आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Rahul Yewale On Sinus Problem, Divya Marathi

औषधी चिकित्सा पथ्यापथ्यानेच सायनसचा पुनरुद्भव टाळता येतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्‍याच जणांकडून आपल्याला ऐकायला मिळते की, ‘मला सायनसचा प्रचंड त्रास होतो. खूप औषधी घेऊन झाल्यात, बरेच दवाखाने पालथे घातलेत पण अजिबात आराम मिळत नाही. आता अक्षरश: मी या सायनसच्या विकाराने बेजार झालोय. कामातही लक्ष लागत नाही. दैनंदिन जीवनातही याचा सर्वच बाजूने अतिशय त्रासदायक परिणाम झालाय.’
अशा सायनसच्या त्रासाने त्रस्त असणार्‍या रुग्णांसाठी अतिशय यशस्वी व परिपूर्ण इलाज आयुर्वेद चिकित्सेमध्ये केला जातो. हे सांगताना अतिशय आनंद होतो. काही रुग्णांनी या सायनस आजारापुढे हात टेकलेत, तसेच ते यावर इलाज करत करत जीवन जगत असतात. अशा बेजार झालेल्या रुग्णांना आयुर्वेद चिकित्सा हे या व्याधीमध्ये एक वरदान ठरत असते.

बोलीभाषेमध्ये, वरचेवर वापरला जाणारा सायनसचा त्रास हा शब्द म्हणजे वैद्यकीय भाषेत सायनुसायटिस sinusitis हा व्याधी होय. हा व्याधी समजून घेताना प्रथम आपणास सायनस म्हणजे नेमके काय? हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. सायनस शब्दाचा अर्थ पोकळी असा होतो. या व्याधीमध्ये कवटीमध्ये नाकाच्या हाडाशी संलग्न असणार्‍या हाडांमधील पोकळी अपेक्षित आहे. काही कारणास्तव या हाडांच्या पोकळीला आलेली सूज म्हणजे सायनुसायटिस होय.

व्याधीमुळे रचनात्मक व क्रियात्मक दोन्ही कार्यप्रणाली बाधित होतात :
हा एक जीर्ण स्वरूपातील व्याधीप्रकार असून, यामध्ये रचनात्मक व क्रियात्मक अशा दोन्ही कार्यप्रणाली बाधित होत असतात. Erantol, Ethrnoid, sphenoid, Maxillary अशा चार पोकळ्या नाकाच्या उभयबाजूस, हाडांच्या विशिष्ट रचनेमुळे निसर्गत: तयार झालेल्या असतात. या व्याधीमध्ये चार अस्थिपोकळ्या कमी अधिक प्रमाणात बाधित होत असतात.
आयुर्वेद दृष्टिकोनातून सायनस व्याधीवर चिकित्साविचार...
- यामध्ये रुग्णाचा व्याधी इतिहास लक्षात घेता
- लक्षणांची तीव्रता
- रुग्णाचे बल, वय
- रुग्णाची प्रकृती
- व्याधीबल
- भौगोलिक परिस्थिती
- रुग्णाची जीवनशैली
- रुग्णाची प्रतिकारक्षमता

या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून चिकित्सा केली जाते. अगदी बालकापासून ते वयोवृद्धांपर्यंत सोयीची होईल, अशा औषधीची उपाययोजना केली जाते. आवश्यकतेनुरूप पंचकर्म चिकित्सेचाही वापर करण्यात येतो. या उपाययोजनेने रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यात येते.

असे पाळावेत पथ्य...
सायनसचा विकार असणार्‍या रुग्णाने आपण केवळ औषध उपचारानेच बरे होऊ व दैनंदिन जीवनात स्वत:च्या व्याधीचा, प्रकृतीचा विचार न करता, स्वच्छंदीपणे हवा तसा (चुकीचा) आहार-विहार करू नये, असे चालत नाही. औषधी चिकित्सेला पथ्यापथ्याची जोड मिळाल्यास या व्याधीचा होणारा पुनरुद्भव सुद्धा टाळता येतो.

सायनस विकाराची कारणे...
1) वारंवार होणारी सर्दी
2) वारंवार लागणारा खोकला
3) श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती कमी असणे
4) धूर, धूळ, परागकण इत्यादींची असणारी अतिसंवेदनशीलता
5) क्वचितप्रसंगी आढळणारी संबंधित हाडांमधील रचनात्मक विकृती
6) काही रुग्णांमध्ये आढळून येणारा आनुवंशिकतेचा घटक
7) सदैव एअर-कंडिशनरचा केला जाणारा अतिवापर
8) अतिथंड पदार्थांचे सेवन
9) अयोग्य आहार-विहार
10) व्यायामाचा अभाव
सायनसची लक्षणे...
1) शिरशूल - डोके दुखणे
2) शिरोगौरव - डोके जड झाल्यासारखे वाटणे
3) नेत्रशूल - डोळे दुखणे
4) नेत्रगौरव - डोळे जड पडणे
5) नेत्रस्त्राव - डोळ्यांतून पाणी येणे
6) नासावरोध - नाक चोंदणे
7) श्वास घ्यायला त्रास होणे
8) नाकाच्या परिसरीय प्रदेशात सायनसच्या ठिकाणी तीव्र वेदना जाणवणे इ.
9) वरील लक्षणांस्वरूप कामात लक्ष न लागणे, परिणामस्वरूप चिडचीड होणे