आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा डबल गेम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींची सत्ता केंद्रात आल्यानंतर भाजप नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या अंगात सध्या दहा हत्तींचे बळ आले आहे. आता काय करू, काय नको, असे त्यांना झाले आहे. आता पुढची दहा वर्षे केंद्रातील सत्ता जात नाही, अशा अविभार्वात ते सध्या वावरत आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाच्या साथीने सुख-दु:खात एकत्र असताना आता अचानक त्यांना शत प्रतिशत... भाजप! असे स्वप्न दिवसाढवळ्या पडायला लागले आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेबरोबरची युती तोडायला निघणे, हा याच डबल गेमचा भाग ठरतो. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तोंडून एका बाजूला युती तोडायची भाषा करायची आणि दुसर्‍या बाजूने नेत्यांनी सबुरीचा सल्ला द्यायचा, इतक्या वर्षांची युती एका दिवसात तोडता येत नाही... अशी तोंडपाटीलकी करायची, याला दुटप्पीपणा म्हणायला हवा! महाराष्ट्रात भाजपच्या अंगात एवढी अगडबंब ताकद संचारली असेल तर त्यांनी खरेतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेबरोबरचा घरोबा मोडायला हवा होता, पण त्यांच्या नेत्यांना राज्यात नक्की काय ताकद आहे, याचा पुरेपूर अंदाज आहे. डबल गेमच्या माध्यमातून जागा वाटपात त्यांना जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत, ही खरी गोम आहे.

शिवसेनेच्या छायेत भाजपचा बोन्साय झाला... हे भारत भूषणछाप विरह गीत वरच्या सुरात गाताना भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मधू चव्हाणांनी ते आधी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व एकनाथ खडसे अशा समूह संगीतकारांकडून नीट बसवून घेतले होते आणि त्याला सूरजसिंग ठाकूर, एकनाथ पवार, वर्षा भोसले आदी पदाधिकार्‍यांनी युती मोडण्याचा डाव मांडून अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत गातात तसाच कोरस दिला. गाण्यांचा कार्यक्रम अगदी ठरल्याप्रमाणे झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला... गाणे वर्मी लागले! याची खात्री झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी भैरवी गायला उठले... त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची एकाएकी आठवण झाली. या सर्वांनी 25 वर्षांपूर्वी लावलेल्या युतीच्या रोपट्याची आठवण झाली. 95 मध्ये सत्ता येऊन त्यांची मधुर फळे खाल्ल्याचे सुख आठवले, तर गेली 15 वर्षे सत्तेबाहेर राहिल्याचे दु:खाने त्यांचा ऊरही भरून आला. सेना-भाजपच्या सुख-दु:खांच्या आठवणीने त्यांची ब्रह्मानंदी समाधी लागली असताना भैरवीचा शेवट करताना अचानक त्यांना पुन्हा एकदा कार्यकर्ते आठवले. त्यांच्या शत प्रतिशत भाजपच्या मागणीचे सूर कानी पडले आणि फडणवीस म्हणाले : कार्यकर्त्यांनो तुमचे दु:ख मी जाणतो. प्रसंगी ते मी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कानीही घालतो. भैरवी संपली... पदाधिकारी व कार्यकर्ते खुश... शिवसेनेच्या धनुष्यात निघण्याऐवजी बाण भाजपच्या कमळातून अचानक बाहेर आल्याने सेनाही घायाळ... डबल गेमचे गाणे कसे छान छान रंगले!

