आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर नियतीने शतक हुकवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अनेक क्रिकेटपटूंच्या शतकांची नोंद ठेवणा-या आनंदजी डोसा यांच्या वयाचे शतक अवघ्या दोन वर्षांनी हुकले. न्यूयॉर्क येथे ९९ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन (२२ सप्टेंबर) झाले. ज्या काळात कागद, पेन आणि पेन्सिल या आयुधांच्या आधारावर क्रिकेटच्या आकडेवारीची नोंद होत होती, त्या काळातले आनंदजी डोसा आघाडीचे आकडेशास्त्री म्हणून ओळखले जायचे.
क्रिकेटच्या कसोटी सामन्यांचीदेखील ज्या काळात सविस्तर नोंद होत नव्हती, त्या काळात आनंदजीभाईंनी इराणी, रणजी एवढेच नव्हे, तर त्यापूर्वीच्या सामन्यांचीदेखील रंगतदार नोंद ठेवली. प्रत्येक छोट्या सामन्यातील छोटे-छोटे, जिवंत क्षणदेखील त्यांनी लिहून ठेवले. कोणता खेळाडू जायबंदी होऊन मैदानाबाहेर गेला, त्याची जागा कुणी घेतली, कुणी नकला केल्या, एवढेच नव्हे, तर मैदानात कुत्रा घुसला व त्याने वाया घालवलेली सामन्याची वेळ आदी घटनांचा तपशील आनंदजींनी टिपला. त्यांचे मोठेपण म्हणजे त्या काळी खेळाडूंची जन्मतारीख, जन्मस्थळ, आकडेवारी कुठेच उपलब्ध नसायची. त्या काळात ती सारी दौलत आनंदजींच्या हस्तलिखितामध्ये, डायरी, पुस्तकामध्ये होती. त्यांनी क्रिकेटच्या नोंदीचा हा अमूल्य खजिना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील क्रिकेट वाचनालयाला दान केला. त्यांच्या या दातृत्वाचा गौरव म्हणून राजसिंग डुंगरपूर यांनी सीसीआयमधील त्या वाचनालयालाच आनंदजी डोसा यांचे नाव देऊन टाकले. आनंदजी यांनी कांगा लायब्ररीचे विश्वस्त म्हणूनही काम केले होते.
आजच्या व्यावसायिक क्रिकेटच्या दुनियेपासून वेगळा असलेला हा अवलिया होता. एकही पैसा न घेता त्यांनी क्रिकेटची अविरत सेवा केली. आजच्या वेगवान व आखूड कालावधीच्या क्रिकेटमध्येही ते स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व टिकवून होते. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला गेल्या आठवड्यात "विस्डेन'सारख्या क्रिकेटच्या बायबलनेही त्यांची दखल घेऊन शतकपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. इतरांच्या शतकांची नोंद करणा-या क्रिकेटच्या मैदानावरील या चित्रगुप्ताच्या शतकाची मात्र नियतीला नोंद करावी, असे वाटले नाही.