आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Vrushali Magdum About Freedom Of Women, Divya Marathi

स्त्रीला हवे ‘खरे’ आर्थिक स्वातंत्र्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर मुली शिकू लागल्या, नोकरी करू लागल्या. नोकरीचा टप्पा ओलांडून करिअर्सची वाटही त्यांना सापडली. पण नोकरीमुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले का? आजूबाजूला डोकावून पाहताना लग्नानंतर मुली आर्थिक खर्चाचे नियोजन व निर्णय घेत नसल्याचे लक्षात येते.

नोकरी करणार्‍या मुलीचे जॉइंट अकाउंट असते. पैसे काढणे, खर्च करणे, कर्ज काढणे, कर्जाचे हप्ते बायकोच्या खर्चातून वळते करणे या सार्‍या गोष्टी पुरुष वर्ग करीत असतो. या गोष्टी संसारासाठीच होत असतात, असे प्रथमदर्शनी आपणाला वाटू शकते; पण यात परस्परसंमतीचा भाग किती असतो, एकत्रित बसून हे नियोजन किती घरातून होते? नुकतेच लग्न झालेली एक प्राध्यापिका म्हणत होती, रिक्षासाठी काय, कोथिंबीर आणायची झाली तरी मला नवर्‍यापुढे हात पसरावा लागतो. नोकरी करणार्‍या कित्येक महिलांना बँकेत जाणे, पैसे डिपॉझिट करणे, काढणे या साध्या साध्या गोष्टीही माहीत नसतात.

लग्नाआधी शिक्षणासाठी कर्ज काढलेल्या सुधाला तिच्या नवर्‍याने तुझ्या वडिलांना कर्जफेड करायला लाव, अशी धमकीच दिली. वडील आजाराने अंथरुणाला खिळलेले. कर्ज काढून लग्न केलेले, आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. पस्तीस हजार पगार असणार्‍या सुधाने पाच लाख रुपयांचे कर्ज माझ्या पगारावर माझाही अधिकार आहे, या भावनेतूनच काढले. वडिलांना कर्जफेड करायला लाव, नाही तर घटस्फोट देईन, असे सांगत नवर्‍याने तीन महिन्यांची मुदत दिली. सुधाच्या पगारावर नवर्‍याने गाडी, घराच्या स्वप्नांचे इमले बांधले होते. लग्न टिकविण्यासाठी सुधाची केविलवाणी धडपड पाहताना स्त्रियांची आज काय स्थिती, असे वाटल्यास नवल ते काय?

नोकरी करणार्‍या स्त्रीच्या घरच्या जबाबदारीत तसूभरही घट झालेली नाही. आठ तासांची शाळा, कॉलेज, बँक, कंपनी, ऑफिसेस येथील नोकरी करून किमान पाच तासांची तरी घरची नोकरी ती करीत असते. या नोकरीत स्वयंपाक करणे, ओटा धुणे, पाणी भरणे, भाजी आणणे, मशीन लावणे, कपड्याच्या घड्या, उरलेसुरले पाहणे, पाहुण्यांची उस्तवार, घरातल्यांचे आजारपण, सणवार, आयत्या वेळची अनेक कामे... अशी न संपणारी मोठी यादी असते. ऑफिसमध्ये जसा शिपाई हाताखाली असतो, तशी घरी केरवारा व भांड्यासाठी मदतनीस असते. नोकरीवर मिळते तशी रविवारी सुटी मिळत नाही, पण ओव्हरटाइम असतो. फरक एवढाच आहे, या नोकरीचा तिला पगार मिळत नाही.

मुलांचे संगोपन, घराची जबाबदारी ही स्त्रियांचीच आहे, असे आपण मानत असल्यामुळे आज अमेरिकेत स्त्रिया नोकरी सोडून घरची आघाडी सांभाळणेच पसंत करत आहेत. या दशकात अमेरिकेत चाळीस टक्के महिलांनी नोकरीपासून फारकत घेतल्याचे आकडेवारी सांगते. या सर्व महिला पंचवीस ते पस्तीस वयोगटातील आहेत.

जे. बी. प्रिस्टलेनं ‘मदर्स डे’ नावाची एक एकांकिका लिहिली आहे. अठरा वर्षांचा मुलगा, एकवीस वर्षांची मुलगी व नवरा यांच्या चोवीस तास तैनातीत असलेल्या अ‍ॅनीला घरात गृहीत धरले जाते व मोलकरणीसारखी वागणूक मिळते. हे तिची मैत्रीण लक्षात आणून देते व अ‍ॅनी आजपासून मीही शनिवार, रविवार साप्ताहिक सुटी घेणार व तुमच्यासारखे आठ तासच काम करणार, असे जाहीर करते. त्यामुळे घरातल्यांची खूपच तारांबळ उडते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही नाटिका शिकवताना मी एकदा प्रश्न विचारला, ‘तुमच्या आईने साप्ताहिक सुटी जाहीर केली तर काय कराल?’ एका मुलाने उत्साहाने हात वर केला व म्हणाला, ‘आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाऊ व आईलाही बरोबर घेऊन जाऊ.’ या वाक्यातील ‘आईलाही बरोबर घेऊन जाऊ’मधील रोज घरकाम करणार्‍या आईला आम्ही फेव्हर करू व उपकृत होऊ, हा अर्थ दडला होता; जो पुरुषप्रधान मानसिकतेचा द्योतक आहे. सतरा वर्षांच्या या कुमारवयीन विद्यार्थ्याने उच्चारलेले हे वाक्य घरकाम हे आईचेच, या बालपणापासून घरी झालेल्या संस्कारातून आले होते; जे अतिशय भयावह आहे, असे वाटते. आज स्त्री-पुरुष समतेच्या व सन्मानाच्या गप्पा आपण सातत्याने मारत आहोत. एकसारखे शिक्षण घेतलेले स्त्री-पुरुष, एकाच क्षेत्रातली नोकरी हे चित्र काही दुर्मिळ राहिलेलं नाही. स्त्री-पुरुष डॉक्टर, स्त्री-पुरुष प्राध्यापक, स्त्री-पुरुष वकील हे आजूबाजूला दिसणारे चित्र एकमेकांच्या सोयीसाठी जाणीवपूर्वक निवडलेले आपणाला दिसते, पण ही सारी वैचारिक समानता आहे. समानतेची ही एक अदृश्य लक्ष्मणरेषा आहे. जी ओलांडली की असमानता अधोरेखित झालेली दिसते. व्यावहारिक पातळीवर शेवटी बाई ही बाईच असते. घरावर नवर्‍याच्या नावाची पाटी असली व नवर्‍याच्या नावावर घर असले तरी घरातील सर्व उस्तवार बाईनेच करायची असते. स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे हे स्त्रियाचेच काम आहे व हे बिनडोक व बिनबुद्धीचे काम आहे, असेही मानले जाते.

