आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प प्रवृत्ती अन् लिंकन यांचे भाकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते, तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पंचेचाळिसावे राष्ट्राध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पार्टी दोघांची समान आहे. अब्राहम लिंकन अध्यक्ष झाले तेव्हा दक्षिण अमेरिकेतील अकरा राज्यांनी संघराज्यातून फुटून स्वत:चे वेगळे संघराज्य घोषित केले. जेफर्सन डेव्हिस बंडखोरांचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिका दुभंगली. अमेरिका एक ठेवण्यासाठी अब्राहम लिंकन यांना दक्षिणेविरुद्ध युद्ध करावे लागले. ते पाच वर्षे चालले. त्यात लाखो अमेरिकन तरुण ठार झाले. १८६५ मध्ये युद्ध संपले. अमेरिका एक ठेवण्यात अब्राहम लिंकन यांना यश आले. त्याची मोठी किंमत त्यांना द्यावी लागली. एप्रिल १८६५ मध्ये त्यांची हत्या झाली. जॉर्ज वाॅशिंग्टन यांना अमेरिकेचे राष्ट्रपिता म्हटले जाते. अब्राहम लिंकन यांना अमेरिका अखंड ठेवणारा महापुरुष म्हणून गौरवण्यात येते.  

लिंकन यांची भाषणे आजही गंभीर अभ्यासाचा विषय ठरतात. कारण यात तात्कालिक विषयांना स्पर्श करता करता समाजधारणेच्या महान तत्त्वांवरदेखील भाष्य असते. म्हणूनच ही भाषणे कालातीत आहेत. १७ जानेवारी १८३८ रोजी स्प्रिंगफिल्ड येथे भाषण झाले. भाषणाचा विषय होता, ‘आमच्या राजकीय संस्थाजीवनाचे सातत्य’ लिंकनचे वय त्यावेळी फक्त २८ वर्षांचे आहे. राजकारणात त्यांची प्रतिमा निर्माण झालेली नव्हती. १८६० मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले. लिंकन याचे स्प्रिंगफिल्ड येथील भाषण एकविसाव्या शतकात उदयास आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून अमेरिकेला कोणते धोके संभवतात हे सांगणारे आहे. असेही म्हणता येईल की, अब्राहम लिंकन यांनी डोनाल्ड ट्रम्प मनोवृत्तीविषयी १९३८ मध्येच सावध केले होते. 

डोनाल्ड ट्रम्प ही एक व्यक्ती आहे, तसा तो एक विचार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार अमेरिका ज्या मूल्यांवर उभी आहे, त्या मूल्यांशी संघर्ष करणारा आहे. स्वत:चे सुख शोधण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि हेच त्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच जन्मत: सर्व माणसे समान असतात. ही दोन मूल्ये अमेरिका घेऊन उभी राहिलेली आहे. अमेरिकेची राज्यघटना आणि अमेरिकेची राज्यव्यवस्था या दोन खांबांवर उभी आहे. अब्राहम लिंकन यांनी या खांबांच्या रक्षणासाठीच यादवी युद्धाचा धोका पत्करला होता. डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही खांबांखाली सुरूंग लावायला निघाले आहेत. अमेरिकेच्या मूल्यव्यवस्थेवरच डोनाल्ड ट्रम्प आघात करू पाहत आहेत. मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश बंदीचे त्यांचे धोरण, मेक्सिकोसंबंधीचे त्यांचे धोरण, पॅलेस्टाइन लोकांविषयी त्यांचे धोरण, पुतीनशी मैत्री करण्याचा त्यांचा प्रस्ताव, इराणवर निर्बंध घालण्याचा त्यांचा मानस, असे सर्व विषय अमेरिकेच्या परंपरा मोडणारे आहेत. लिंकनच्या काळी निग्रोंचा प्रश्न होता, डोनाल्ड यांच्या काळी मेक्सिकोतून घुसणाऱ्या हिस्पानिक/लॅटिनो लोकांचा प्रश्न आहे. त्यांची ही जनसंख्या कोटीच्या आसपास गेलेली आहे. 

