सांधेदुखी हा या पोलिसांमध्ये आढळणारा एक फार मोठा विकार आहे : सांधेदुखी ही एक प्रकारची वाताची व्याधी आहे. वेळेवर पोषक आहार मिळणे, अधिक वेळ उपाशी राहावे लागणे, आहारात वातूळ पदार्थांची (वडा-पाव, मिसळ पाव इत्यादी) रेलचेल असणे, अतितिखट, खारट खाण्याची सवय तसेच कोरडे खाणे, अनेक प्रसंगात होणारे अतिश्रम अशी कितीतरी अपथ्ये पोलिस सेवेत असणार्या व्यक्तींच्या बाबतीत घडत असतात. त्याचा परिणाम म्हणून वाताची अनेक दुखणी निर्माण होतात. त्यात सांधेदुखी, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खूप पाय दुखणे यांचा समावेश होतो. खूप वेळ उभे राहावे लागणे हे तर या लोकाना असंख्य वेळा सहन करावे लागते. कुठे बंदोबस्तासाठी जाणे, कुठल्या मोर्चाबरोबर तासन्तास चालणे, कैद्याना कोर्टात हजर करण्यासाठी नेणे, वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी उभे राहावे लागणे, अशी कितीतरी कामे पोलिसांना करावी लागतात आणि वाताच्या तक्रारींना निमंत्रण मिळते.
रोज अंघोळीपूर्वी फक्त पाच-दहा मिनिटे हाता-पायांना, पाठीला, कमरेला मानेला तेलाचे मालिश करा : आता कर्तव्यपूर्र्ती तर करावी लागते मग होणार्या विकारांना प्रतिबंध कसा करायचा? यावर एक उपाययोजना होऊ शकते, ती म्हणजे रोज अंघोळीपूर्वी फक्त पाच-दहा मिनिटे काढून हाता-पायांना, पाठीला, कमरेला मानेला तेलाचे मालिश करायचे हा निश्चय करून त्याची अंमलबजावणी आग्रहपूर्वक (अगदी प्रवासातही) करायची याने वाताचे बहुतेक विकार होण्याचे टळते.
प्रतिबंधात्मक उपाय : सातत्याने उभे राहावे लागल्याने, खूप चालावे लागत असल्याने सिराग्रंथीचा (Vericoseveins) विकार होण्याची शक्यता बर्याच पोलिसांमध्ये असते. पायांवर लहान-मोठ्या निळसर शिरा दिसू लागल्या की या तक्रारीची ही चाहूल आहे, असे समजून वेळीच त्याचा प्रतिबंध करावा. अशुद्ध रक्तवाहिनीच्या झडपांमध्ये विकृती झाल्याने प्रामुख्याने हा विकार उद्भवतो. तुपाचा योग्य वापर आहारात करणे, मधून मधून थोडेसे बसण्याचा प्रयत्न करणे, पायांना पट्टा बांधणे प्रतिबंधक उपाय यावर करता येतात.
श्वस्वनसंस्थेचे विकाराचे बळी, योगासने-प्राणायामसारखे दैनंदिन उपक्रमही करावेत : पोलिसांना अनेकदा वाहनांच्या संपर्कात राहावे लागते परिणामी प्रदूषणाशी संबंध येतो. यातूनच पुढे पोलिसांना बर्याचदा श्वसनसंस्थेचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामध्ये खोकला, दमा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. वाहतूक पोलिसांना तर सततच्या वाहनांच्या धुराला सामोरे जावे लागते. त्यामुळे फुफ्फुसाची ताकद कमी होण्याची शक्यता असते. धूर नाकात जाऊ नये याआठी नाकाचे संरक्षण करणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राणायामासारखे काही दैनंदिन उपक्रमही फुफ्फुसाची क्षमता वाढवायला उपयोगी पडतात. योगासानांचाही उपयोग या कामी होऊ शकतो. सूर्यनमस्कारसारखे व्यायाम पोलिसांनी नियमितपणे केले, तर सर्वांगालाच फायदा होतो. या सेवेत असणार्यांची नजर ही तीक्ष्ण असावी लागते. त्यादुर्ष्टीने डोळ्यांसाठी हितकारक नसलेले तिखट, खारट, अतिउष्ण खाणे टाळलेले बरे त्याचबरोबर तीव्र उन्हातही काम करण्याची अनेकदा वेळ येत असल्याने डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा उपयोग रात्री तळपायाना लावलेले साजूक तूप खूपच उपयोगी पडते.
तणाव जास्त असल्याने मन:शांतीसाठी प्रयत्न हवेत : दूध आणि गाईचे तूप यांचा उपयोग पोलिसांनी आपल्या आहारात जरूर करावा. चहा मर्यादेतच प्यावा, पाणी शुद्ध स्वरूपातच प्यावे. मन शांत आणि बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी पोलिससेवेतील व्यक्तींनी विशेष परिश्रम घ्यावेत; कारण अनेकदा ही मंडळी प्रचंड मानसिक ताणाखाली असतात.
कठोर निर्णय घेण्याची आणि तशी कृती करण्याची क्षमता त्यांना अंगी बाणवावी लागते. त्यामुळेच मन:शांतीसाठी आपापल्या धर्माला अनुसरून काहीतरी दैनदिन उपक्रम करायला हवा. याचा खूपच फायदा होतो. आहाराही सात्त्विक ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मनावर त्याचाअनुकूल परिणाम होतो.याचा उपयोग अतिमत: कार्यक्षमता वाढविण्यासाठी होतो. आणि आरोग्यही चांगले राहाते.