Home | Editorial | Agralekh | article of social worker mrumal gore

स्फटिकासमान जीवन,चारित्र्यसंपन्न राजकारण (अग्रलेख)

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 18, 2012, 11:04 PM IST

‘पाणीवाली’ आणि ‘लाटणेवाली’ बाई या प्रतिमेचा योग्य तो गौरव झाला आहे

  • article of social worker mrumal gore

    अलीकडे फारशी आंदोलने का होत नाहीत? मोठमोठे मोर्चे मुंबईचे रस्ते दणाणून का सोडत नाहीत? स्त्रियांच्या किती तरी संघटना आहेत; पण 40 वर्षांपूर्वीप्रमाणे त्या सरकारचे धाबे का दणाणून टाकत नाहीत? सामान्य माणसांचे ‘रोटी-कपडा-मकान’चे प्रश्न आजही आहेत; पण तो संतापून रस्त्यावर का येत नाही? विद्यार्थी आणि तरुण हे विषमता, गरिबी, अन्याय यांविरुद्ध लढायला सिद्ध होण्याऐवजी हिंदू-मुस्लिम, मराठी-उपरे, दलित व सवर्ण या भावनिक प्रश्नांवर एवढे काहूर का माजवतात? तरुण-तरुणींमध्ये लग्नाअगोदर पत्रिका वगैरे पाहण्याचे स्तोम का वाढले आहे? शिर्डीला व सिद्धिविनायकाला हजारोंनी जाणा-या आणि तासन् तास दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणा-यांना आजूबाजूची अनास्था, अन्याय, अज्ञान, अंधश्रद्धा यांचे भान का येत नाही? हे व असे अनेक प्रश्न गेली काही वर्षे मृणाल गोरेंना पडत होते. म्हणजे वरवर नाउमेदी व निराशावादी वातावरणाच्या दिशेने जाणारे ते प्रश्न होते; पण तरीही मृणालताईंना निराशावादाने कधीही ग्रासले नाही. अशा अवस्थेतूनही समाज व माणसे जातात; पण समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्यायाचा वसा घेतलेल्या व्यक्तीने आशावाद आणि आदर्शवाद सोडता कामा नये, अशी त्यांची ठाम निष्ठा होती. म्हणूनच शारीरिक व्याधींनी ग्रस्त असूनही मृणालताई कुणीही भेटल्यावर त्याचे प्रसन्नतेने स्वागत करत. त्यांच्या समकालीन कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे मन जितके जुळत असे, तितकेच तरुण-तरुणींबरोबर. तसे पाहिले तर अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी यांच्यासारख्या लढाऊ सहकारी केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या होत्या. एस. एम. जोशी, मधू लिमये यांच्यासारखे समाजवादी नेते-मार्गदर्शक जाऊनही दीर्घ काळ लोटला होता. काही दिवसांपूर्वी प्रा. राम बापटही गेले. मृणालतार्इंचे राजकीय भाग्य हे की, त्यांना राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळींमध्येही काम करता आले. त्या व्यक्तींचे व चळवळीचे खोल संस्कार त्यांच्यावर झाले होते. अतिशय साधी राहणी, निर्लोभी जीवनशैली, पद, पैसे, प्रतिष्ठा याबद्दल निरासक्तता, हसतमुख राहूनही सतत ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्याबद्दलचा विचार आणि सहकारी नवरा निधन पावल्यानंतर वयाच्या तिशीपासून ते वयाची ऐंशी वर्षे ओलांडेपर्यंतचा सुमारे 55 वर्षांचा सांसारिक एकटेपणाचा काळ ज्या समजूतदारपणे त्यांनी झेलला ते पाहून असेच म्हणावे लागेल की, आता ती पिढी आणि तशा व्यक्ती हळूहळू कायमच्या अंतर्धान पावत जाणार आहेत. नवीन संघर्ष आणि नवे नेते उभे राहतील हे खरे (जी आशा मृणालताईंनाही होती); पण आता तशा स्फटिकासमान व्यक्ती पुन्हा दिसणार नाहीत. काळ बदलला आहे आणि काळानुसार समाजाचे रूपही. ज्या गोरेगाव नावाच्या ‘गावात’ मृणालतार्इंनी समाजवादी विचाराची व संघर्षाची मशाल हातात घेतली, त्या गोरेगाव परिसराचेच आता एक ‘उपमहानगर’ झाले आहे. स्वातंत्र्य चळवळ जवळून पाहिलेल्या मृणालने वैद्यकीय शिक्षण सोडून समाजकार्यात व राजकारणात प्रवेश केला. शाळेत व वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम गुण मिळवणा-या मृणालताई डॉक्टर होऊन युरोप-अमेरिकेत स्थायिक होऊ शकल्या असत्या किंवा येथेच हॉस्पिटल काढून नावलौकिक व समृद्धी प्राप्त करू शकल्या असत्या. सुरुवातीला त्यांनाही डॉक्टर होऊन समाजसेवा करावी, असे वाटत होते. (आजही तसे सेवाभावी डॉक्टर देशात व परदेशातही आहेत. सर्वच जण लोभाला बळी पडले आहेत असे अजिबात नव्हे.) पण मृणालताईंचा ओढा थेट लोकांना भिडण्याकडे, त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्या दूर करण्याकडे, प्रसंगी रस्त्यावर येऊन लढण्याकडे होता. त्यांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला. केशव ऊर्फ बंडू गोरे यांच्या अंतर्मनाचे व मृणालचे सूर जुळले आणि त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून काम सुरू केले. माहेरच्या मोहिले (सी.