आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरातत्त्वीय लूट रोखण्याची आस्था कुठेय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत पुरातत्त्वीयदृष्ट्या अनमोल अशा मूर्तींच्या चोरट्या निर्यातीचे रॅकेट उघड झाले. विदेशी नेऊन त्या लिलावांत विकण्याची रांगेत व्यवस्था लावणारा विजय नंदा याची गोदामे पकडली गेली. या वस्तू त्याच्याकडे आल्या कुठून? अमकी मूर्ती किंवा शिल्प पुरातत्त्वीय महत्त्वाचे आहे की नाही हे ठरवणारी एक समिती असते. कुणा एखाद्या व्यक्तीवर वस्तू बिनमहत्त्वाची ठरवण्याची जबाबदारी नसते, तरीही काही महत्त्वाच्या पुरातत्त्वीय महत्त्वाच्या वस्तू बिनमहत्त्वाच्या असल्याचे नॉन-अँटिक्विटी प्रमाणपत्र कसे काय दिले जात असेल? तसे ते दिले जाते की ती फोर्जरी असते, असेही अनेक प्रश्न या चोरट्या व्यवहारांच्या संदर्भात पडतात. लोकांना हेच अपेक्षित असेल की हे सारे शासकीय यंत्रणेने थांबवले पाहिजे. 

या पुरावस्तूंच्या चोरट्या व्यापारात लोक यशस्वी होतात- क्वचितच पकडले जातात ते डीआरआयच्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळे. याचे मुख्य कारण आहे पुरातत्त्वाचे ज्ञान, संवर्धन, पुरावस्तूंचे महत्त्व जाणण्याबद्दल जनतेत असलेली अनास्था.  या अनास्थेवाईक जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी, नोकरशाही वगैरे मंडळींच्यात तीच अनास्था बव्हंशी दिसते. विदेशात बारीकसे काहीही पुरातत्त्वीय महत्त्वाचे असले तर त्याच्या रक्षणासाठी, माहिती देण्यासाठी एक यंत्रणा राबू लागते. लोकांना हा वारसा कळावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न होतात. आपल्याकडे जुन्या वस्तू काय पैशाला पासरी-त्याची किंमत ती काय असाच भाव असतो. 

अलीकडेच अंबाजोगाई येथे रेणुकामंदिराच्या परिसरात ‘स्वच्छ भारत अभियानासाठी जेसीबी लावून सीताफळाचे झाड उपटत असताना’ जुन्या मूर्ती, मंदिरांचे अवशेष, कोरलेले दगड सापडले. स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी जेसीबी लावणे हेच मुळात शंकास्पद वाटते. स्वच्छ भारतासाठी सीताफळाचे झाड उपटायचा प्रयत्न होतो हे तर हास्यास्पदच आहे; पण फार मोठ्या प्रमाणावर पुरावशेष सापडताच तिथे जो काही बांधकामाचा प्रयत्न चालला होता त्यावर झाकण टाकून निदान पुरावशेष राखले गेले, हेही नसे थोडके. काही वर्षांपूर्वी कोकणात दिवेआगर येथील सोन्याचा गणपती चोरीला गेला तेव्हाही हा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण आपल्याकडे प्रश्न ऐरणीवर येतात आणि मग लवकरच ऐरणी मोडीतही काढल्या जातात. जनतेची अनास्था अधिक शासकीय बेपर्वाई, अधिक विद्याक्षेत्राची तोकडी आस्था अशा गुणत्रयीतून पुरातत्त्वाचे वनवास सुरू राहतात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाला वीस वर्षांनंतर पुरातत्त्व विषयाची गुणवत्ता आणि अनुभव असलेले पूर्णवेळ संचालक नुकतेच नेमण्यात आले. गेली वीस वर्षे हा विभाग संचालकांविना, एखाद्या नोकरशहाच्या नेतृत्वाखाली सुरू होता. तरीही काम करत होता. हातपाय बांधून पळा आता अशी अवस्था होती. या राज्यातील १६० वर्षे जुन्या मुंबई विद्यापीठात अजूनही स्वतंत्र पुरातत्त्व विभाग उभा राहिलेला नाही. डेक्कन कॉलेज- अभिमत विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ येथे पुरातत्त्व अभ्यासाची शक्तिशाली केंद्रे आहेत. त्यांनी निधीची कमतरता असूनही विद्वान संशोधकांच्या सोबतीने अत्यंत कठीण परिस्थितीतही पुरातत्त्व विषयातील अध्यापन आणि संशोधन जोमाने सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रापुरते जे खरे आहे ते देशपातळीवरही खरे आहे, असे समजून चालायला हरकत नाही. अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय महत्त्वाचे अवशेष सापडतात. अनेक ठिकाणी चोरट्यांना खुणावणारी शिल्पे असतात. संशोधनानंतर सापडलेल्या सर्व शिल्पांचे किंवा अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी ही विद्याकेंद्रे सक्षम नसतात, कारण संशोधनासाठीच जेमतेम पैसा मिळत असतो, तर पुढे ते काय करणार? 

जेथे-जेथे पुरातत्त्वीय उत्खनन सुरू होते, तेथे-तेथे त्या भागातील काही व्यक्ती जुन्या वस्तूंच्या विक्री व्यवहारात थेट सहभागी होतात, यात भ्रष्ट पुरातत्त्व जाणकारही सहभागी होतात आणि त्यांना कुणीही हात लावू शकत नाहीत. कालीबंगनसारख्या हरप्पन उत्खननातील वस्तूही बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय महत्त्वाचे कोरीव दगड, धुण्याचे दगड, बसण्याचे दगड, पायरीचे दगड, जोत्याचे दगड, पूर्ण वाडाबांधणीचे दगड म्हणून वापरण्यात आले आहेत. जुन्या बांधकांमांत विटा सापडल्या तर सर्व विटा नव्या बांधकामांत वापरल्या जातात. तिथली पांढरमाती बांधकामाला चांगली म्हणून उकरली जाते. जुनी नाणी मिळाली, सोन्या-चांदीची असली तर स्थानिक राजकारणातल्या दादा-ताईंकडे ती जातात वा वितळवली जातात. नाण्यांमधून इतिहास उलगडतो हे कुणालाच  महत्त्वाचे वाटत नाही. शिल्पांना ऑइलपेंट फासून वाट लावण्याचे धर्मकार्य तर सर्वत्र चालते. 
बाहेर जाणाऱ्या पुरातत्त्वीय महत्त्वाच्या वस्तू वाचवण्यासाठी व्यवस्थेत ठाण मांडून बसलेल्या भ्रष्टाचाराची बिळे बुजवणे फार लांबचा पल्ला आहे; पण जे इथेच आहे त्याच्या संवर्धनाचे काय? दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या-ज्या गावांच्या चतुःसीमांमध्ये पुरातत्त्वीय अवशेष सापडतात ते अवशेष त्या-त्या गावात छोटी संग्रहालये निर्माण करून जतन केले जावेत, या दिशेने एक पाऊल उचलले. असे करणाऱ्या पंचायतींना आर्थिक पाठबळ देण्याची लाक्षणिक तरतूदही झाली. नंतर ते सारे कागदावरच राहिले. पुरातत्त्व विषयाचे महत्त्व औपचारिक शिक्षणापलीकडे जाऊन लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून विशेष प्रयत्न व्हावेत. तरच लोक असल्या चोऱ्या थांबवण्यात सहभागी होतील.  

mugdhadkarnik@gmail.com 
(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या प्रमुख आहेत.)
बातम्या आणखी आहेत...