आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of V V Karmarkar About The Controversial Players

बहकलेले "कलावंत'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किथ मिलर हे ब्रॅडमनच्या जमान्यातले सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. पण क्रिकेटपटूंना देव्हाऱ्यात बसवणाऱ्यांना त्यांनीच मार्मिक सवाल केला होता, ‘गॉड्स और फ्लॅनेल्ड फुल्स?’ मिलर यांच्या जमान्यात गेल, वॉर्न, वुड्स आदी मंडळी नव्हती. एरवी त्यांनी हाच सवाल वेगळ्या म्हणजे ‘दैवतं की बहकलेले कलावंत?' अशा शब्दांत केला असता.

नववर्षाची सुरुवात कोण कशी करेल याचं भाकीत करण्याच्या भानगडीत कधीही पडू नका! वॉरेल-विल्स-वॉलकॉट यांच्यापासून ते सोबर्स-कॉली स्मिथ-कन्हाय आणि लॉइड-ग्रिनीज-रिचर्ड््स-कालीचरण तसेच रिचर्डसन व लारा यांचा वारसदार म्हणून क्रिस गेलकडे पाहिलं जातं. षटकारांचा बादशहा हा त्याचा लौकिक. पण नववर्षाचं स्वागत करताना त्यानं मारलेला असाच एक ‘षटकार’ पुन्हा एकदा त्याचं अंतरंग त्याच्या चाहत्यांसमोर उघड करून गेला! आपल्या दैवताचं हे रूप पाहताना त्याच्या लाख-लाख भक्तांना किळस वाटली असेल. असा कसा आपला देव? हा सवाल सतावू लागला असेल.

चार जानेवारी २०१६ चा हा प्रसंग. तो घडला ऑस्ट्रेलियात होबार्टमध्ये. खेळाडूंची धावती झटपट प्रतिक्रिया घेण्याचं आपलं व्यावसायिक काम मेलानी मॅक्लाफ्लीन बजावत होती (ज्याला ‘बाइट’ घेणं असं म्हटलं जातं). तिने विचारलेला प्रश्न जणू क्रिस गेलच्या कानीच गेलेला नव्हता. त्यानं लगेच लगट दाखवण्यास सुरुवात केली, ‘तुझे डोळे किती मोहक आहेत! हा सामना संपल्यावर ‘ड्रिंक’ घेताना मला तुझी संगत हवीशी वाटते.’ आणि इथे न थांबता तो म्हणाला, ‘डोन्ट ब्लश बेबी! पोरी, अशी लाजू नकोस.’

पत्रकार युवान सॅम्पसनला या प्रकारात काहीच नवल वाटलं नाही. दुसऱ्या एका खेळाडूची मुलाखत युवान घेत असताना गेलच्या नजरेत ती भरली. त्यानं लगेच तिला ट्विट करायचा धडाका लावला. रात्री सहभोजन घेण्याची निमंत्रणे तो ट्विट करू लागला, ‘यापूर्वी कधीही आमची भेटगाठ झालेली नव्हती.’ गेलची ही वासुगिरी सर्वश्रुत आहे.

गतसालच्या विश्वचषकातील सिडनीच्या सामन्यातला आपला एक कटू अनुभव सांगणारी एक महिला पत्रकार निनावी राहू इच्छिते. गेलचा ‘बाइट’ घेण्यासाठी ती महिला थेट खेळाडूंच्या चेंजिंग रूमपर्यंत घुसली हेही बरोबर नाही. कारण ड्रेसिंग रूम व त्यातूनच चेंजिंग रूम या खेळाडूंच्या हक्काच्या, प्रायव्हसीच्या जागा. त्यात घुसण्याआधी दोनदा विचार करावा! पण याचा अर्थ असाही नव्हे की, चेंजिंग रूममध्ये घुसखोरी करणाऱ्या महिलेशी खेळाडूंनी बेताल असभ्य वागावं.

इंग्लंडचा सुप्रसिद्ध अष्टपैलू क्रिकेटपटू फ्रेडी फ्लिंटॉफ हा गेलचा जबरदस्त चाहता. पण मेलानीला शाबासकी देत फ्लिंटॉफ म्हणाला, ‘वेल प्लेड मेलानी.’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे डेव्ह रिचर्डसन यांनी व्यापक दृष्टिकोनातून मतप्रदर्शन केलं. ‘क्रिकेट सामन्यांच्या टीव्ही-प्रेक्षकात चाळीस टक्के महिला असतात (त्यांचा अपमान कोणीही कसा खपवून घेईल?)’ इयन चॅपल या माजी कांगारू कर्णधाराने गेलला धारेवर धरलं. ७२०० डॉलर्स (सुमारे पावणेपाच लाख रु.) दंडावर त्याला सोडून देणं पुरेसं ठरणार नाही. ‘जागतिक पातळीवर गेलवर बंदी घालावी,’ या इयन चॅपल यांच्या मागणीत जनमताचंच प्रतिबिंब पडत होतं!

