आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांच्या धूमशानात भाजपला भोवळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला जेमतेम दोन दिवसही शिल्लक नव्हते. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बंडखोरी करणारे उच्च शिक्षण राज्यमंत्री शारदाप्रताप शुक्ल यांना डच्चू दिला. परंतु शुक्ल हे एकटेच बंडखोर नाहीत. ही संख्या एक डझनाच्या वर गेली आहे. यात भरीस भर म्हणजे सपा-काँग्रेस युतीला न जुमानता २४ हून अधिक जागांवर काँग्रेस आणि सपाचे उमेदवार स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. 
 
सपामध्ये बंडखोरीने नाकीनऊ आणले असताना भाजपमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. तेथेही मोदी-शहांच्या दराऱ्याला भीक न घालता इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. काही ठिकाणी नाराज इच्छुकांच्या समर्थकांनी खोडा घालणाऱ्यांच्या प्रतिमा जाळल्या आहेत. देवरिया मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्रांच्या विरोधात जाहीरपणे अपशब्द बोलले गेले आहेत. आक्रमकपणे फलकबाजी झाली आहे. फैजाबाद मतदारसंघात तर नाराज कार्यकर्त्यांची मजल खासदार लल्लूसिंगांचे हातपाय दोरखंडाने बांधण्यापर्यंत गेली आहे. शिस्तप्रिय, नैतिकाग्रही म्हणून बोलबाला असलेल्या भाजपची ही अवस्था लाजिरवाणी म्हणायला हवी. मात्र या अवस्थेचे मूळ कारण अर्थातच २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश ठरले आहे. या यशामुळेच आपली उमेदवारी पक्की आहे, असे जुनेजाणते कार्यकर्ते समजून चालले. या कार्यकर्त्यांकडूनच सर्वाधिक तिकिटाच्या मागण्या आल्या. मात्र २०१४ च्या विजयानंतर भाजपमध्ये दाखल होणाऱ्यांचीसुद्धा मोठी रीघ लागली. दोन वर्षांच्या सेवेनंतर हे लोकही तिकिटाचे दावेदार बनले. यापलीकडे जाऊन भाजपच्या नेतृत्वाने विजयाची पक्की खात्री असलेल्या काँग्रेस-बसपामधल्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात उदारहस्ते प्रवेश दिला. यात मुख्यत: विद्यमान आमदारांचा समावेश होता. याच लोकप्रतिनिधींकडून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आमिष दाखवून क्रॉस व्होटिंग करवले गेले होते. इतकेच नव्हे तर पक्षातल्या सर्व इच्छुकांना गेल्या एक वर्षापासून पक्षाने आयोजित सभा-संमेलनात समर्थकांसह नियमित आमंत्रित केले होते. आता हेच सारे दुखावलेले इच्छुक भाजपच्या नावाने ठणाणा करताना दिसताहेत. 

घराणेशाहीची भाजपला चीड असल्याचे चित्र आजवर मोठ्या त्वेषाने रंगवले गेले आहे. पंतप्रधान मोदींनीसुद्धा पक्षात घराणेशाहीला थारा नाही म्हणत नातेवाइकांना उमेदवारी देऊ नका, असे जाहीरपणे बजावले आहे. परंतु उ. प्रदेशातली आजची स्थिती ही आहे की, भाजपचा असा क्वचितच एखादा बडा नेता आहे, ज्याच्या नातेवाइकाला, जवळच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळालेली नाही. कल्याणसिंहांचा नातू, राजनाथसिंह, लालजी टंडन, ओमप्रकाश सिंह यांच्या मुलांना तर हुकूमसिंह यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली आहे. बड्या नेत्यांच्या प्रभावामुळे २४ हून अधिक जागांवर पक्ष कार्यकर्त्यांना उमेदवारीला मुकावे लागले आहे. 

उमेदवारीवरून पक्षांतर्गत घमासान सुरू असतानाच गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने आणखी एका पक्षांतर्गत संकटाला भाजपला सामोरे जावे लागले आहे. राज्याच्या पूर्वोत्तर भागावर मजबूत पकड असलेले आदित्यनाथ हिंदू युवा वाहिनीचेही संस्थापक आहेत. या संघटनेलाही उमेदवारी मिळण्याच्या मोठ्या आशा होत्या. खुद्द आदित्यनाथ २० ते २५ जागांवर आपल्या पसंतीचे उमेदवार उभे करू इच्छित होते, परंतु त्यांच्या वाट्याला सहाच तिकिटे आली आहेत. या गोंधळात युवा वाहिनीचे काही कार्यकर्ते उघड उघड आदित्यनाथांच्या विरोधात बंडखोरी करताना दिसत आहेत. म्हणजे एका बाजूला स्टार प्रचारक म्हणून आदित्यनाथ पश्चिमी उत्तर प्रदेशात आग्यावेताळ रूप धारण करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या संघटनेत विरोधाचा भडका उडालेला आहे. या भडक्यात योगी आदित्यनाथांनी वाहिनीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलसिंह आणि प्रदेश महामंत्री राम लक्ष्मण यांना १६ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवल्याबद्दल संघटनेतून बडतर्फ केले. त्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. संतापलेले सुनीलसिंह आणि राम लक्ष्मण यांनी थेट मराठी बाण्याच्या शिवसेनेशी संपर्क साधून पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर ५० जागी उमेदवार जाहीर केले आहेत. कालपर्यंत उ. प्रदेशात बहुमताचा दावा करणारा सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता आज तिकीटवाटपाने उ. प्रदेशात पक्षाचा सत्यानाश केला म्हणत गरळ ओकत आहे. 

या सगळ्या धुमश्चक्रीत उ. प्रदेशात तिरंगी लढत होत आहे. यात मुस्लिम संघटनांनी ९७ जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करणाऱ्या मायावतींच्या बसपाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  मुस्लिम मतांचा मोठा हिस्सा बसपाकडे गेला तर मुस्लिम-दलित मतांच्या जोरावर बसपा बाजी मारण्याची चिन्हे आहेत. पण हीच मते सपा-काँग्रेसकडे गेली तर परिणाम उलटा होणार हेही तितकेच स्पष्ट आहे. या क्षणी मुस्लिम मते सपा-बसपा-काँग्रेसमध्ये विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, पण ती शक्यता अत्यल्प आहे. 

वस्तुस्थिती ही आहे की, अखिलेश सरकारच्या विरोधात जनमत दिसत नाही आणि भाजपच्या अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप तरी ध्रुवीकरण झालेले नाही. २०१४च्या निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान करणारा जाट समूह राष्ट्रीय लोकदलाकडे सरकल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खरी लढत सपा-काँग्रेस आणि बसपा यांच्यातच होताना दिसते आहे. केंद्रातला सर्वशक्तिमान भाजप उत्तर प्रदेशात तिसऱ्या क्रमांकाची लढाई लढत आहे.
 
manoj.singh2171@gmail.com
 
 
 
बातम्या आणखी आहेत...