन होईल. परिणामी शत्रूच्या रडारला या विमानाचा शोध घेणे कठीण होईल. हे मध्यम क्षमतेचे असल्याने यावरून सुखोई-30प्रमाणे ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेता येणार नाही. मात्र सध्या ब्रह्मोसच्या छोट्या आवृत्तीचा विकास करण्यात येत आहे. ते एएमसीएवर बसवले जाण्याची शक्यता आहे. स्वदेशी बनावटीचे हवेतून हवेतील लक्ष्याचा भेद घेणारे अस्त्र क्षेपणास्त्र, लेसर निर्देशित बॉम्ब अशी सुमारे चार टन वजनाची शस्त्रास्त्रे हे विमान वाहून नेऊ शकेल.
स्टिल्थ एएमसीए समुद्रसपाटीपासून सुमारे 15 किलोमीटर उंचीवरून दीर्घकाळ उड्डाण करणार आहे. अशा वेळी अतिशय विरळ वातावरणामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वैमानिकाचे रक्षण व्हावे, यासाठी कॉकपिटवरील पॉलिकार्बोनेटच्या काचेलाही विशेष लेपन करण्यात येणार आहे. यावर ड्रॉप टँकची व्यवस्था करण्यात येणार नसल्याने विमानाला अधिक पल्ल्याच्या मोहिमेसाठी हवेत उड्डाण करत असतानाच इंधन भरावे लागणार आहे. तशी सोय त्यात करण्यात येणार आहे. एएमसीएवर अत्याधुनिक एईएसए रडार, संवेदक आणि अन्य दळणवळण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात हल्ला आणि संरक्षण यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणाही एएमसीएवर असतील. याची दोन जेट इंजिने प्रत्येकी 90 किलो न्यूटनचा रेटा तयार करू शकतील. त्यामुळे विमानाला त्वरित वेग गाठण्यास मदत होईल. स्वदेशी बनावटीचे कावेरी जेट इंजिन या विमानावर बसवण्याची योजना आहे. मात्र कावेरीचा प्रकल्प सध्या नियोजित वेळापत्रकाच्या कितीतरी मागे पडला आहे. प्रत्यक्षात हे इंजिन तेजससाठी विकसित करण्यात येत होते. मात्र अजून त्यातून आवश्यक रेटा प्राप्त करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. म्हणूनच आता तेजसला अमेरिकन जेट इंजिन बसवण्यात आले आहे. अलीकडील काळात कावेरीच्या रशियात घेतलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. पण त्यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे. एएमसीएच्या पहिल्या चाचणी उड्डाणापर्यंत तरी ते पूर्णपणे विकसित झालेले असेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटत आहे. एएमसीएच्या कावेरी इंजिनातून कमी लांबीच्या ज्वाळा बाहेर पडाव्यात आणि इंजिनातून बाहेर पडणार्‍या वायूचे तापमानही कमीत कमी राहावे, यासाठी शास्त्रज्ञांचा खास प्रयत्न राहणार आहे.

(Parag12951@gmail.com)