के.पी.) आणि केशव गोरे (चित्पावन) हा विवाह त्या काळात तर निखळ आंतरजातीय मानला जात असे. बंडू गोरेंच्या आई-वडिलांनी मुलाशी व सुनेशी संबंध तोडले ते कायमचे. म्हणजे नातीला (मृणालताईंची कन्या अंजली) बघण्यासाठीही ते शेवटपर्यंत फिरकले नाहीत. ही खंत मृणालताईंना होती; पण त्यांनी त्याचे अवडंबर माजवले नाही, सासू-सास-यांबद्दल अढी ठेवली नाही आणि कौटुंबिक दुराव्याचा आपल्या सामाजिक कामावर परिणाम होऊ दिला नाही. जात-पात-धर्म-भाषा-स्त्री-पुरुष असा भेद न मानणा-या आणि सर्वार्थाने समतेचे तत्त्वज्ञान स्वीकारलेल्या मृणालताईंना सामाजिक वैश्विकता अधिक भावणारी होती. त्यांचे खरे कुटुंब होते गोरेगाव. त्यांचे मोठे कुटुंब होते समाजवादी परिवार आणि त्यांचे राजकीय अंगण होते भारत. हा वारसा स्वातंत्र्य चळवळीचा होता. तोच मृणालताईंनी पुढे नेला. त्यांच्या ‘पाणीवाली’ आणि ‘लाटणेवाली’ बाई या प्रतिमेचा योग्य तो गौरव झाला आहे; पण त्यांचे चारित्र्य आणि विचार ख-या अर्थाने वैश्विक होते. पाण्याचा आणि महागाईचा, राहत्या घरांचा आणि नागरी सुविधांचा प्रश्न त्यांनी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावर आणला तो मुख्यत: त्या अधिक विशाल अशा समाजवादी विचारसरणीला सामान्यांमध्ये रुजवण्यासाठी. किंबहुना विचारसरणी व आदर्श, आशावाद आणि मानवी मूल्ये हे मानदंड नसतील तर कोणतेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक काम करणे अशक्य आहे. खरे म्हणजे प्रगल्भ-सुसंस्कृत जीवन व्यतीत करण्यासाठीही त्या मानदंडाची गरज आहे. मृणाल गोरेंना 1977मध्ये केंद्रीय मंत्री होता आले असते. (असेही म्हणता येईल की, त्या मंत्री होऊन त्यांचे काम अधिक व्यापक करू शकल्या असत्या.) पण मंत्रिपदाचे बिरुद त्यांना कधीच महत्त्वाचे वाटले नाही. बाकी बहुतेक पक्षांमध्ये (कम्युनिस्ट पक्ष वगळून) निवडणुकीचे तिकीट मिळवण्यापासून ते आमदार व नंतर मंत्री/मुख्यमंत्री होण्यासाठी जे ओंगळवाणे प्रयत्न केले जातात, ते पाहून तशा सत्तातुरांबद्दल घृणा वाटणे स्वाभाविक आहे. कदाचित सत्ता व पदप्रतिष्ठांबद्दल तशी नफरत मृणालताईंनाही असावी. शिवाय त्यांना मंत्रिपद देऊ केले होते पंतप्रधान मोरारजी देसाईंनी. मृणालताई संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होत्या तेव्हा मोरारजी देसाई मुंबई द्विभाषिकाचे मुख्यमंत्री होते. जे 105 हुतात्मे झाले होते ते त्यांच्या हुकमाचे बळी होते. कदाचित त्याच मोरारजींच्या मंत्रिमंडळात जाणे मृणालताईंना प्रशस्त वाटले नसावे. काहीही असो. मृणालताईंची नि:स्पृहता हा त्यांच्या विचारसरणीचा व चारित्र्याचाच एक भाग होता. (मृणालताईंसारखे किती जण काँग्रेसमध्ये व इतर पक्षांमध्ये आहेत?) आता राजकारणात विचारसरणी व चारित्र्य यांपेक्षा मतलब आणि व्यवहारवाद यांनाच स्थान प्राप्त झाले आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर आजच्या काळाला मृणालताईंचे राजकारण अनुरूप नव्हतेच; परंतु त्यांनी तशा राजकारणात कधीच भाग न घेतल्यामुळे त्यातून निवृत्ती घेण्याचा प्रश्नच नव्हता. मुद्दा हा की, त्यांना कधीच तशी आसक्ती वाटली नव्हती. असे आसक्तीरहित, लोकाभिमुख व चारित्र्यसंपन्न राजकारण करता येते, असे स्वत:च्या जीवनावरून सिद्ध करणारा मापदंड आपल्यातून आता गेला आहे; पण तो आदर्शवाद व आशावाद मात्र आपल्याला स्फूर्ती देऊ शकेल!

Trending