आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई दलाचे बलस्थान ‘ब्रह्मोस’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलाच्या शक्तीची ओळख बनलेल्या ‘सुखोई-३० एमकेआय’ या बहुउद्देशीय लढाऊ विमानाची मारक क्षमता वाढवण्याच्या हेतूने त्यामध्ये नवनवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे. त्याच वेळी त्याला विविध प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यायोग्य बनवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ‘ब्रह्मोस’ हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्र ‘सुखोई-३० एमकेआय’वरून डागण्याच्या चाचण्या गेल्या अॉक्टोबरच्या अखेरीपासून सुरू झाल्या. या सर्व चाचण्या अपेक्षेनुसार यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत हे क्षेपणास्त्र ‘सुखोई-३० एमकेआय’वर कायमस्वरूपी तैनात केले जाईल. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची ‘निर्भय’ आणि ‘अस्त्र’ ही क्षेपणास्त्रेही या विमानाशी संलग्न करण्यात येणार आहेत. यामुळे आपल्या प्रभावक्षेत्रावरचा दरारा आणखी वाढवण्यासाठी हे नवे ‘ब्रह्मोसयुक्त सुखोई’ भारतीय हवाई दलाला लाभदायक ठरणार आहे. ‘ब्रह्मोस’च्या समावेशानंतर स्वनातीत लढाऊ विमानावरून स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता जगात केवळ भारतीय हवाई दलाने प्राप्त केलेली असेल.

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचा भारतीय भूदलात याआधीच समावेश करण्यात आला आहे. भारतीय नौदलातील अनेक युद्धनौकांवरही हे क्षेपणास्त्र एकीकृत करण्यात आले आहे. सध्या पाणबुड्यांवर तैनात केली जाणारी ‘ब्रह्मोस’ची आवृत्ती विकसित करण्यात येत असून तिच्या चाचण्याही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ‘ब्रह्मोस’ची हवाई दलासाठीची आवृत्ती अन्य दलांपेक्षा वेगळी आहे. हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानावरून वाहून नेण्यात येणार असल्याने मूळच्या क्षेपणास्त्रामध्ये काही बदल करावे लागले आहेत. तरीही त्यामुळे त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजीही घेण्यात आली आहे. ‘ब्रह्मोस’च्या अन्य आवृत्त्यांपेक्षा हवाई आवृत्तीचे वजनही अर्ध्या टनाने कमी करण्यात आले आहे. लांबी कमी करताना क्षेपणास्त्रावरील पहिल्या टप्प्यातील बुस्टर काढून टाकण्यात आला आहे. कारण लढाऊ विमानाच्या गतीमुळे आपोआपच पहिल्या टप्प्यात आवश्यक असलेली गती क्षेपणास्त्राला मिळणार आहे. ‘सुखोई’तून ‘ब्रह्मोस’ला डागल्यावर सुरुवातीला ते १०० ते १५० मीटरपर्यंत जमिनीच्या दिशेने सरळ जाईल. त्यानंतर काही सेकंदांत इंजिन प्रज्वलित होऊन क्षेपणास्त्राला अपेक्षित गती मिळेल. हे स्वनातीत क्षेपणास्त्र असल्यामुळे ते लक्ष्याच्या दिशेने आवाजाच्या २.८ पट अधिक वेगाने जाते.

‘ब्रह्मोस’ हे क्रूझ क्षेपणास्त्र असल्यामुळे विमानापासून वेगळे झाल्यावर त्याला त्या विमानातूनच लक्ष्यापर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे. हवेतून डागताना उपयुक्त ठरणाऱ्या ‘सुखोई’वरील ‘फ्री फॉल यंत्रणे’ची चाचणीही ‘ब्रह्मोस’च्या हवाई आवृत्तीच्या चाचण्यांच्या वेळी घेतली जाणार आहे. या यंत्रणेच्या मदतीने ‘सुखोई’ जमिनीपासून एक हजार ते तब्बल ४६ हजार फुटांवरून उडत असतानाही ‘ब्रह्मोस’ला सहजतेने प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे.

