आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Young Change To Society Bye Sagar Bhalerao

युवक सामाजिक संरचना बदलू पाहतोय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील सेंट झेविअर्स आणि टाटा सोशल सायन्स त्याचबरोबर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या नामांकित शिक्षण संस्थांवर महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक लक्ष ठेवून असल्याचं वाचलं. शिक्षण संस्थांमध्ये माओवादी अन् नक्षलवादी घडवत असल्याचा संशय एटीएस पथकाला आहे. सुशिक्षित आणि आधुनिक माओवादी निर्माण करण्याचा कारखाना सुरू झाल्याची ही नांदी असावी कदाचित.

सर्वहारा समाजाची अस्वस्थता आजपर्यंत जगातील सर्व समाजवादी विचारवंतांनी मांडली. अ‍ॅरिस्टॉटल, लेनिन, बेलाझ बेला, मार्क्स अशा तत्त्वचिंतकांनी याच जाणिवेतून जनसंवादाचे सिद्धांत (communication theory) मांडले. वर्गात शिकत असलेले सिद्धांत प्रत्यक्षपणे व्यवहारात वापरल्यास प्रश्नांचा निपटाराही लवकर होईल, असा विचार आजची तरुणाई करते आहे आणि नेमके असेच विद्यार्थी हेरून त्यांना माओवादी बनविण्याचा प्रयत्न काही संघटना करत असल्याचा संशय आहे. खरं तर आजचा तरुण महागाई, भ्रष्टाचार, राजकीय अनास्था याविषयी कमालीचा जागरूक झाला आहे. त्याची ही ऊर्जा उत्सर्जित व्हायला कुठेही वाव नाही, नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन सशस्त्र क्रांतीच्या बळावर परिवर्तन आणू इच्छिणाºया शक्ती माओवादी आणि नक्षलवादी घडवत आहेत. जागतिकीकरणामध्ये देशातील एक अख्खाच्या अख्खा समाजघटक डावलला गेला. त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण करण्याची तजवीज मायबाप सरकार करू शकलं नाही. सिंगूर, नर्मदा, लवासा अशा आंदोलनातून स्वत:च अस्तित्व हा समाज टिकवू पाहतो आहे. त्या समुदायाचं माणूसपण जितकं माओवाद्यांना समजलं तितकं आपण समजू शकलो नाही हे निदान आपण स्वीकारायला हवं. पोटाला अन्न आणि हाताला काम देण्याची तजवीज या राज्यव्यवस्थेकडून होत नाही म्हणून ही तरुणाई अशा चळवळीकडे आकर्षित होते. म. गांधी, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर यांच्यापेक्षा मग त्यांना लेनिन, माओ, ह्युगो चेविझ जवळचे वाटतात. लोकशाही स्वीकारलेल्या राज्यघटनेला मग तिलांजली दिली जाते आणि क्रांतीच्या नावाखाली रक्ताचा अभिषेक दिला जातो.

महाराष्ट्रात शाहीर सचिन माळी आणि शीतल साठे या जोडप्याला 2 महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली. सांस्कृतिक चळवळीतून नक्षलवाद सांगण्याचा प्रयत्न हे जोडपे करत आहे असा त्यांच्यावर आरोप होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की, आंबेडकरी समाजातील नवयुवक हा मोठ्या प्रमाणात अशा चळवळीत सहभागी होतो आहे. मुळात भारतीय समाजाच्या वर्गीय लढ्यात जे योगदान डॉ.आंबेडकरांनी दिले आहे ते वादातीत आहे. समानतेची आंबेडकरांना अपेक्षित असलेली चळवळ आजचा युवक जाणतो, पण हा युवक नेतृत्वहीन राहिला. आपली सामाजिक पत शोधण्यासाठी आणि संघर्ष लढा उभारण्यासाठी समाजवादी चळवळ पर्याय असू शकते असे त्यांना दिसले आणि त्या चळवळीत तो सहभागी झाला. ज्या नीतिमूल्यांवर समाजवादी विचारसरणी बनलेली आहे ती शोषितांच्या हक्काची, सर्वहारा समुदायाच्या न्यायाची बाजू घेणारी होती; परंतु उत्तरार्धात तरुणांचा जहाल गट या समाजवादी विचारसरणीतून बाहेर पडला आणि नक्षलवादी म्हणून त्याची ओळख झाली. गेल्या 2 दशकात या चळवळीने हिंसाचाराचा मार्ग स्वीकारत कशा प्रकारे रक्तरंजित क्रांती केली हे आपण सर्व जाणतात.

आपण समताधिष्ठित लोकशाहीचा स्वीकार केल्यावर हे नक्की झाले की, यापुढे येणारा शासक हा राजघराण्यातून नाही तर मतदार राजाच्या निवडीनुसार येईल; परंतु स्वातंत्र्योत्तर काळात काही ठराविक कुटुंबाकडे या देशाची सूत्रे राहिली. आपले प्रतिनिधी आपले नाहीत याची खात्री झाल्यावर समांतर सत्ता मिळविण्याचा प्रयत्न जहालवादी चळवळीकडून केला गेला. आपली लोकशाही मूल्ये हा तरुण विसरला आणि जे सिद्धांत आपल्या लोकशाही समाजव्यवस्थेला पोषक नाही अशांचा प्रात्यक्षिकरीत्या उपयोग करण्यात आला आणि परिणामी फसलेला हा प्रयोग सध्या अंगावर येत असल्याचे दिसत आहेच. विद्यार्थांमध्ये असलेली नवनिर्मितीची शक्ती आपण ओळखायला हवी आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 63 टक्के लोकसंख्या ही युवकांची आहे. या युवाशक्तीचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करण्याची गरज आहे.

आजच्या युवकाला जगाशी स्पर्धा करायची आहे. विकसित देशातील तरुणाचे त्याच्यापुढे आव्हान आहे. उद्योगनिर्मितीची, तंत्रज्ञानाची शिखरे त्याला पादाक्रांत करायची आहेत. या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेताना देशाच्या अगदी दुर्गम भागात राहणाºया तरुणाला याची कल्पना तरी आहे का हे विचारले गेले पाहिजे. सामाजिक प्रवाहात सगळ्यांना सोबत घेऊन उत्कर्ष करायला हवाच पण त्याचबरोबर आपली स्पर्धा जातीपातींमध्ये, धर्माधर्मात नाही तर नक्षलवादी, माओवादी, दहशतवादी यांच्याबरोबर आहे हे विसरून चालणार नाही.
(sagobhal@gmail.com)