आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यमवर्गाची मतलबी अस्वस्थता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात उपेक्षित प्रजा कोणती असं उद्या जर मला कुणी विचारलं तर मला नाइलाजाने बोट स्वत:कडे वळवून घ्यावे लागेल. हे विधान करताना मी माझ्या पाठीशी असलेल्या थोड्या का होईना आंतरराष्‍ट्रीय अनुभवाचे स्मरण करीन. कारण या आंतरराष्‍ट्रीय अनुभवात (अमेरिकेत राहण्याचा) मला अनेक देशांतील माणसं भेटली. त्यातील कुणी आशियाई देशातील होते तर कुणी ऑस्ट्रेलियातील. कधी कुणी गरीब आफ्रिकन तर कधी युरोपातल्या गरीब देशातील लोक! आणि यांच्या जोडीला अर्थात अमेरिकेतील सामान्य माणसं! त्यांच्याशी बोलताना जाणवलं की त्यांच्या देशात असंख्य समस्या आहेत. बहुतेक समस्या तर आपल्या विचारांच्या पलीकडल्या! परंतु आपण आपल्या देशाचा आणि सरकारचा ज्या वृत्तीने आणि ज्या पद्धतीने उल्लेख करतो तसा उल्लेख ती लोकं अजिबात करत नाहीत.

हे लोक कोण आहेत? तर यातील बहुतांश आहेत भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय. आपल्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बँकेकडून ‘लोन’ घेऊन आपल्याला परदेशात पाठवू शकत असणारे लोक. हे असं का व्हावं? याचे कारण भारतात पण तीच परिस्थिती आहे. नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणांच्या नंतर देशाच्या आर्थिक क्षितिजावर एक वर्ग उदयास आला. या वर्गाला काही वर्षांनी झालेल्या आयटीच्या क्रांतीने अधिक आर्थिक बळ प्राप्त करून दिले. कॉलेज संपल्या-संपल्या लठ्ठ पगाराची नोकरी पदरात पडू लागली आणि नंतर काही वर्षांत स्वत:चे घर आणि नंतर गाडी असे योजनाबद्ध कार्यक्रम हा वर्ग राबवू लागला. पुढे या वर्गाने परदेशी शिकण्यास आणि तेथेच नोकरी करण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे भारतातून अमेरिकेत जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली. ही मुलं तिकडे जाऊन तिथल्या वस्तुस्थितीचा अभ्यास न करता तिथे झालेल्या ‘प्रगती’ ची स्तुती करू लागली आणि त्यातून जन्माला आला भारतातील सर्वात मोठा विरोधाभास - ‘आपल्या देशात गेल्या साठ वर्षांत काहीच प्रगती झाली नाही’, असं ओरडून सांगणारा हा स्वत: समृद्ध झालेला वर्ग!

परंतु खरंच असं झालंय का? आपल्या या देशात खरंच काहीच झालं नाही का? या वर्गातील लोकांची भाषा ऐकली तर हेच ऐकू येते, परंतु या लोकांना गेल्या साठ वर्षांत आपल्या देशात रुजलेली लोकशाही दिसत नाही! (आपला कुठलाच शेजारी देश हे साध्य करू शकलेला नाही.) एकेकाळी अन्नधान्याचा तुटवडा असलेला हा देश आज स्वत:चे पोट भरता येण्याएवढे धान्याचे उत्पादन करू शकतोय ही बाब लोकं विसरली आहेत. अणुऊर्जेच्या क्षेत्रात झालेली क्रांती आणि घराघरांत-प्रत्येकाच्या हातात पोहोचलेले फोन या लोकांच्या कदाचित स्मरणात नाही. हां, साठ वर्षांत आरक्षणाच्या धोरणामुळे ज्या अनेक उपेक्षित लोकांचे जीवन समृद्ध होऊ शकले किंवा होण्याच्या मार्गावर लागले ही गोष्ट या वर्गातील लोकांच्या लक्षात येणार नाही, हे मी समजू शकतो. कारण, बहुतेक लोकांचे या गोष्टीकडे लक्षच नसते, परंतु देशाची प्रगती होताना ज्या वर्गाने स्वत:च्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करीत नवे घर आणि गाड्या घेण्यापर्यंत झेप घेतली तोच वर्ग आज म्हणतोय की आपली काहीच प्रगती नाही झाली! त्यामुळे सरकारला शिव्या घालणे आणि ज्या एका पक्षाने आपले सरकार या साठ वर्षांत बहुतांश वेळेस दिले त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घालणे आणि पर्यायाने गांधी घराण्याला आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना -जवाहरलाल नेहरू यांना ‘देशाची अधोगती झाली’ या कारणाने नावं ठेवणे यांत हा वर्ग रमतो!

