आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारविरोधाचा तमाशा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार विरोध हे भंपकपणाचं कसं उत्तम उदाहरण आहे, हे जयललिता यांच्या मृत्यूनं दाखवून दिलं आहे. भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचं ठळक प्रतीक म्हणजे जयललिता. त्यांच्याकडं किती संपत्ती होती? कर्नाटक उच्च न्यायालयानं जयललिता यांना जेव्हा दोषी ठरवलं, तेव्हा जी संपत्तीची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती, त्यात १०,५०० भरजरी साड्या, ७५० चपलांचे जोड, १५० किलो सोने अशा नोंदी होत्या. आज जयललिता ऊर्फ अम्मा यांच्या उत्तराधिकारी म्हणून ज्या शशिकला नटराजन ऊर्फ चिन्नम्मा यांच्या पायावर अण्णा द्रमुकचे आमदार लोळण घेत आहेत, त्यांच्या मुलाच्या लग्नात १९९५ साली जयललिता यांनी अमाप पैसा खर्च केला होता. जयललिता व शशिकला या दोघींची डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या दागिन्यानं मढलेली छायाचित्रं आजही उपलब्ध आहेत. याच लग्नानंतर त्यांच्यावर खटला लावण्यात आला.

अशा या जयललिता यांचा मृत्यू झाला आणि भ्रष्टाचार निपटून काढण्याचं कंकण बांधलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी जयललिता यांच्या ‘महानपणा’चे गोडवे गाण्यास सुरुवात केली. त्यांची दृरदृष्टी, त्यांची जनहिताची प्रेरणा इत्यादी भूषणं त्यांना बहाल करण्याची स्पर्धाच लागलेली बघायला मिळाली. प्रसारमाध्यमांनीही त्याला हातभार लावला. मात्र जयललिता या भ्रष्ट व एकाधिकारशाहीचा कारभार करीत होत्या, याबद्दल एक अवाक्षरही कोणी काढावयास तयार नव्हतं. जयललिता यांच्या भ्रष्टाचारी कारभाराचा प्रश्न निघाला की, त्या निवडून आल्या, त्यांच्या मागं लोक आहेत, असंही सांगितलं जात आलं आहे. नेमकी येथेच खरी गोम आहे. जयललिता यांच्या मागं लोक होते, यात वादच नाही. त्यांनी जे लोकानुनयी-लोकप्रिय नव्हे-कार्यक्रम अमलात आणले, त्यामुळं लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत गेले. म्हणजे जयललिता यांनी लोकांची गरिबी कमी व्हावी, यासाठी त्यांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाती नवनवी कौशल्यं यावीत, त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचा दर्जा सतत उंचावत राहावा, यासाठी काहीही केलं नाही. ज्या काही नेहमीच्या सरकारी योजना व कार्यक्रम आहेत, ते त्यांनी राबवले इतकंच. मात्र ‘अम्मा’ या ‘ब्रँड’खाली इडली, दहीभात इत्यादी अन्नपदार्थांपासून ते गृहोपयोगी वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी अगदी माफक दरात जनतेला उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रम त्यांनी राज्यभर राबवले. ज्या लोकांच्या हाताला कामच नाही आणि ज्यांना दोन वेळच्या जेवणाची - मग औषधोपचार, शिक्षण इत्यादी दूरच राहिलं - भ्रांत आहे, त्यांच्या दृष्टीनं जयललिता या देवदूतच ठरल्या होत्या. साहजिकच त्या किती भ्रष्ट आहेत किंवा त्या एकाधिकारशाही कारभार करतात, याच्याशी लोकांना काही देणंघेणंच नव्हतं. आपल्याला जेवूखाऊ घालणारी, जीवनावश्यक वस्तू पुरवणारी ही ‘अम्मा’ कशी आहे, हे कशाला लोक पाहतील?

थोडक्यात, जयललिता ‘लोकप्रिय’ होत्या त्या त्यांच्या ‘लोकानुनयी’ कार्यक्रमांमुळं. आज आता शशिकला ऊर्फ चिनम्मा त्यांची जागा घेऊ पाहत आहेत, त्यामागं जयललिता यांच्याशी असलेला तीन दशकांचा सहवास हे कारण आहे. शिवाय अफाट संपत्ती हे मुख्य कारण आहेच. मुद्दा इतकाच आहे की, जयललिता भ्रष्ट असूनही लोकप्रिय होत्या, मतदार त्यांना निवडून देत होते. कारण जनतेच्या दृष्टीनं ‘भ्रष्टाचार’ हा मत देण्याचा निकष कधीच नसतो. यापूर्वीही नव्हता व आजही नाही आणि पुढंही असणार नाही. भ्रष्ट, पण लोकानुनयी कार्यक्रम अमलात आणणारा कारभार हेच ‘मॉडेल’ आपल्या देशातील नेत्यांना ‘लोकप्रिय’ बनवत आले आहे. जयललिता हे केवळ ठळक उदाहरण होतं. कोणताही प्रादेशिक वा राष्ट्रीय स्तरावरच नेता जरी घेतला, तरी त्यांच्या पांढऱ्या झब्ब्यावर भ्रष्ट कारभाराचे मोठे पट्टे पडलेले आढळून येतील.

जनतेला गरीब ठेवायचं, आपण गडगंज संपत्ती गोळा करायची, मग जनतेच्या गरिबीच्या नावानं गळा काढत स्वस्तात अन्नपदार्थ व वस्तू देण्याचे कार्यक्रम आखायचे, ही कारभाराची पद्धतच पडून गेली आहे. जनतेच्या हाताला काम देण्यासाठी सचोटीनं व न्याय्य पद्धतीनं कारभार करून, रोजगार निर्मितीच्या योजना राबवून लोकांना सक्षम बनवणं, हा खरा ‘विकास’ करण्याची कोणाचीच तयारी नाही. कारण त्यासाठी प्रस्थापित हितसंबंध मोडावे लागतात. ते मोडले, तर सध्या राजकारणात पडलेली ‘पंचतारांकित’ लग्नांची रीत मोडली जाणार नाही काय? आमदार-खासदारकीच्या पहिल्या ‘टर्म’मध्येच कोट्यधीश कसे होता येईल? महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांच्या हाताला असलेली मनगटी घड्याळं आणि त्यांच्या खिशाला लावलेली पेनं ही जरी नुसती विकली, तरी काही कोटी रुपये जमा होऊ शकतात. ज्यांची दुचाकी वाहन ठेवायची क्षमता नव्हती, त्यांच्याकडं या वस्तू येऊ शकल्या असत्या काय? त्यापेक्षा गरिबांच्या नावानं गळे काढत, भ्रष्टाचार विरोधाच्या घोषणा देत भुकेल्या जनतेच्या हातात अन्न व वस्त्रं टाकत राहणं जास्ती सोपं नाही काय?

म्हणूनच भ्रष्टाचारविरोधाचा सध्याचा माहोल हा निव्वळ तमाशा आहे. ‘मेरी कमीज सबसे झागदार’ असं दाखवण्यात मोदी २०१३ पासून वाकबगार ठरत आले आहेत एवढंच.
प्रकाश बाळ
ज्येष्ठ पत्रकार prakaaaa@gmail.com
बातम्या आणखी आहेत...