मुलाच्या जन्मानंतर आईप्रमाणे बाबांनाही तीन महिन्यांची पगारी रजा मिळाली पाहिजे. बाळाच्या संगोपनासाठी त्यांनीही रात्री जागवल्या पाहिजेत, अशी आपल्याकडे नेहमीच चर्चा होते. फतवेही निघतात. प्रत्यक्षात किती बाबांनी अशा रजा काढल्या, याची आकडेवारी काढली तर ती फारच केविलवाणी असेल. मुलांचे आजारपण, मुलांच्या परीक्षा या काळात स्त्रिया हक्काने रजा मागतात व अतिशय तणावाखाली मुलांचा अभ्यास घेतात. या सर्व कामात पुरुषांचाही सहभाग हवा, ही मानसिकता स्त्रियांचीही नाही. त्यामुळेच वैचारिक चर्चा व व्यावहारिक वर्तन यात मोठी तफावत आढळते.
मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी अर्धवेळ नोकरीचा प्रस्ताव मांडला होता. म्हणजे घरची जबाबदारी सांभाळून त्यांनी नोकरी करावी, असा हेतू होता. नुकत्याच आलेल्या महिला धोरणातही स्त्रियांचे नोकरीचे वय वाढविले पाहिजे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. म्हणजे मुलांच्या संगोपनाच्या काळात गॅप घेऊन मुले मोठी झाल्यानंतर साधारणत: पस्तीशीत ती पुन्हा नोकरीच्या प्रवाहात येऊ शकते.

वरील सर्व पर्याय चांगले आहेत. स्त्रियांचा डोईजड भार कमी करणारे आहेत. पुरुषप्रधान व्यवस्था व वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना कुठेही धक्का न लावता स्त्रियांनी काय केले म्हणजे त्यांना रिलीफ मिळेल, ते सांगणारे आहेत. स्त्रियांची नोकरी ही तिच्या घरकामासारखाच कामाचा एक भाग आहे. मग तिला हवी तर तिने सवलत घ्यावी, नाहीतर तारेवरची कसरत करत घर व नोकरी सांभाळावी. स्त्रियांच्या नोकरीमुळे मुलांकडे दुर्लक्ष होते, त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, असे आजूबाजूचे म्हणतात व स्त्रियाही ती अपराध भावना घेऊन वाटचाल करतात. वडील म्हणून मुलांच्या वाढीत पुरुषांची भूमिका कधीच चर्चिली जात नाही.

घर, शेत, दुकान या मालमत्तेत स्त्रियांचा वाटा नसतो. एक टक्के स्त्रियांच्या नावावर अशी मालमत्ता असल्याची आकडेवारी सांगते. त्यामुळेच नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या पैशाची गुंतवणूक, नियोजन व त्यासाठी लागणारा निर्णय पुरुषांनीच घ्यायचा असतो. हा प्रवाह आपल्याकडे रूढ झालेला आहे. त्यात वावगे काही नाही, असे स्त्रियांनाही वाटते, पण ज्या वेळी स्त्रीला स्वत:साठी, माहेरसाठी वा मैत्रिणीसाठी (पैसे उसने देणे, आजारासाठी खर्च करणे, दागिना आणणे) स्वत:च्या पगारातील बर्‍यापैकी मोठी रक्कम हवी असते. त्या वेळी ती खर्च करण्याचे आर्थिक स्वातंत्र्य किंबहुना धाडस स्त्रियांच्यात नसते. व्हाइस व्हर्सा पुरुषाने असे खर्च करण्यास काहीच आडकाठी नसते. तो त्याच्या कर्तव्याचा भाग असतो. समानतेचे नुसतेच गोडवे न गाता आज व्यवहारी पातळीवर कृती करता येईल का, हे पाहण्याची गरज आहे. स्त्रियांच्या नोकरीमुळे जर घर विस्कटत असेल तर पुरुषांचा घरातील सहभाग वाढला पाहिजे. पंचवीस वर्षे ज्या माहेरच्या घरात तिची मुळे रुजली आहेत, ती उपटून टाकून त्यांना आर्थिक मदत करणे, नाकारणे हे तिच्या दुय्यमतेचे द्योतक आहे. स्त्रियांसाठी अनेक पर्याय शोधण्यापेक्षा कुटुंबसंस्थेत बदल करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करू या.