गेल्या दोन वर्षांमध्ये या वर्गाला एक नवा नायक सापडला आहे. या नायकाचे नाव आहे नरेंद्र मोदी. तसं जाहिरातबाजीसमोर नतमस्तक होणे हे आपल्या मानसिकतेत आहेच, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने हा मध्यमवर्ग मोदींच्या जाहिरातबाजीने प्रभावित होतो आहे आणि देशाच्या उज्ज्वल (?) भविष्याची स्वप्न पाहतो आहे ते मात्र नक्कीच चिंताजनक आहे! माझ्यासारखे जे तरुण आज वयाची पंचविशी ओलांडलेले आहेत त्यांनी या देशात ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग’चा झालेला प्रसार पाहिला आहे, त्याचा नेमका फायदा मोदींनी घेतलेला आहे. मोदींची ‘पीआर एजन्सी’ त्यांच्या प्रमोशनवर दिवसरात्र मेहनत करीत असते. गुजरात मॉडेलचे फोटो किंवा त्याची माहिती देणे पूर्वी केले जात असे, पण आता त्याची जागा उग्र राजकारणाने घेतलेली आहे. एका बाजूला गुजरातची प्रगती म्हणून कुठल्याशा ‘चायनीज’ शहराचे फोटो टाकले जातात तर दुसरीकडे कॅलिफोर्नियामध्ये एका नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांचे किंवा पाकिस्तानातील दंगलीचे व्हिडिओ-फोटो भारतात घडले आहे, असे खपवून लोकांच्या भावना भडकावल्या जातात. हिंदू आणि मुसलमान यांचे वर्णन करताना ‘ते’ आणि ‘आपण’ ही भाषा अगदी हमखास वापरली जाते! एवढ्याने मोदी समर्थकांचे समाधान होत नाही. जे कुणी मोदींच्या विरोधात बोलतात त्यांचा एकंदर सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा काय हे समजून न घेता त्यांच्यावर शिवीगाळ केली जाते आणि अश्लील शब्दांत टीका केली जाते. काही दिवसांपूर्वी जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि सध्या कर्नाटकातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अनंतमूर्ती यांच्याबद्दल काय भाषा वापरली जाते, हे इथे न लिहिलेलेच बरे!

परंतु मला सर्वात जास्त आश्चर्य वाटते ते या सगळ्या गोष्टींचे समर्थन करणार्‍या मध्यमवर्गाचे आणि उच्च मध्यमवर्गाचे! यातले किती जण प्रत्यक्ष गुजरातमध्ये गेले आहेत माहिती नाही, परंतु जी माहिती या ‘पेजेस’मध्ये झळकते ती माहिती लगेच पसरवली जाते, शेअर केली जाते. अर्थात या गोष्टींच्या मागे वर्षानुवर्षे मनावर लादलेला काँग्रेसद्वेषदेखील कारणीभूत आहेच! परंतु हे लोक गुजरातच्या खेड्यापाड्यात गेले आहेत का? गुजरातची प्रगती सर्वसमावेशक आहे याची खात्री या लोकांनी केली आहे का? गुजरातमध्ये छोटे उद्योग टिकून आहेत का? की फक्त बड्यांचे लाड होतात? आणि गुजरातमध्ये प्रगती खरोखर झाली आहे तर ‘कुपोषणाच्या प्रश्नावर’ गुजरात पिछाडीवर का? मानव विकास निर्देशांकमध्ये गुजरात मागे का? या वर्गातील लोक परदेशातील प्रगतीचे फार कौतुक करतात आणि आपल्या देशाला नावं ठेवतात, परंतु परदेशातील प्रगती ही सर्वसमावेशक नाही हे या लोकांना माहिती आहे का?

या सर्व गोष्टी विचार करून मांडण्याच्या आहेत आणि नेमके हेच होत नाही, परंतु ज्या प्रकारे मोदींना विरोध करणार्‍या लोकांबद्दल सोशल मीडियामध्ये बोलले जाते त्यावरून एवढेच जाणवते की आजचा मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग हा अत्यंत आपमतलबी आणि स्वकेंद्रित होत चाललेला आहे! आणि चिंता करायचे सर्वात मोठे कारण हेच आहे!
(gune.aashay@gmail.com)