आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदोष शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणाची गरज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबादेतील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सामुदायिक काॅपी प्रकरणाचे पडसाद विदेशातही उमटत अाहेत. त्यामुळे सबंध देशातील अभियांत्रिकी पदवीधारकांकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलत चालला असून विदेशात नाेकरी करीत असलेल्या अभियंत्यांना प्रतारणा सहन करावी लागत अाहे. एकूणच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सबंध देशातील शिक्षण अाणि ते पुरवणाऱ्या व्यवस्थेचे शुद्धीकरण कठाेरपणे करणे ही काळाची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त हाेत अाहे.
 
“नगरसेवकाच्या घरातचअभियांत्रिकीचे परीक्षा केंद्र’ हे वृत्त धक्कादायक वा खळबळ उडवून देणारेच नव्हे, तर वर्तमान शिक्षण व्यवस्थेचे ‘वास्तव दर्शन’ घडविणारे ठरावे. सदरील वृत्त मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील असले तरी एकुणातच मराठवाड्याची आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला साजेशेच आहे. माझी नाळ मराठवाड्याशी जुळलेली असल्यामुळे येथील शिक्षण व्यवस्थेचे विद्यार्थिदशेत यथार्थ दर्शन घडलेले आहे. प्रश्न ना कोणत्या एका महाविद्यालयाचा आहे ना कोणत्या एका परीक्षेचा, असे ‘घरपोच’ शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था गावोगावी आहेत.

 
या प्रसंगातून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला आणि सरकारला खरंच काही ‘धडा’ शिकायचा असेल तर अशा प्रकारच्या कारणांच्या थेट मुळाशी जावे लागेल. वरकरणी केंद्र रद्द करून पाठ थोपटून घेणे म्हणजे केवळ प्रतारणा ठरेल. ‘शिक्षणाचे खासगीकरण’ या गोंडस नावाखाली गेल्या दशकांत शाळा-कॉलेजची अक्षरशः खिरापत वाटली गेली. अगदी इमारतीच्या एका गाळ्यात अभियांत्रिकी-डीएड-बीएड कॉलेजेस सुरू केली गेली. कुठलाही धंदा चालवायचा म्हटलं की त्यासाठी मुबलक कच्चा माल अत्यंत आवश्यकच. याच नियमानुसार अस्तित्वातील संस्था विद्यार्थी संख्येअभावी बंद पडू नयेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून मराठवाड्यात अगदी १०वी/१२वी पासून ते अभियांत्रिकी -डीएड-बीएड पदवी /पदविका शाळा-महाविद्यालयाचे तोंड पाहतादेखील घरबसल्या ‘१००% पासची हमी देणाऱ्या खास स्कीम्स’ उपलब्ध करण्यात आल्या. श्री साई इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअरिंग अॅंड टेक्नाॅलाॅजी काॅलेजच्या निमित्ताने उघड झालेला प्रकार हा केवळ या स्कीमची प्रातिनिधिक झलक ठरावी. आजही अनेक पुणे-मुंबईचे विद्यार्थी १० वी /१२वीतील हमखास यशाच्या खात्रीसाठी मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांची निवड करत असतात.
 
आकाशाला गवसणी घालणारे शुल्क, आर्थिक तसेच शिक्षक-प्राध्यापक भरतीतील गैरप्रकार अशा असंख्य रोगांनी शिक्षण व्यवस्थेला ग्रासले आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या ‘पारदर्शक’ मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या कर्करोगाचे समूळ उच्चाटन होईल यासाठी अत्यंत कडक पावले उचलणे गरजेचे ठरते. भविष्यात इतक्या टोकाचा निलाजरा प्रकार टाळण्यासाठी दहावी-बारावी बोर्ड परीक्षा, सर्व प्रकारच्या पदवी /पदविका परीक्षांसाठी मदर सेंटर (आपलीच शाळा-कॉलेज परीक्षा केंद्र) कायमस्वरूपी बंद करत बाह्य परीक्षा केंद्र पद्धतीचा तातडीने अवलंब करावा लागेल. याच अनुषंगाने व्हाॅट्सअॅपवर प्राप्त एका संदेशात म्हटले आहे की, एखादा देश माेडकळीस अाणायचा असेल तर अणुबाॅम्ब किंवा दीर्घपल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची प्रत्येक वेळी गरज पडत नाही. निकृष्ट दर्जाचे शिक्षण अाणि परीक्षा पद्धतीतील गैरप्रकारदेखील पुरेसे ठरतात. शिक्षण अाणि ती पुरवणाऱ्या व्यवस्थेत बेबंदशाही माजली की कुठलाही देश अापाेअापच काेलमडताे.

एकुणातच आपल्या शिक्षण व्यवस्थेची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे असे म्हटले तर अतिशयाेक्ती नक्कीच ठरणार नाही. नजीकच्या भविष्यात या प्रकरणातील दोषींवर प्रत्यक्षात खरंच कारवाई केली जाईल की सरकारी सोपस्कार पार पाडले जातील हे कळेलच. अर्थातच शैक्षणिक गैरप्रकारांच्या बाबतीतील आजवरचा कारवाईचा इतिहास पाहता फार काही घडेल असे वाटत नाही. ढासळती शैक्षणिक गुणवत्ता हा अतिशय गंभीर प्रकार आहे. याचे दुष्परिणाम केवळ विद्यार्थी, संस्थेपुरते मर्यादित नसून त्याचा अप्रत्यक्ष फटका सबंध देशाला बसू शकतो. चुकीच्या औषधोपचारामुळे रोग्याला वेळेआधीच स्वर्गवासी करणारे डॉक्टर, बांधकाम चालू असतानाच कोसळणाऱ्या इमारती, पुलामुळे जाणारे बळी, पदवी मिळूनही अशिक्षित पदवीधर हे याच दोषी शैक्षणिक व्यवस्थेची देणगी असतात हे लक्षात घ्यायला हवे.

‘असोचेम’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, महाविद्यालयांतून बाहेर पडणारे केवळ २० टक्के अभियंते विद्यमान उद्योगात काम करण्याच्या पात्रतेचे असतात. अशा प्रकारामुळे बाहेरील देशांत संपूर्ण देशाची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे माझ्यासारख्या बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप प्रतारणा झेलावी लागते. म्हणूनच देशभरातील संपूर्ण सदाेष शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्यासाठी कठाेर पावले सरकारने उचलणे अभिप्रेत आहे, अन्यथा आपली शिक्षण व्यवस्थाच आपल्या देशाला संपवेल, हे मात्र नक्की!
 
rasal.sneha4@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...