केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमताने सरकार स्थापन झाले अन् सर्वच राज्यांतील राजकारण गतिमान झाले. मग या घडामोडींना महाराष्ट्र अपवाद कसा ठरणार! भाजपला अपेक्षेपेक्षाही अधिक मिळालेले यश, मोदींच्या पाठबळामुळे महाराष्ट्रात राजकीय शक्तीविषयी भाजप नेत्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास केंद्रातील एकहाती सत्तेमुळे दुजेपणाची वागणूक मिळण्याच्या शक्यतेने संभ्रमावस्थेत असलेला शिवसेना पक्ष, या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. लक्ष आता महाराष्ट्राकडे लागले.
राज्यात 48 पैकी 42 जागा पटकावणारी महायुती विधानसभा निवडणुका काबीज करेल, असा आत्मविश्वास युतीच्या शीर्षस्थ नेत्यांना आहे. मात्र, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न झाले. यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वीच दोन्ही पक्षांतील ‘तू तू मैं मैं’ जनतेपुढे प्रकर्षाने समोर आली. केंद्रात सत्ता स्थापन होऊन काही दिवस उलटत नाहीत, तोच राज्यातील मुख्यमंत्री कोण, यावरून महायुतीतल्या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची नावे पुढे केली. मागील कित्येक दिवस याच नावांवर खल चालला. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नेते अत्यंत आवडीने प्रसारमाध्यमांना मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून ‘बाइट’ देत होते. मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेचा हा खेळ थांबला, आता जागावाटपाचा नवा अजेंडा घेऊन युतीचे नेते तोंडसुख घेताहेत. त्यात देवेंद्र फडणवीसांना तर स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी स्वप्ने पडताहेत. भाजप स्वबळावर महाराष्ट्रात लढली तर 244 जागा जिंकेल, असे फडणवीसांना वाटते; पण या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा हा लपंडाव जनता अत्यंत बारकाईने बघतेय. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पंधरा वर्षे आघाडी सरकारने राज्यात काय दिवे लावले, यावर भाष्य करण्यापेक्षा कोण किती जागा लढवेल, यावरच सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचे ‘पानिपत’ व्हायला नको म्हणजे मिळवली. खरं म्हटलं, तर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सत्तेची झालेली घाई त्यांच्या वक्तव्यांतून पदोपदी दिसून येते. कधी एकदा सत्ता हस्तगत करतो आणि कधी त्या खुर्चीवर बसतोय, यातच हे नेते सध्या विचारमग्न आहेत. केंद्रात सत्ता आली म्हणजे राज्यात सत्ता पक्की, हे समीकरण या नेत्यांनी मनाशी घट्ट केलेले दिसते. मात्र, राज्यात युतीची सत्ता स्थापन होईल का, याबाबत शंका-कुशंका घेण्यासाठी महायुतीचीच नेतेमंडळी जबाबदार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या हातात द्यायची, याबाबत मतदार जागृत आहेत.