आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलासाधनेचा सार्थ गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री फय्याज यांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीला पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या कलाकाराने अव्याहतपणे आपल्या कलेसाठी काम करत राहणे म्हणजे त्याच्या आयुष्याची ती साधनाच असते. याच साधनेचा गौरव फय्याज यांच्या वाट्याला आला आहे. पुढील वर्षी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी तीन दिवस ९५वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन बेळगाव येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी फय्याज यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मूळच्या सोलापूरच्या असलेल्या फय्याज यांनी १९६५मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातून रंगभूमीवर प्रथम पदार्पण केले. त्यानंतर त्यांचा संगीत व गद्य नाटकांमधील अभिनय व गायनप्रवास हा तमाम रसिकांसाठी एका समृद्ध काळाची आठवण आहे. "कट्यार काळजात घुसली', "होनाजी बाळा', "वीज म्हणाली धरतीला' यांसारखी संगीत नाटके वा "अश्रूंची झाली फुले’सारखी गद्य नाटके असोत वा अगदी अलीकडे ‘एक उनाड दिवस’ या चित्रपटात ‘हुरहुर असते तीच उरी’सारख्या श्रवणीय गाण्यापुरती छोटेखानी भूमिका असो, फय्याज या नेहमीच आपल्या गाण्याच्या व अभिनयाच्या माध्यमातून आपली कला जपत आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे नाट्यसंमेलन बेळगावला होत आहे. कर्नाटक-महाराष्ट्रामधील सीमावादामुळे हे शहर नेहमीच चर्चेत असते. आता नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मराठी-कन्नड नाते सौहार्दपणाने जोडले जाण्याची एक आशाही धरायला हरकत नाही. स्वत: फय्याज यांचा संगीत नाटकांना पुन्हा झळाळी मिळण्यासाठीचा प्रयत्न असणार आहे.
नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अध्यक्षपदाची कायमच निवडणूक पद्धत नसली तरी चुरस असते. मात्र, या वेळी नाशिकचे नाट्यदिग्दर्शक मुरलीधर खैरनार यांनी फय्याज यांची ज्येष्ठता लक्षात घेत स्वत:हून अर्ज मागे घेतला आणि फय्याज यांची वाट मोकळी केली. त्यामुळे आता बेळगावात ‘लागी करेजवा कट्यार’चे फय्याज यांचे रेशमी, कातरसूर घुमण्यास हरकत नाही. त्यांनी संगीत नाटकांना समकालात महत्त्व प्रस्थापित करण्याच्या बोलून दाखवलेल्या मनोदयाला या संमेलनात थोड्या प्रमाणात का होईना फलश्रुती मिळाली, तरी त्यांच्या अध्यक्ष असण्याचे सार्थक झाल्यासारखे होईल.