आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय ‘डोळस’ विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला सध्या खूपच चांगले दिवस आले आहेत. हैदराबाद कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवत कसोटी मालिकेतील विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा हा सलग १९ वा विजय आहे. या कामगिरीने सुनील गावसकर यांच्या नेतृत्वातील सलग १८ कसोटी सामन्यात विजयी राहण्याचा विक्रमही टीम इंडियानेच मोडीत काढला आणि १९ कसोटी सामन्यात भारत अपराजित राहिला. क्रिकेट रसिकांसोबतच संपूर्ण भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. याच मालिकेत दोन दिवस आधी रविवारी झालेल्या  अंधाच्या टी – २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ही भारताच्या संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताच्या परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर दणदणीत मात करत हा विजय मिळवला. प्रत्येक भारतीयांना गर्व वाटावा अशी ही घटना आहे.  वनडेतही अंधांचा भारतीय संघ चॅम्पियन राहिलेला आहे.  भारताने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ४० षटकांच्या वनडे विश्वचषकात पाकिस्तानलाच हरवून अंधाच्या वन डे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्याच मालिकेत आता दुसऱ्यांदा टी – २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकत स्वत:ला सिद्ध केले आहे. पाकिस्तानशी साखळी सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. २०१२ मधे बंगळुरू येथेच झालेल्या पहिल्या विश्वचषक सामन्याच्या वेळी पाकिस्तानला पराभूत करत पहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.  

३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान अंधाच्या टी – २० विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  दिल्ली येथे  भारत आणि विंडीजच्या लढतीत या अनोख्या विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडिया तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टीम चा माजी कर्णधार राहुल द्रविड या स्पर्धेचा ब्रॅड अॅम्बेसेडर होता. या स्पर्धेत यजमान भारतासह, भारताचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अाफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश व नेपाळ या देशांतील संघांचा समावेश होता. दिल्ली, मुंबई, फरीदाबाद, कोची, भुवनेश्वर, बंगळुरूसह अन्य शहरांत या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या विश्वचषक मालिकेत आपल्या संघाने ९ पैकी आठ सामने जिंकत भारतच विजेता हे सिद्ध केले आणि विश्वचषकही मिळवला. सगळ्यांच क्रिकेट रसिकांसोबतच संबंध भारतीयांना  अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. 

सर्व सामान्य क्रिकेटमध्ये भारतीयांनी एक वेगळी ओळख आणि दबदबा निर्माण केलेला आहे. त्याच मालिकेत अंधाच्या संघानेही आम्ही काही कमी नाहीत हे सिद्ध केले आहे. अंध असो वा दिव्यांंग त्यांना सहानुभूती नको असते समाजाच्या मुख्य प्रवाहात आम्हाला सन्मानाने सहभागी करावी अशी माफक अपेक्षा ते ठेवतात. कोणत्याच क्षेत्रात आम्ही कमी नाहीत हे दाखवण्याची संधी ते सोडत नाहीत. उलट अनेक क्षेत्रातील त्यांची कामगिरी सामान्यांना लाजवणारीच राहिली आहे. हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. उणिवा आणि प्रतिकुलतेचा बाजार मांडत सहानुभुतीची वाट न पाहता त्यांनी आपली वेगळी वाट शोधत स्वत:ला सिद्धच केले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून एखादे काम करण्याची कल्पनाही सामान्य माणूस सहन करू शकत नाही.  तेव्हा बंद डोळ्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि इतर सगळेच कौशल्य दाखवत कामगिरी करणे सोपे नाही. दृष्टी नसताना चेंडूच्या आवाजाने हा खेळ खेळावा लागतो. ते एक मोठे आव्हान असते. दृष्टी असणाऱ्यांना लाजवण्याचे काम हे खेळाडू करतात. समाजातील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात योग्य ती कामगिरी करत असतो. अंधाचे क्रिकेट हे शारीरिक व सामाजिक माध्यम मानले जाते. शिस्त, फिटनेस, सांघिक व्यूहरचना, स्पर्धेतील सगळी आव्हाने त्यांनाही पाळावी लागतात. या कलागुणांचा अभ्यास करून त्यात तरबेज व्हावे लागते. संपूर्ण आवाजावर अवलंबून असलेल्या या खेळात कठीण प्लास्टिकच्या चेंडूत शिशाच्या गोळ्या टाकलेल्या असतात. त्याच्या आवाजावर हे खेळाडू लक्ष ठेवून हा खेळ खेळतात. सर्व सामान्य क्रिकेटमधील काही ठराविक नियमात थोडेसे बदल करून हा खेळ सर्व सामान्य क्रिकेट सारखाच खेळवला जातो. डोळसांनाही लाजवेल अशी कामगिरी करणाऱ्या या भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

-कार्यकारी संपादक, अकोला
बातम्या आणखी आहेत...