आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील नाेकऱ्यांवर गंडांतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेला महान अाणि अधिक वैभवशाली देश बनवण्याचा मनाेनिर्धार करीत राष्ट्राध्यक्षपदाचे नवनिर्वाचित उमेदवार डाेनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांचे स्थलांतर राेखण्यावर तसेच व्यापारी अाणि अार्थिक निर्बंधावर भर देण्याचा पवित्रा जाहीर केला. अर्थातच ट्रम्प यांची भूमिका राजकीय हेतूने प्रेरित असली तरीही त्यामुळे जगभरातील विशेषत: अायटी, वाहन, पाेलाद उद्याेगाशी संबंधित घटकांमध्ये साहजिकच खळबळ उडाली. त्यांचा राेख चीनवर असला तरी त्याचा परिणाम भारतावर हाेऊ जात अाहे. तूर्तात ट्रम्प यांची ही भूमिका प्रत्यक्षात अंमलात येणे कठीण अाहे, असे म्हटले जात असले तरी अमेरिकेत रुजलेल्या भारतीय ‘अायटी’ उद्याेगाने तशी शक्यता गृहीत धरून सुधारणावादी मार्ग अंगिकारला अाहे. खराेखरीच एच-१ बी व्हिसा अाणि अाऊटसाेर्सिंगवर निर्बंध लादले तर भारतातील ‘अायटी’ उद्याेगाला तसेच विदेशी गंगाजळीला जबर फटका बसणार हे निश्चित. देशभरातून दरवर्षी सुमारे ६८ हजार तरूणांना विशेष मनुष्यबळाच्या अंतर्गत अमेरिकेत एच-१बी व्हिसा मिळताे. एकट्या अाैरंगाबादमधले सुमारे ३०० तरूण सध्या तिथे अायटी क्षेत्रात कार्यरत अाहेत. मुंबई-पुण्यातून साधारणपणे दरवर्षी ३ हजार तरूण जात असतात. काैशल्यप्राप्त अाणि कार्यक्षमतेत सरस असलेल्यांना कामावर घेण्याशिवाय अमेरिकेकडे पर्याय नसला तरी अमेरिकेतील स्थलांतरीत भारतीय सध्या काळजीत अाहेत; कारण किमान २० टक्के भारतीयांना ट्रम्पच्या भूमिकेचा फटका बसू शकताे. कारण ट्रम्प यांचा इशारा राजकीय मानला तरी त्यामागची पार्श्वभूमी इथे विचारात घेतली पाहिजे. उदाहरणच घ्यायचे तर डिस्ने वर्ल्ड अाणि काही कंपन्यांत एच-१बी व्हिसा असलेल्यांनी नाेकऱ्या पटकावल्या त्यामुळे स्थानिकांची हकालपट्टी झाली. याप्रकरणी दाेन अायटी कर्मचाऱ्यांनी खटला भरला. डिस्ने वर्ल्डने २५० स्थानिक कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला हाेता हे उल्लेखनिय ठरावे. लिअाे पेरेराे अाणि डेना मूर या कंपन्यांनीही असाच कित्ता गिरवला, याशिवाय एचसीएल इन्काॅर्पाेरेशन अाणि काॅग्निझंट टेक्नाॅलाॅजिज् या कंपन्यांविराेधातही दावे दाखल झाले अाहेत. एकंदरीत स्थलांतरीत नाेकरदारांनी स्थानिकांची राेजीराेटी हिरावून घेतली, त्यामुळे निर्माण झालेल्या असंताेषाला वाट माेकळी करून देणे गरजेचे हाेते, ते ट्रम्प यांनी केले.

भारतीय अायटी कंपन्यांचा अमेरिकेतील एकूण उद्याेग सुमारे १५० अब्ज डाॅलर्सचा अाहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्राे, इन्फाेसिस यांसारख्या कंपन्यांनी भारतातून २००५-२०१४ याकाळात सुमारे ८६ हजार तंत्रज्ञ अमेरिकेत पाठवले. कारण अमेरिकन कर्मचारी महिनाभरात १६० तास काम करताे त्यासाठी किमान ४ हजार डाॅलर्स माेबदला द्यावा लागताे तर भारतीय किंवा अन्य विदेशी कर्मचारी २०० तासांपेक्षा अधिक काम ३३०० डाॅलर्समध्ये करताे. विशेषत: या कंपन्यांच्या नफ्याचा माेठा वाटा तेथूनच येताे. भारतीय अायटी क्षेत्र हे अमेरिकेवर अवलंबून अाहे. २०१४-१५ मध्ये या क्षेत्रात जी निर्यात झाली त्यातून ८२ अब्ज डाॅलर्स भारताने कमावले त्यापैकी सर्वात माेठा वाटा अमेरिकेकडून मिळाला हाेता. अमेरिकेने एच-१बी व्हिसाची फी २ हजार डाॅलर्सवरून ४ हजार डाॅलर्सवर नेली त्यामुळे भारतीय अायटी उद्याेगाला ४०० दशलक्ष डाॅलर्सचा फटका बसला हे इथे उल्लेखनिय ठरावे. व्हिसापेक्षाही स्थलांतरावरील निर्बंध अधिक गंभीर परिणाम घडवतात. विदेशातील भारतीयांकडून येणारा पैसा हा उत्पन्नाचा स्त्राेत असताे; २०१२ साली अनिवासी भारतीयांनी ७०.३९ अब्ज डाॅलर्स पाठवले हाेते. एकूण जीडीपीमध्ये हे प्रमाण ४% भरते. त्यातील ११ अब्ज डाॅलर्स हे अमेरिकेतील भारतीयांकडून अाले हाेते. २०१६ मध्ये भारताच्या विदेशी गंगाजळीत ५% घट हाेईल, ती ६५.५ अब्ज डाॅलर्सवर येईल असे जागतिक बंॅकेच्या अहवालात म्हटले हा धाेक्याचा इशारा म्हणावा लागेल. भारताचा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार अमेरिकाच असून सध्याचा व्यापार दाेघांनाही ५०० अब्ज डाॅलर्सवर घेऊन जायचा अाहे. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण अाणि व्हिसा यासंदर्भातील धाेरणे अधिक महत्वपूर्ण ठरतात. एच-१बी व्हिसावर नियंत्रण अाले तर भारतीय कंपन्यांना कार्यप्रणाली बदलावी लागेल म्हणूनच नवी रणनिती अाखली जात अाहे. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेतील ग्राहकांना सेवा देण्यासाठी भारतातून तंत्रज्ञ पाठवण्याएेवजी स्थानिक पदवीधरांची भरती करणे, मनुष्यबळाची गरज कमी करण्यासाठी कामाचे यांत्रिकीकरण करणे, पारंपरिक सेवा देण्याएेवजी क्लाउड काम्प्युटिंग तसेच अार्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या सेवा पुरवणे, ज्याप्रमाणे इन्फाेसिसने नाेअा कन्सिल्टग अाणि कॅलिडस् टेक्नाॅलाॅजीज् या कंपन्या विकत घेतल्या तसे अन्य अमेरिकी कंपन्या विकत घेणे अशा काही पर्यायांसाठी भारतीय कंपन्यांनी तयारी केली अाहे. अमेरिकेतील स्थलांतरीत भारतीयांच्या नाेकऱ्यांवरील गंडांतराची ही नांदी म्हटली तर वावगे ठरू नये.
बातम्या आणखी आहेत...