‘ब्रह्मोस’ अगदी अचूक (पिनपॉइंट) लक्ष्यभेद करू शकत असल्याने त्याच्या सामिलीकरणानंतर भारतीय हवाई दलाची सामरिक पोहोच अधिक प्रभावी होणार आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनांमुळे भारत आणि रशियाला ‘ब्रह्मोस’ विकसित करीत असताना त्याचा पल्ला तीनशे किलोमीटरच्या आत ठेवावा लागला आहे. असे असले तरीही आता ‘सुखोई-३० एमकेआय’ विमानावरील तैनातीमुळे ‘ब्रह्मोस’चा पल्ला आपोआपच सुमारे बारापटींनी वाढणार आहे. ‘सुखोई’चा पल्ला ३००० किलोमीटरइतका आहे. हवेत उडत असतानाच इंधन भरल्यास हा पल्ला आठ हजार किलोमीटर होतो. जगातील कोणत्याही ठिकाणी कमीत कमी वेळेत पोहोचून अतिशय अचूक मारा करताना ‘सुखोई’ विमानाला आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत आणि शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणांच्या टप्प्याच्या बाहेर राहून आपले उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.
‘सुखोई’ हे चार प्लसप्लस श्रेणीतील बहुउद्देशीय लढाऊ विमान असून ‘ब्रह्मोस’मुळे त्याची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलातील ४२ ‘सुखोई’ विमानांवर ‘ब्रह्मोस’ बसवण्याची योजना आहे. ही विमाने भारताच्या ‘सामरिक सेना विभागा’च्या अंतर्गत राहणार आहेत. कालांतराने त्याच विमानांवर स्वदेशी बनावटीचे ‘निर्भय’ हे सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रसुद्धा बसवले जाणार असून त्याचा पल्ला एक हजार किलोमीटरइतका असणार आहे.
हवाई दलातील सध्याच्या ‘सुखोई-३० एमकेआय’मध्ये सुधारणा करून त्यांना ‘सुपर सुखोई’मध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे. मात्र ‘ब्रह्मोस’साठी ‘सुखोई’मध्ये सुधारणा करणे, ‘निर्भय’चा विकास, ‘सुपर सुखोई’ योजना असे सर्वच प्रकल्प सध्या बरेच रखडलेले आहेत.

यंदाच्या भारतीय हवाई दल दिनी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी हिंदन हवाई तळावरून केलेल्या भाषणात म्हटले होते की, भारतीय हवाई दल आता ‘व्यूहात्मक हवाई दल’ झाले आहे. अलीकडील काळात भारतीय हवाई दलाला आपल्या सामरिक हितांच्या संरक्षणासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील घडामोडींवरही सतत लक्ष ठेवावे लागत आहे, असेही हवाई दल प्रमुखांनी त्या वेळी म्हटले होते. भारतीय हवाई दलाची हीच ‘सामरिक पोहोच’ (स्ट्रॅटेजिक रीच) अधिक भक्कम करण्यात ‘सुखोई’ आणि त्यावर बसवण्यात येत असलेली ‘ब्रह्मोस’, ‘अस्त्र’ आणि ‘निर्भय’ ही क्षेपणास्त्रे संयुक्तपणे मोलाचे योगदान देणार आहेत. सध्या विकसित करण्यात येत असलेली ‘वरुणास्त्र’ आणि ‘वाघनख’ ही वैशिष्ट्यपूर्ण क्षेपणास्त्रेही नजीकच्या काळात ‘सुखोई’वर तैनात केली जाणार आहेत. त्याचबरोबर भारतीय हवाई दलातील ‘मिग-२९ यूपीजी’ आणि येऊ घातलेल्या ‘रफाल’वर तसेच भारतीय नौदलातील ‘मिग-२९ के’ या विमानांवर बसवता येईल अशा प्रकारची ब्रह्मोसची ‘ब्रह्मोस-एम’ ही छोटी आवृत्ती विकसित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिसेंबरमधील रशिया दौऱ्यात त्याबाबत करार होण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मोस-एम’मुळे ‘सुखोई’वरून एकापेक्षा जास्त ब्रह्मोस एकाच वेळी वाहून नेता येऊ शकतील. ‘ब्रह्मोस’ची सध्याची हवाई आवृत्ती ही या सर्वांची सुरुवात मानता येईल. साधारणतः एप्रिल २०१६ पर्यंत ‘ब्रह्मोस’च्या हवाई आवृत्तीच्या ‘सुखोई’वरून चार चाचण्या पार पडणार आहेत. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्यास त्यानंतर लगेचच ते ‘ब्रह्मोसयुक्त सुखोई’ भारतीय हवाई दलात तैनात केले जाणार आहे.
Parag12951@gmail.com