आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Mobile Networking, Communication Steps

संपर्क क्रांतीचा दुसरा टप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलरेट्सने ग्राहकांना आकर्षित करून नफा कमवायचे टेलिकॉम कंपन्यांचे दिवस आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. ग्राहकांचा मोबाइल इंटरनेटचा वाढता वापर बघता कॉलरेट प्लॅनची जागा आता इंटरनेट रेट प्लॅन (टूजी, थ्रीजी) घेऊ पाहत आहेत. किंबहुना त्यांनी ती जागा घेतलीदेखील आहे. यामध्ये मोफत फेसबुकपासून ते इंटरनेट आणि स्मार्टफोनने सज्ज असलेल्या बसेसच्या माध्यमातून ग्राहकांना सर्फिंगचा अनुभव देणाºया नवनवीन योजना टेलिकॉम कंपन्या राबवत आहेत.

इंटरनेट युगाचा जन्म लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅनच्या माध्यमातून म्हणजेच केबल इंटरनेटच्या माध्यमातून झाला. सुरुवातीला कार्यालये आणि नंतर घरोघरी केबल नेटची कनेक्शन्स घेतली जाऊ लागली. अर्थात केबल नेटला काही मर्यादा होत्याच, ज्यामुळे कामासाठी संगणकासमोर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. दूरवर ग्रामीण आणि डोंगराळ भागात केबल नेट न मिळणे हीदेखील मोठी समस्या होती. नंतर आलेल्या वायरलेस इंटरनेटने यावर तोडगा निघाला, तरी तो फारच मर्यादित स्वरूपाचा होता. केबल नेट आणि वायरलेस नेटने ग्राहकांचे प्रश्न सुटले असे नाही. त्यांना या तंत्रज्ञानाशी तडजोड करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर मोबाइल इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे या सर्व अडचणींवर मात केली. मोबाइल इंटरनेटच्या आगमनामुळे आपण एका नव्या आणि विविध पैलू असलेल्या संपर्क क्रांतीला सामोरे जात असून जगाच्या कुठल्याही कोपºयातून एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. टेलिकॉम कंपन्याही तंत्रज्ञानामध्ये विकास साधत वाढती स्पर्धा यांचा ताळमेळ साधत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे डेटा प्लॅन्स निवडू देण्याची मुभादेखील कंपन्या देऊ लागल्या आहेत. जनजागृती करणाºया मोहिमाही हाती घेतल्या जात आहेत.

यापैकीच एक मोहीम सध्या क्रांतिकारी ठरत आहे, या मोहिमेअंतर्गतच्या योजनेत ग्राहकाला एका रुपयात व्हिडिओ पाहायला मिळतोय. इतक्या स्वस्त आणि किफायतशीर योजनेमुळे पहिल्यांदा इंटरनेटचा अनुभव घेऊ पाहणारा भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणात मोबाइल इंटरनेटकडे वळलाय. व्हिडिओ दिसत असल्याने गेल्या वर्षी सुमारे 22 कोटी ग्राहक मोबाइल इंटरनेटकडे वळले आहेत. त्यापैकी 12 कोटी ग्राहकांनी व्हिडिओची सेवा घेतली आहे. या ग्राहकांपैकी 4 कोटी ग्राहक हे इंटरनेट वापरणारे नवे ग्राहक असून सुमारे 2 कोटी ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत हे विशेष.

इंटरनेटच्या प्रसारामुळे टेलिकॉम कंपन्यांनी इतर महत्त्वाच्या योजनाही हाती घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये गुगल आणि फेसबुकचे फ्री झोन्स तयार करण्यात आले असून प्र्री-पेड ग्राहकांना मर्यादित स्वरूपात या योजनांचा लाभही घेता येणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांच्या गरजांचा विचार करून दोन्ही प्रकारे योजना कंपन्यांकडून राबवल्या जात आहेत.

ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचे कंपन्यांचे प्रयत्नही तितकेच जोरदार आहेत. ‘रोटो’ स्टोअर्स म्हणजेच रिटेल आॅफ टुमॉरोच्या माध्यमातून ग्राहकाला त्याच्या सोयीनुसार आवडणारे प्लॅन देणे, त्यांना मोबाइल इंटरनेट वापराबाबत माहिती देणे, महत्त्वाची अ‍ॅप्लिकेशन्स शोधून देणे अशा मूलभूत सेवा देण्यावर कंपन्यांचा आता अधिक भर आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाइल इंटरनेट बसेसदेखील सुरू केल्या आहेत. यात प्रामुख्याने दुसºया आणि तिसºया दर्जाच्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्‍ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत इंटरनेटविषयी उत्सुकता असणारा ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या ग्राहकांना मोबाइल इंटरनेट बसच्या माध्यमातून प्रात्यक्षिके आणि मोफत इंटरनेट वापराची मुभा देण्यात येतेय. ग्राहकही ही उत्सुकता शमविण्यासाठी आभासी जगाची सैर करत आहेत. मोबाइल इंटरनेट बसच्या माध्यमातून ग्राहकांना बाहेरच्या जगाशी संवाद साधता येतोय, अनभिज्ञ असलेल्या गोष्टी जाणून घेऊन आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ग्राहकांना मिळतोय.

महाराष्‍ट्र, गोवा आणि राजस्थानच्या ग्रामीण भागांत मोबाइल इंटरनेट व्हॅन आणि लहान मुलांसाठीच्या खास योजनेमार्फत शिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. अर्थात यासाठी लागणारे साहाय्य इतर कंपन्यांकडून घेतले जाते, पण त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे. हे सर्व करत असताना नफ्या-तोट्याचे गणितही कंपन्या साधताना दिसत आहेत. स्वस्त कॉल दर उपभोगणारा ग्राहक आता स्वस्त इंटरनेटचीही अपेक्षा करतोय. अर्थातच नफ्याचा मुख्य स्रोत मोबाइल इंटरनेट हा असल्याने कमी दरात योजना उपलब्ध करून देणे टेलिकॉम कंपन्यांसाठी अडचणीचे ठरेल. मोबाइल इंटरनेटचे दर वाढवणार असल्याचे संकेत मुख्य कंपन्यांनी आधीच दिले आहेत. तसे दरही त्यांनी लागू केले आहेत. ग्राहकांना याची प्रचिती यायला सुरुवात झालीच आहे. असे असले तरी वापरकर्त्यांचे प्रमाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे दर निश्चित कमी करता येतील, अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही.
(tusharbhamre@gmail.com)