या साऱ्या प्रकारात जास्त चूक कुणाची : बेताल, बेफाम, गेलची की खेळाडूंना व कलावंतांना थेट देव्हाऱ्यात बसवून त्यांच्या भजनी लागणाऱ्या भाबड्या भक्तांची? खेळाडू, कलावंत िकंवा अगदी डॉक्टर-वकील या साऱ्यांचं कसब-कर्तृत्व असामान्य असू शकतं. पण ते त्यांच्या क्षेत्रापुरतं मर्यादित करण्यात समजूतदारपणा आहे. हे खेळाडू-कलावंत-डॉक्टर-वकील इ. इ. माणूस म्हणून कसे आहेत हा प्रश्न वेगळाच आहे. त्याच्या कसोट्या वेगळ्या आहेत. आणि क्रिस गेल कशाला, आंतरराष्ट्रीय कामगिरीत त्याच्यापेक्षा सरस असलेला लेगस्पिनर शेन वॉर्न अन् अमेरिकी गॉल्फपटू टायगर वुड्स यांच्या कहाण्या तर जगजाहीरच आहेत. एक हजारावर महिलांशी शय्यासोबत केल्याची फुशारकी मारत असतो तो म्हणजे ४५ वर्षीय शेन वॉर्न! कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ आणि एकदिवसीय झटपट क्रिकेटमध्ये २९३ बळी घेणाऱ्या या जादूगाराचे हे रूप किती भयाण आहे!

टायगर वुड्स हा तर व्यावसायिक गोल्फच्या दुनियेचा शहेनशहा. पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा टोलेजंग मनोरा कोसळला तो थँक्सगिव्हिंगच्या मुहूर्तावर. आपला नवरा आपल्याशी एकनिष्ठ नाही आणि एक वा फार तर दोन बायकांशी त्याची लफडी आहेत, अशी खात्री पटली त्याच्या पत्नीची - एलिन नोर्डेग्रीनची. मग तिनं अवतार घेतला चंडिकेचा. हातात गोल्फ क्लब घेतला तलवारीसारखा वा गदेसारखा आणि टायगरला राहत्या घरातून बाहेर हुसकावले. गोल्फमधील सर्वकालीन सर्वोत्तम मानल्या गेलेल्या टायगर वुड्सने तोपर्यंत वयाच्या ३३ व्या वर्षी जाहिरातीतून किमान अकरा कोटी डॉलर्स (सुमारे सव्वासातशे कोटी रु.) अधिकृतपणे कमावले होते. एप्रिल २०१० पर्यंत त्याची पंधरा विवाहबाह्य लफडी बाहेर आली व ही कमाई कवडीमोल ठरली.

स्त्री ही उपभोगवस्तू असल्याचा दृष्टिकोन आहे गेलचा, वॉर्नचा अन् वुड्सचा. अमाप पैशात डुबलेल्या वुड्सने प्रत्येक लफड्याची किंमत डॉलर्समध्ये मोजली. पहिले लफडं दाबण्यासाठी त्यानं एक कोटी डॉलर्स टेबलावर ठेवले. पण लैंगिक संबंधांची त्याची भूक एवढी राक्षसी होती की कॅबरे-नर्तिका, जॉर्न स्टार्स, पार्टीला एस्कॉर्ट (सोबती) आलेल्या व पार्टीतील महिला यांच्यात चढाओढ लागली टायगरशी शय्यासोबत करण्याची. त्यापैकी एका महिलेला त्यानं सँडविचवर विकत घेतलं!

या गौप्यस्फोटानंतर मोठमोठे जाहिरातदार वुड्सला सोडून जाऊ लागले. नाईकी, रौटोरेड, जिलेट व अॅक्सेनच्युअर यांनी वुड्सशी संबंध तोडले. यापैकी एकेकाकडून त्याला दरवर्षी एक-दीड कोटी डॉलर्स (सुमारे शंभर कोटी रु.) मिळायचे. पण कामांध वुड्स सुधारण्यापलीकडे गेलेला होता. त्याला सेक्स-मानसोपचार केंद्राचा आधार घ्यावा लागला. पण खेळापासून बॉलीवूड-हॉलीवूड क्षेत्रातील कलावंतच बाईलवेडे असतात असं थोडंच आहे? सर्वसामान्यांच्या जगाचा थोडासा कानोसा घेऊया. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या बातम्या भारतात विविध शहरांतून येत राहतातच. कर्नाटकातील काही आमदार विधानसभेतील कामकाज चालू असताना मोबाइलवर पोर्न वा सेक्स दृश्ये बघत नव्हते का? महाराष्ट्रातील एका आंबटशौकीन मंत्रिमहोदयांनी पुण्यातील युवकांसमोर फुशारकी मारली नव्हती का की, आम्हीही रात्री ही दृश्ये बघत असतो, आम्हीही मनाने तुमच्यासारखेच नवजवान आहोत!

सरतेशेवटी सांगतो किथ मिलर हे डॉन ब्रॅडमनच्या जमान्यातील सर्वोत्तम चतुरस्त्र क्रिकेटपटू. क्रिकेटपटूंना दैवत मानणाऱ्यांपुढे या महान क्रिकेटपटूने प्रश्न ठेवला : गॉड्स और फ्लॅनेल्ड फुल्स? मिलर यांच्या जमान्यात गेल, वॉर्न, वुड्स नव्हते. एरवी त्यांनी हा प्रश्न वेगळ्या तऱ्हेने विचारला असता. दैवते की बहकलेले कलावंत?