आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुणग्राही, कदरदान-आचार्य अत्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सर्वच क्षेत्रांत आपले नाव कायमचे कोरून ठेवले आहे. त्यांची कामगिरी अष्टपैलू नसून षोडश पैलू होती, असे विधान पु.ल. देशपांडे यांनी एकेठिकाणी केले होते आणि ते सत्य आहे. त्यांचा एक मोठा गुण म्हणजे त्यांना आवडलेल्या कोणत्याही कलाकाराला, कलाकृतीला, साहित्यिकाला भरपूर दाद देत असत, प्रचंड कौतुक करून डोक्यावर घेत असत.

आचार्य अत्रे हे उत्तम कवी जसे होते तसेच मूळ इंग्रजी कवितेचे मराठी रूपांतर इतक्या उत्तम प्रकारे करीत की ते मूळ मराठीच वाटावे इतके अप्रतिम असे. ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांनी रूपांतरित केलेल्या ‘ही आग भुकेची’ ही कविता. 1942-43 मध्ये तत्कालीन अखंड बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला. लाखो लोक भुकेने बळी पडले. तेव्हा त्या परिस्थितीवर रॉय नावाच्या उडिया कवीने एक कविता लिहिली. तिचा अनुवाद इंग्रजीत हरेंद्रनाथ चटोपाध्याय (सरोजिनी नायडूंचे भाऊ-चित्रकार, कवी, अभिनेते) ह्यांनी केला. हा अनुवाद आचार्यांनी वाचला. त्यांना ती अनुवादित कविता इतकी आवडली की त्यांनी अत्यंत अनुरूप आणि प्रभावी रूपांतर केले की हे रूपांतरच मूळ आहे, असा समज मराठी भाषकांना होणे स्वाभाविकच होते. शब्दांची योजना अशी केली आहे की वाचक- श्रोत्यांच्या हृदयाला पीळ पाडते.

शाहीर अमर शेख हे त्यांच्या प्रभावी बुलंद आवाजात गात असत. श्रोत्यांचे डोळे भरून येत. काही तर रडू लागत, रोमांचित होत. हे सर्व आचार्यांना समजले. तेव्हा ते गीत ऐकण्यास त्यांच्या गाडीतून भाई जीवनजी लेन, गिरगाव येथे गेले. तेथे कलापथकाचा कार्यक्रम होता. अमर शेखांनी ‘ही आग’ गायला सुरुवात केली. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या आचार्यांना राहवले नाही. कम्युनिस्ट अमर शेखांना दाद देण्यास ते गाडीतून उतरले. गीत संपल्यावर ते मंचावर गेले. त्यांनी अमर शेखांची भेट घेतली. ही भेट म्हणजे एका थोर साहित्यिकाने एका मोठ्या गायक-कलाकाराला दिलेली दाद होती. कलापथकात अनेक कम्युनिस्ट कलाकार उषा ऊर्ध्वरेषे, गवाणकर, अण्णाभाऊ साठे इत्यादी होते. ‘अकलेची गोष्ट’, ‘जाऊ तेथे खाऊ’ असे वग होत असत. अमर शेख ‘दमादम मस्त कलंदर’ हे पंजाबी लोकगीत गात असत. त्यांचा आवाज आजच्या नावाजलेल्या ‘दमादम मस्त कलंदर’ पाकिस्तानी भारतीय गायक-गायिकांपेक्षा अधिक प्रभावी व पहाडी होता. अमर शेख हे ‘दमादम मस्त कलंदर’ गाता गाता नाचत असत. पण बहुतेक सर्वच कार्यक्रमांत ‘ही आग भुकेची’ ह्या गीताला मागणी प्रेक्षकांकडून हमखास होत असे आणि ती मागणी अमर शेख अत्यंत उत्साहाने पूर्ण करीत.

