आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात आशादायी चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील दहा महानगरपालिका अन् पंचवीस जिल्हा परिषदांची निवडणूक धूमधडाक्यात सुरू झाली आहे. त्याचे पडसाद एवढे जबरदस्त उमटू लागलेत की त्याचा ध्वनी अवघ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन धडकू लागला आहे. एका बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र पाण्याचे दोन-चार घोट पीत पीत सेनेवर शब्दास्त्र सोडू लागले तर उद्धवजीही दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तरादाखल मावळ्यांना साद घालत त्वेषाने प्रतिशब्दास्त्र सोडताहेत. युतीतीलच दोन मुखंडांची ही जुगलबंदी निवडणुकीचा बिगूु वाजला तशी उत्तरोत्तर अधिकच रंगतदार होत चालली आहे. कोणत्या पक्षाने गुंडापुंडांना पक्षात किती प्रमाणात स्थान दिले याचाही ताळेबंद उभयतांकडून जाहीरपणे मांडला जातो आहे. निवडणूक म्हटली की असा धुरळा उडणे  अपरिहार्य असते. पण अशा गोंधळी वातावरणातदेखील काही मुद्दे समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आशादायक असतात याकडे जवळपास सर्वच मंडळींचे दुर्लक्ष झाल्याचे प्रकर्षाने नमूद करावे लागेल. त्यापैकीच एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक रिंगणातील महिला उमेदवारांतील गुन्हेगारीचा टक्का अत्यल्प असल्याचा.  

आजवरच्या सर्व छोट्या-मोठ्या निवडणुकांचा इतिहास बघता निवडणुकीच्या फडात उतरलेल्या पुरुषांच्या अर्थात निवडून जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदारापर्यंत यांच्या चांगल्या-वाईट कर्माचा, थोडक्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा धांडोळा आवर्जून घेतला जातो. एवढेच नाही तर गुन्ह्याचे स्वरूप काय आहे, हाफ मर्डर की फुल मर्डर, दरोडा, बलात्कार, भुरटी चोरी की फसवणूक असे त्यांच्यावर दाखल गुन्ह्यानुसार वर्गवारी केली जाते. संपूर्ण निवडणुकीच्या काळात हीच चर्चा रंगत राहते. भोळीभाबडी जनतादेखील निवडणुकीच्या धामधुमीत अशा स्वरूपाची चर्चा ऐकत राहते अन् मतदानाच्या दिवशी आपलं मत पेटीत टाकून मोकळी होते. त्याच्या भविष्यातील बऱ्या-वाईट परिणामांबाबत फारशी चिंता करीत नाही. पण आता जमाना बदलला आहे. निवडणुकीच्या रिंगणात परंपरेनुसार केवळ पुरुषांचाच टक्का सर्वाधिक नजरेस पडायचा त्या चित्रात अामूलाग्र बदल होत महिलांचा टक्काही केवळ पन्नासवर न थांबता सीमारेषा लांघत त्याच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे आजपर्यंत जशी पुरुष उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेतली जायची तद्वतच आता उमेदवारी करणाऱ्या महिलांवर दाखल गुन्ह्याचाही विचार केला जाणार आहे. त्याची सुरुवात यंदाच्या महापालिका वा जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे. 
 
योगायोग बघा, निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याआधीच ठिकठिकाणच्या नामचीन गुंडांच्या प्रवेश सोहळ्यांमुळे सेना-भाजपच्या प्रचाराचे दिशादर्शन स्पष्ट झाले होते. ऐन निवडणुकीतील सर्वच छोट्या-मोठ्या नेत्यांच्या प्रचारातील भाषणे ऐकली तरी त्याची प्रचिती येते. एक पक्ष दावा करतो की, ‘आमच्या पक्षात गुंडांना अजिबात थारा दिला जात नाही’ तर दुसरा त्याला उत्तर देताना म्हणतो ‘सर्वाधिक गुंडांची फौज तर तुमच्याच पक्षात आहे’. पण निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून महिला उमेदवारांचा टक्का वाढला असतानाही त्यांच्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. ही बाब येणाऱ्या पिढीला नक्कीच दिशा दाखविणारी ठरू शकेल. कारण सध्या राजकीय पातळीवर प्रचलित झालेल्या भाऊ, दादा, नाना, अण्णा, आप्पा, बॉस या शब्दांना एक काळी किनार प्राप्त झाली आहे. महिला मंडळाच्या वर्तुळात अद्याप तरी असे काही शब्द चर्चेत असल्याचे ऐकिवात नाही. 
 
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांची संख्यादेखील नगण्यच म्हणावी लागेल. त्यातही ज्या काही एक दोन टक्के महिलांवर गुन्हे नोंदले गेलेत त्याचे स्वरूप राजकीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. त्यामुळे जेथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा दुरान्वयाने संबंध येत नाही तेथे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विषय येऊ शकत नाही. किमान महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी करणाऱ्या महिलांबाबत जे चित्र समोर आले आहे ते पक्षापक्षांतील गुन्हेगारांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर निर्विवाद दिलासादायकच म्हणावे लागेल. पूर्वापार चालत आलेल्या पुरुषसत्ताक राजवटीत महिलांचे कुटुंबांतील स्थानमाहात्म्य अबाधित होते वा आहे. कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाची चलती असली तरी त्या कुटुंबांवर वरचष्मा हा महिलेचा असतो. कारण ती उत्तम कारभारीण असते, घरातील अर्थव्यवस्था सांभाळणारी अर्थतज्ज्ञ असते, प्रसंगी उत्तम शासकाची भूमिकादेखील ती निभावू शकते. त्यामुळे महिला उमेदवारांतील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अत्यल्प टक्का लक्षात घेता त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा गाडा सुयोग्य रीतीने हाकू शकतील असेच एकूण वास्तव आजमितीस दिसते आहे. 
 
जयप्रकाश पवार
- निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...