आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: संवादावर आधारित आहे व्यवसायाचे यश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. रेस्टॉरंट व्यवसाय पूर्णपणे खाद्यपदार्थांच्या किमतींवर अवलंबून असल्याने या महागाईचा सर्वाधिक परिणाम त्यांच्यावरच जाणवत आहे. रेस्टॉरंटमध्ये मेन्यूवरील छापील किमतीतच विविध पदार्थ मिळतात. कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढत असल्याने दरदिवशी रेस्टॉरंट मालकांना मेन्यूमध्ये बदल करत कसाबसा व्यवसाय चालवावा लागत आहे. वस्तूंच्या वाढत्या दरावर मात करण्यासाठी रेस्टॉरंट मालक मेन्यूशी संबंधित नवनवीन शक्कल लढवत आहेत. मागील आठवड्यात मुंबईतील सात हजार रेस्टॉरंट आणि बारमधून अचानक मेन्यू कार्डच गायब झाले. कार्डची छपाई करण्यासाठी 20 रुपये खर्च येतो म्हणून ते कार्ड गायब नव्हते तर, कार्डवरील छापील किमतीत खाद्यपदार्थ पुरवणे मालकांना अवघड जात होते.
मेन्यूमध्ये असलेल्या पदार्थांचे दर वर्षातून एकदा ठरवले जातात. स्टिकरच्या माध्यमातून मेन्यूवरील किमती बदलण्याचा एक पर्यायही त्यांच्याकडे आहे, परंतु असे केले तर मेन्यू कार्डचा पूर्ण लूक जातो व ग्राहक रेस्टॉरंटबद्दल वेगळे विचार करू शकतात. ब्लॅक बोर्डच्या माध्यमातून दरदिवशी खाद्यपदार्थांच्या किमती दर्शनीय भागात लावण्याचा दुसरा पर्यायही त्यांच्याकडे आहे, परंतु हा पर्याय व्यवहार्य ठरू शकत नाही. इंधनाचे दर वाढत असल्याने भाजीपाल्यांच्या आणि खाद्यपदार्थांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत आणि त्यामुळे मेन्यूमध्ये बदल करावा लागत आहे. कच्चा माल आणण्यासाठीही अतिरिक्त पैसा लागत असल्याने इंधनावरील खर्चही रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे रेस्टॉरंट मालकांनी बनवलेल्या ‘एएचएआर’ संघटनेला वाटते, परंतु याचा फायदा काही रेस्टॉरंट मालक घेऊ शकतात, अशी भीतीही त्या संघटनेला आहे.
काही दिवसांनंतर ‘एएचएआर’ संघटनेने वाढणार्‍या किमतीच्या समस्येवर अनोखा पर्याय शोधून काढला. या संस्थेने निर्णय घेतला की, दरदिवशी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती दर्शवल्या जातील. याचाच अर्थ असा झाला की, जर पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली, तर महाग होणारा भाजीपाला आणि खाद्यपदार्थाच्या किमती इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर झळकतील. भविष्यात जर इंधनाच्या किमती कमी झाल्या तर खाद्यपदार्थांच्या किमती ग्राहकांसाठी कमी केल्या जातील. या पर्यायाला मुंबईकरांनी स्वीकारले आहे. कारण त्यांच्यापासून वाढती महागाई लपलेली नाही. पदार्थांच्या किमती वाढल्या तरी रेस्टॉरंट मालक आणि ग्राहकांत काहीही वैमनस्य दिसत नाही. कुठलाही व्यवसाय संबंधांवर चालतो. ही बाब लक्षात घेत रेस्टॉरंट मालक अनोखा फंडा अवलंबत ग्राहकांशी संबंध कायम ठेवत आहेत. रेस्टॉरंट मालक तसेच सामान्य जनता या दोघांनाही महागाईशी लढाई करावी लागत आहे, परंतु या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डच्या माध्यमातून ग्राहकांशी नाते जोडून आपला व्यवसाय सांभाळला जात आहे.
फंडा काय आहे?
कुठल्याही व्यवसायाचे यश ग्राहकांशी असणार्‍या संवादावर अवलंबून असते. तुम्ही आधुनिक पद्धतीने संवाद साधत असाल तर ग्राहकांशी संबंध आणखी दृढ होतील. याचाच अर्थ तुमच्या व्यवसायात घट होण्याऐवजी वृद्धी होणार हे निश्चित.