‘मराठा’ मधून आचार्य अत्र्यांनी संयुक्त
महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रभावी प्रचार केला. काँग्रेस आणि काँग्रेसी नेत्यांवर ते सतत तोफ डागत असत. अनेक नेत्यांच्या भानगडी, कुलंगडी ते ‘मराठा’मधून चव्हाट्यावर आणीत असत आणि हे ‘स्पुतनिक’ कधी प्रकाशित होणार हे आधीच ‘मराठा’मध्ये छापीत असत. त्यांनी त्यांच्या ‘कºहेचे पाणी’ ह्या आत्मवृत्तात ‘मराठा’संबंधी पाचव्या खंडात भरपूर लिहिले आहे. त्यांनी मराठी माणसाला ‘मराठा’ असे संबोधले जाते, तेही सर्व भारतभर, हेही स्पष्ट केले. (लो. टिळकांनी टं१ँं३३ं हे इंग्रजी वृत्तपत्र मराठी ‘केसरी’ सोबत काढले होते.) ‘मराठा’चे बोधवाक्य ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे होते. शिवाय सोबत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चित्रे होती. ‘मराठा’ चे उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले. पहिला अंक 15 नोव्हेंबर 1956 ला प्रकाशित झाला. ह्या अंकाच्या मुखपृष्ठावर कवी सुरेश भट ह्यांची ‘मराठा’ ही कविता प्रकाशित झाली. ह्या कवितेची सुरुवात ...

‘मराठ्या, उचल तुझी तलवार
एकीची उचल तुझी तलवार
शपथ तुला आईच्या दुधाची
घेऊ नको माघार... मराठ्या...’ अशी आहे.
कवी सुरेश भट हे ह्याआधीही एक उत्तम कवी म्हणून मराठी भाषकांना परिचित होते, पण ‘मराठा’ च्या मुखपृष्ठावर त्यांची कविता प्रकाशित झाल्याने त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. परिचित झाले. आत्मचरित्र ‘कºहेचे पाणी’ खंड पाचवर आचार्यांनी एक तरुण प्रतिभावान कवी असे सुरेशचे वर्णन पान नं. 320-21 वर केले असून ‘मराठ्या’ या कवितेची तीन कडवी छापली आहेत. सुरेश भट यांस अशी दाद आचार्यांनी दिली आणि ती सार्थ होती हे नंतर सिद्ध झाले.

आचार्यांनी, अनेक थोर व्यक्तींवर, नेत्यांवर त्यांच्या मृत्यूनंतर अग्रलेख लिहले. पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर एक लेखमाला लिहिली. ह्या लेखांचा संग्रह पुढे ‘सूर्यास्त’ म्हणून प्रकाशित झाला. लालबहादूर शास्त्री ह्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर एक लेखमाला लिहिली. ती पुढे ‘इतका लहान-इतका महान’ ह्या मथळ्याखाली प्रकाशित झाली. हे दोन्ही पंतप्रधान काँग्रेसचे आणि आचार्य अत्रे हे काँग्रेसच्या ‘महाराष्ट्र’ विरोधामुळे काँग्रेसचे विरोधक. पण ‘मरणांती वैराणी’ या न्यायाने अत्र्यांनी अत्यंत प्रभावी भाषेत उत्तम शैलीत दोन्ही लेखमाला समर्थपणे लिहिल्या. आचार्य अत्र्यांनी अनेक थोर व्यक्तींच्या मृत्यूनंतर लेख लिहिले. ह्या सर्वच मृत्युलेखांचा संग्रह ‘समाधीवरील अश्रू’ या नावाने प्रकाशित झाला. पण या संग्रहात त्यांच्या गाडीचा चाळीस वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या ‘बाबूराव’ वरचा मृत्युलेख अप्रतिम आहे. बाबूरावसंबंधीच्या अनेक लहान-मोठ्या आठवणी सांगून शेवटी - ‘जो सुखात डोलला, आनंदात हसला, दु:खात रडला, त्याला मी माझा नोकर कसा म्हणू?’ असा प्रश्न केला आहे.

आचार्य अत्रे हे शिक्षक, पत्रकार, राजकारणी, कादंबरीकार, नाटककार, कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, उत्तम वक्ते कसे होते हे समजून घेण्यासाठी त्यांचे ‘मी कसा झालो’ हे आत्मकथन जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.