लिंकन आपल्या भाषणात म्हणतात की, ‘अमेरिकेवर संकट कोणत्या मार्गाने येईल? कोणत्या उपायाने त्यापासून आपले रक्षण आपण करू शकू? समुद्रापलीकडील एखादा धटिंगण समुद्र पार करून आमच्यावर प्राणघातक हल्ला करील काय? ते कदापि शक्य नाही. युरोप, आशिया आणि अाफ्रिकेची सर्व सैन्यदले एकत्र झाली आणि पृथ्वीवरील सर्व साधनसामग्री त्यांनी त्यांच्या सैनिकी आक्रमणासाठी एकत्र केली आणि बोनापार्ट त्याचा सेनापती असला तरी सामर्थ्याच्या बळावर त्यांना ओहिओ नदीतील पाण्याचा घोटदेखील पिता येणार नाही. हजार वर्षे संघर्ष केला तरी हे शक्य नाही. मग कोणत्या मार्गाने संकट आमच्या मार्गावर येईल? माझे त्याला उत्तर असे की, जर हे संकट येणारच असेल तर ते आपल्यातूनच येईल. ते बाहेरून येणार नाही. जर विनाश हीच आमची नियती असेल तर आम्ही त्यांचे निर्माते असू. एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र राहू शकतो किंवा आत्मघातकीपणा करून मरू शकतो. तुम्हाला वाटेल की मी चिंतातुर झालो आहे. पण तसे नाही. मी पाहतो की आपल्यात दुर्बुद्धी असणारे अनेक जण आहेत. कायद्याविषयी अनास्था असणारे देशात पसरलेले आहेत. रानटी आणि क्रोधयुक्त भावनेतून हे घडताना दिसते. न्यायालयाच्या मवाळ निवाड्याविषयी नाराजी व्यक्त केली जाते. या प्रकारची स्थिती कोणत्याही समाजात भय वाटावे अशीच आहे.’’ 
 
अन्याय झाला असता त्याचे निवारण शासन, न्यायपालिका करील असा विश्वास लोकांच्या मनात असावा लागतो. त्याऐवजी शासन आणि न्यायपालिका आपल्या विनाशालाच कारणीभूत होणार आहेत, अशी जर भावना निर्माण झाली तर प्रचंड तुटलेपण येते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविषयी ‘न्यू यॉर्कर’ या वृत्तपत्रात फिलिप गुएरविच लिहितो, ‘डोनाल्ड ट्रम्प झुंडशाहीचे प्रतिनिधित्व करतात. ते झुंडशाहीत तेल ओतण्याचे काम करतात आणि त्याला आग लावण्याचेही काम करतात. या झुंडशाहीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना यश येईल असे वाटत नाही. झुंडशाहीचे अनेक घटक पाहायला मिळतात. हिंसाचाराची वाढत जाणारी अभिलाषा जमावाला उद्दिपीत करून कायदा हाती घ्यायला लावण्याची स्थिती, एखादा गटच्या गट आपला शत्रू आहे, अशी भावना निर्माण करणे, जे जमावाबरोबर नसतील त्यांचे जमावाकडून संरक्षण शक्य नाही, त्यांच्यावर हल्ला होणारच. शांततेत जीवन जगण्यावर विद्रोही कटकारस्थान रचण्याचे आरोप अचूक माहिती आणि न्याय मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे केले जाणारे प्रयत्न यांना ओंगळ असे संबोधिणे, कारण हे प्रकार जमावशाहीला फायद्याचे नाहीत. वृत्तपत्रे बदमाश आहेत, म्हणून त्यांना झोडले पाहिजे. दुसऱ्या भाषेत अनागोंदी करा, असे म्हणण्यासारखे आहे.’’
 
बातम्या आणखी आहेत...