आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगलायन (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त होत असतानाच भारताने रक्तरंजित फाळणी अनुभवली होती. तो काळ प्रचंड अस्थिरतेचा, अशांततेचा, संशय, मत्सर, विद्वेषी राजकारणाचा होता. अशा परिस्थितीत व्यामिश्र संस्कृतीच्या देशात जगण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे, देशाला जगापुढे ताठ मानेने उभा करणे हेच मोठे आव्हान होते. दुष्काळ, पिढ्यान्पिढ्या चालत आलेले दारिद्र्य, आधुनिक तंत्रज्ञानाची वानवा असल्याने अन्नधान्याची जाणवणारी प्रचंड टंचाई, भूकबळी, कुपोषण, कमालीची अशिक्षितता आणि धार्मिक रूढी-समजुतींचा-अंधविश्वासाचा समाजातल्या तळागाळावर असलेला पगडा असलेल्या या देशात विज्ञानवादी मनोवृत्ती तयार करणे हेच मोठे आव्हान होते. पं. नेहरूंना देशाच्या या परिस्थितीचे आकलन होते. ते म्हणत असतं की विसावे शतक हे विज्ञानाचे शतक आहे. त्यामुळेच 1938 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी आपली विज्ञाननिष्ठ भूमिका अधिक स्पष्ट करताना म्हटले की, ‘राजकारणामुळे मी अर्थशास्त्राकडे वळलो आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करताना मला असे जाणवले की केवळ विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे आणि विज्ञानावर स्वार होऊनच दारिद्र्य-भूकबळी, अशिक्षितता, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न सुटू शकतात.’ नेहरूंनी ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या आपल्या आत्मचरित्रपर ग्रंथातही विज्ञानवादी दृष्टिकोन आणि विज्ञानवादी मनोवृत्तीमुळेच मानव नवे ज्ञान मिळवू शकतो आणि तो सत्याच्या जवळ जाऊ शकतो, असे म्हटले होते. नेहरूंना भारताच्या अंगभूत सामर्थ्याविषयी वाटणारा विश्वास कधीच डळमळीत नव्हता. ते विज्ञानसक्त होते. त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर पुढील 17 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी देशभरात सुमारे 45 आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा सुरू केल्या. या प्रयोगशाळांमध्ये आयआयटीसह भाभा अणुसंशोधन केंद्र, डीआरडीओ, सीएसआयआर, इस्रोसारख्या महत्त्वाच्या संस्था होत्या. या प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असणाºया शास्त्रज्ञांमुळे, संशोधकांच्या अथक परिश्रमांच्या बळावर आज भारत अवकाश संशोधनात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी, पाच नोव्हेंबरला मंगळ ग्रहाच्या कक्षेत इस्रो स्वदेशी बनावटीचे यान पाठवणार असून भारताची ही मंगळ मोहीम ऐतिहासिक अशीच म्हणावी लागेल. 2012 च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर केवळ सव्वा वर्षाच्या काळात इस्रोने अहोरात्र मेहनत घेऊन आपली मंगळ मोहीम उड्डाणासाठी सज्ज केली आहे. पाच नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून इस्रोचे यान मंगळ ग्रहाकडे रवाना होईल व पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात ते मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करेल. नासाची ‘क्युरिआॅसिटी’ ही बग्गी सध्या मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचे पृथक्करण करत असून इस्रोचे मंगळयान मात्र मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. इस्रोने मंगळ ग्रहच आपल्या संशोधनासाठी का निवडला याची कारणे आहेत. पृथ्वीनजीकच्या बुध ग्रहाचे कमाल तापमान सुमारे 425 अंश सेल्सियस इतके असून त्याचे किमान तापमान वजा 180 अंश सेल्सियस आहे, शिवाय या ग्रहावर वातावरण अस्तित्वात नाही. शुक्राची चांदणी आपल्याला कितीही मोहक वाटत असली तरी या ग्रहावरचे तापमान 450 अंश सेल्सियस इतके आहे व या ग्रहावरचा वातावरणीय दाब पृथ्वीपेक्षा 90 पट अधिक आहे. शुक्रावर कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाणही अधिक आहे. उरलेले गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह वायुग्रह असल्याने त्यांचा पृष्ठभाग खडकाळ नाही. मानव या ग्रहांवर चालू पण शकत नाही. पण मंगळ हा आपल्या सौरमालेतील एकमेव ग्रह असा आहे की, त्याचा पृष्ठभाग पृथ्वीसारखा खडकाळ असून ते एक शीत वाळवंट आहे. मंगळावर वातावरणाचा एक पट्टा असल्याने व या ग्रहावर ऋतू होत असल्याने येथे पाण्याचा अंश असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘क्युरिआॅसिटी’ या नासाच्या बग्गीने मंगळावरच्या मातीचे पृथक्करण केल्यानंतर या मातीत पाण्याचे अंश असल्याचे म्हटले होते. ‘क्युरिआॅसिटी’ने मंगळावर कार्बन डायआॅक्साइड, आॅक्सिजन व सल्फर डायआॅक्साइड हे वायूही असल्याची माहिती पाठवली आहे. 1984 मध्ये शास्त्रज्ञांना अंटार्क्टिका खंडावरील अ‍ॅलन हिल्स येथे एक उल्का सापडली होती. ही उल्का मंगळावरून आल्याचा व त्यामध्ये सूक्ष्मजीव असल्याचा दावा 1996 मध्ये करण्यात आला होता. या दाव्याला सबळ पुरावे मिळाले नसले तरी मंगळावर सापडलेल्या पाण्याच्या अंशामुळे शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहाबाबत उत्सुकता वाढीस लागली आहे. भारताचे मंगळयान प्रत्यक्ष मंगळ ग्रहावर उतरणार नाही, पण ते मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. मंगळावर मिथेन वायूचे प्रमाण अधिक असल्याने या वायूचा अभ्यास आणि हा वायू मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागात किंवा जैविक प्रक्रियेतून निर्माण झाला आहे का, याचा शोध इस्रोकडून घेतला जाणार आहे. मंगळाला ‘दिमोस’ आणि ‘फोबोस’ असे दोन चंद्र असून इस्रोचे मंगळयान ‘फोबोस’ या चंद्राच्या जवळ असल्याने ते ‘फोबोस’चा अभ्यास करणार आहे. पुढील वर्षी मंगळ ग्रहापासून सुमारे 50 हजार किमी अंतरावर एक धूमकेतू मार्गक्रमण करणार असल्याचे नासाने म्हटले आहे. या धूमकेतूचा अभ्यासही इस्रोला करता येणार आहे. आतापर्यंत मंगळ ग्रहावर अमेरिका, रशिया, युरोपियन स्पेस एजन्सी व चीनने मोहिमा सोडल्या आहेत. या देशांच्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्या आहेत असे नाही. चीन व रशियाची संयुक्त मोहीम 2011 मध्येच अर्धवट सोडून द्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर इस्रोला एक संधी मिळाली आहे. सध्या नासाची मोहीम कार्यरत आहेच, पण 18 नोव्हेंबरला पुन्हा ते एक उपग्रह मंगळ ग्रहावर सोडणार आहेत. त्यामुळे इस्रो आणि नासामध्ये माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. वास्तविक इस्रोची मोहीम केवळ मंगळ ग्रहाचा अभ्यास एवढ्यापुरती मर्यादित नसून या मोहिमेच्या निमित्ताने इस्रोला स्वत:च्या क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. उदाहरणार्थ इस्रोचा हा पहिलाच असा उपग्रह आहे की जो सुमारे 55 लाख किमी अंतर पार करत 300 दिवसांत मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे. हे यान मंगळ ग्रहाकडे कूच करत असताना त्याला पृथ्वीची कक्षा, हेलिओसेंट्रिक ट्रॅजेक्टरी व मंगळ ग्रहाची कक्षा अशा तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. ‘चांद्रयान-1’च्या निमित्ताने इस्रोने पृथ्वीच्या कक्षेचे आव्हान पेलले होते. आता हेलिओसेंट्रिक ट्रॅजेक्टरीमध्ये मंगळयान गेल्यानंतर त्याला सुमारे 10 महिन्यांचा काळ सूर्यासोबत काढावा लागणार आहे. त्यानंतर हे यान मंगळाच्या कक्षेत जाणार आहे. मंगलयानाचा हा सगळा वर्षभराचा प्रवास पृथ्वीवरून नियंत्रित करावा लागणार आहे. या प्रवासादरम्यान यानाला लागणारे इंधन, या यानाचा इस्रोशी राहणारा दैनंदिन संपर्क, आपत्कालीन परिस्थितीत या यानावर केले जाणारे नियंत्रण ही सर्व आव्हाने इस्रोसाठी महत्त्वाची आहेत. प्रत्येक वैज्ञानिक प्रयोग हा पहिलाच प्रयोग असतो. विज्ञानामध्ये आत्मसंतुष्टतेला स्थान नसते. इस्रोच्या 60 वर्षांच्या शेकडो प्रयत्नांपैकी ही एक कठीण परीक्षा आहे. तिला शुभेच्छा देणे महत्त्वाचे आहे.