आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मक्लेश आणि ‘दीवार!’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पीटर , तुम लोग मुझे वहा ढूंढ़ रहे हो और मई तुम्हारा यहाँ पर इंतजार कर रहा हू’ या आविर्भावात अजितदादा कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर उपोषणाला बसले आणि महाराष्‍ट्रातील तमाम जनता आश्चर्यचकित झाली व तोंडात (?) बोटे घातली. काही तरी नवीन पाहायला मिळेल म्हणून आम्ही पण टीव्हीसमोर दिवसभर बसून आत्मक्लेश करून घेतला. क्रिकेट बघण्याची सवय जशी कसोटी आणि वन डेने लावली, अन आता आयपीएल पाहणे नशिबी आले. तसेच अण्णा व केजरीवाल यांनी उपोषण लाइव्ह बघण्याची सवय लावली. आता दादांचे उपोषण बघण्याचे थोर भाग्य आम्हास लाभले.

अण्णाच्या उपोषणप्रसंगी देशप्रेम ओसंडून वाहत होते, तर दादांच्या आत्मक्लेश उपोषणात त्यांचे बगलबच्चे ‘चिअर लीडर’प्रमाणे मागे-पुढे फिरताना दिसले. दीवार चित्रपटातील विजय म्हणजे बिग बी व अजितदादा यांच्यात कमालीचे साम्य आम्ही हेरले. पगाराच्या दिवशी गुंडांचा हप्ता निमूटपणे देणाºया रांगेत बिग बी जसा अंग्री यंग मॅनप्रमाणे ‘अगली बार एक और मजदूर हप्ता देने से मना करेगा,’ म्हणत बंडाचा झेंडा रोवतो, तसेच दादांनीसुद्धा धरणातून निमूटपणे पाणी सोडण्याचे नाकारून ‘अब एक मंत्री पानी देने से मना करेगा, ’ या आविर्भावात पाणीच नाही तर काय मुतायचे? हा अ‍ॅडिशनल डायलॉग झोडून बसले आणि पुढचा चित्रपट टॅक्स फ्री चित्रपटाप्रमाणे तमाम महाराष्‍ट्राने ‘याची देहि याची डोळा’ बघितला. आता या पिटरला खरे तर सीनियर पवार साहेब नेहमीच शोधत असतात, पण ‘ढूंढते रह जाओगे’ असे दादाही चॅलेंज दिल्याप्रमाणे वागत असतात. महाराष्‍ट्राचा हा अँग्री यंग मॅन आत्मक्लेश करण्यास बसला आणि अण्णा भक्तांना एकदम आपली ‘मोनोपॉली’ नाहीशी होते की काय अशी शंका येऊ लागली असेल. या उपोषणाचे फॅ ड आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. याला फॅ शन शो मधील ‘कॅट वॉक’प्रमाणे ग्लॅमर येऊ लागले आहे. भविष्यात कित्येक कंपन्या आयपीएलच्या प्रायोजकत्वाला तिलांजली देऊन उपोषण, आत्मक्लेश लाइव्ह दाखावण्यासाठी हक्क विकत घेतील. म्हणजे यापुढे कदाचित ‘धिस पार्ट आॅफ आत्मक्लेश इज ब्रॉट टू यू बाय अमूल माचो, बड़े आराम से’ असे लवकरच पाहावयास मिळू शकते, त्याचे दरही टिच्चून असतील.

असो, तर हा टॅक्स फ्री करमणुकीचा रविवार मजेत गेला. कित्येकांनी फिरण्याचे बेत रद्द केले, यामुळे इंधन बचत तर झाली व ‘अर्थ अवर’ सारखे ‘बिन-अर्थ डे’ साजरा झाला हेही नसे थोडके ..

या निमित्ताने पवार घराण्याचा ‘दीवार’ चित्रपट अधोरेखित झाला. आता क्लायमॅक्स पाहणे शिल्लक आहे. ज्यात कदाचित सुप्रियाताई आणि अजितदादा समोरासमोर येतील व अजितदादा ‘बिग बी’ च्या गुर्मीत सुप्रियाताईना म्हणतील, ‘मेरे पास बंगला है, गाडी है , बँक बॅलन्स है , मंत्रिपद है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है ? त्यावर सुप्रियाताई शशी कपूरसारखे शांतपणे दादांना ‘मेरे पास पा है’ असे म्हणून निरुत्तर करतील तेव्हा रसिकहो, क्लायमॅक्स बघण्याच्या तयारीत राहा. असाच एखादा करमणूकप्रधान रविवार घालवण्याचा योग लवकरच येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ......!