शिवसेनेच्या छायेत भाजपचा बोन्साय झाला... 288 पैकी 40 टक्के जागा भाजप जागा लढवतो, हे किती दिवस चालणार... महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनला पाहिजे... शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपला निवडणुकीत मदत केली नाही... हे सारे पदाधिकार्‍यांकडून गाऊन घेण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी आधी 25 वर्षांपूर्वीचा इतिहास तपासून पाहावा. दोन चार जागा येताना दम लागत होता तेव्हा महाजन, मुंडेंसारख्या जाणत्या नेत्यांनी भाजपचे रोपटे मोठे होण्यासाठी शिवसेनेचा वृक्ष निवडला. शिवसेनेच्या शहरी भागांतील ताकदीची साथ घेऊन ग्रामीण भागांमध्ये आपली मुळे रोवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरोबर असला तरी पुरोगामी महाराष्ट्रात मुळे रुजवणे भाजपसाठी अतिशय कठीण होते, पण मुंडेंसारख्या बहुजन चेहर्‍याच्या नेत्यामुळे साळी, माळी, कोळी, कोष्टी, गवळी अशा सतरापगड जातींमधील लोकांना भाजपबद्दल हळूहळू विश्वास निर्माण होऊ लागला. त्यातच बाळासाहेबांसारख्या जातीपातींचा विचारही मनाला शिवू न देणार्‍या शिवसेनाप्रमुखांमुळे युतीला जनाधार मिळाला. बाळासाहेबांनी नेतेपदाचे टिळे लावताना, पदे वाटताना शरद पवारांसारखे कधी जातीपातीचे समीकरण मांडले नाही. हाताला काम आणि पोटाला भाकरी, हेच सूत्र त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवले. या सार्‍याचा परिणाम होऊनच महायुती आज सत्तेच्या जवळ जाऊ शकली. शिवसेनेच्या छायेत भाजपचा बोन्साय नव्हे तर वृक्ष झाला. उलट शिवसेनेच्या वृक्षाचा वटवृक्ष होऊ शकला नाही हे सत्य आहे! ग्रामीण भागात सर्वदूर मुळे घट्ट रोवण्यात इतक्या वर्षांनंतरही सेनेला यश आलेले नाही... या अपयशावर चिंतन करण्याऐवजी शहरी भागांतील नेत्यांवर आजही नको तितका विश्वास उद्धव ठाकरेंकडून ठेवला जात आहे. परिणामी या घटकेला सेना चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरू शकली नाही, ही सेनेची शोकांतिका म्हणायला हवी. गाव तिथे शाखा उघडल्या म्हणून सेनेचा प्रचार झाला अशा भ्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहू नये. कारण गावाकुसात शाखा उघडली तरी त्याचे शटर दररोज उघडणारे कार्यकर्ते आणि त्यांना विश्वास देणारे नेते तयार करणे गरजेचे होते, पण तसे अजूनही झालेले नाही. संजय राऊत, सुभाष देसाई, लीलाधर डाके, विनायक राऊत, अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. तेथील प्रश्न खूप जटील आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. विधानसभा अधिवेशनात हे चित्र अतिशय केविलपणे दिसून येते. आशिष जयस्वाल, विजय शिवतारे, विवेक पंडित, शरद पाटील अशा आमदारांना प्रश्न मांडण्याची संधी देणे गरजेचे असताना चंद्रपूरपासून सावंतवाडीपर्यंतचे प्रश्न सुभाष देसाई, रविंद्र वायकर मांडणार असतील तर शिवसेना वाढणार कशी? भाजपला सेनेचा हा कच्चा दुवा माहीत असल्याने ते ताकद वाढल्याचे सांगत आज जास्त जागांची मागणी करत आहेत.

भाजपला डबल गेम करून 288 पैकी निम्म्या 144 जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या जोरावर मग 100 पेक्षा जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रिपदावर दावा करायचा आहे आणि हीच खरी ग्यानबाची मेख ठरते! ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, हे 1995 साली युतीने मांडलेले सूत्र होते. हाच सारिपाट मांडून पुढे काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसनेही सत्ताबाजार केला. विशेष म्हणजे युतीच्या राज्याप्रमाणेच गेली 15 वर्षे काँगे्रस व राष्ट्रवादीने खातीही विभागून घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेची खाती काँगे्रसच्या ताब्यात, तर उपमुख्यमंत्र्यांसह भाजपची मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या ताब्यात. 2009 मध्ये 169 जागा लढवून शिवसेनेची ताकद 45 जागांवर मर्यादित राहिली आणि 46 जागांच्या जोरावर विधानसभेत विरोधी पक्षनेते भाजपकडे गेले. तीच गत विधान परिषद. तेथेही जास्त जागांमुळे विरोधी पक्षनेता भाजपचा. आता असेच लक्ष्य ठेवत ऑक्टोबरमध्ये होणार्‍या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रिपद आपल्याकडे खेचून आणायचे आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी गडकरी, फडणवीस व तावडे कधीचेच गळ टाकून बसलेत...
भाजपच्या नेत्यांनी आधी 25 वर्षांपूर्वीचा इतिहास तपासून पाहावा. दोन चार जागा येताना दम लागत होता तेव्हा महाजन, मुंडेंसारख्या जाणत्या नेत्यांनी भाजपचे रोपटे मोठे होण्यासाठी शिवसेनेचा वृक्ष निवडला. शिवसेनेच्या शहरी भागांतील ताकदीची साथ घेऊन ग्रामीण भागांमध्ये आपली मुळे रोवली.