आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँडरसनच्या आरोपात दडलीय कबुली!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आपण केवळ इंग्लिश वातावरणातच मारा करू शकतो, असे जिमी अँडरसनला सांगायचेय का?’ ‘विराट कोहलीचा भारत विरुद्ध इंग्लंड’ यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेच्या संदर्भात हा रोखठोक सवाल विचारायला पुढे सरसावलाय, दक्षिण आफ्रिकेचा माजी कप्तान ग्रॅम स्मिथ.

कसोटीत ४६७ बळी घेणारा अँडरसन, इंग्लिश इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज. ऐन जवानीच्या वर्षात मोहक (सेक्स सिम्बॉल) शरीरयष्टीच्या अँडरसनला टोमणेबाजीचे, काहीशा धसमुसळेपणाचे छंद. ब्रिटिश माऱ्याचे प्रमुख अस्त्र मानलेल्या अँडरसनला १८३ षटकं चाललेल्या भारतीय डावात दिली गेली अवघी वीस (वांझोटी!) षटकं. अन् मुंबईतील खेळपट्टीवर दुसरा नवा चेंडू ८० नव्हे, तर चक्क १२९ षटकांनंतर घेतला जावा, त्यातूनही अँडरसनचा वैताग वाढलेला! याउलट अँडरसनला प्रेक्षक बनवणाऱ्या त्या दोन दिवसांत, विराट कोहली २३५ धावांची लाजवाब खेळी खुशाल खेळत राहिला. मालिकेत सहाशे धावा, कॅलेंडर वर्षात तीन त्रिशतकांसह बाराशे धावा कसोटी अन् वीस व पन्नास षटकांची झटपट कसोटी यात सर्वाधिक २५८० धावा असे नवनवे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रम साजरे करत राहिला, हे सारं पचवणं अँडरसनला किती कठीण गेलं! दोन वर्षांपूर्वी इंग्लिश दौऱ्यात विराटच्या खात्यात दहा डावांत दीडशेही धावा नव्हत्या ही वस्तुस्थिती. तेव्हाची सरासरी तेरा-चौदा धावा. आता भारतात ६४० धावा त्यानं झोडपून काढल्या त्या १२८ च्या सरासरीनं! विराटची कामगिरी पाचपट-दहापट उंचावण्याचे श्रेय त्याच्या तंत्रातील सुधारणेस द्यावे काय?

‘कोहलीचं तंत्र सुधारलंय याची खात्री मला वाटत नाही. त्याच्यातील तांत्रिक उणिवा, भारतीय खेळपट्ट्यांवर दृष्टोत्पत्तीस येऊ शकल्या नाहीत. त्याच्या बॅटची कड टिपण्याइतपत चेंडू इंग्लंडप्रमाणे येथे मात्र उसळत नाहीत. इंग्लंडमध्ये चेंडू थोडाफार दिशा बदलतो. येथे तसं घडत नाही. अशा परिस्थितीत खेळणं त्याला चांगलं जमतं. फिरकी तर तो उत्तम खेळतो. तुम्हाला मिळणारी संधी तुम्ही साधू शकत नसाल, तर तो तुम्हाला ठोकून काढील.’ अँडरसन उवाच! या तफावतीस उभय देशांतील खेळपट्ट्याही कारणीभूत असणारच! विराटच्या कामगिरीतील तफावत टिपणारा अँडरसन दोन गोष्टी लपवू पाहत आहे! विराटने केवळ भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व विंडीज दणाणून सोडलंय. दुसरी बाब म्हणजे इंग्लिश वातावरणात चमकणाऱ्या अँडरसनने भारतात काय दिवे लावले आहेत? अँडरसनच्या आरोपात दडलाय त्याचा कबुलीजबाब, भारतातील अपयशाचा!

विराट मैदान गाजवत असताना अन् अँडरसन नि:ष्प्रभ होत असताना भारतीय यश अधिकाधिक उंचावत होतं. सलामीची कसोटी कशीबशी वाचवण्याची खटपट. दुसऱ्या झुंजीत २४६ धावांनी फत्ते. मग आठ गडी राखून आणि मुंबईत तर एक डाव व ३६ धावांनी मात. प्रारंभिक डावात चारशेची मजल मारणाऱ्या संघाने एका डावाने शरणागती पत्करण्याची ही केवळ तिसरी करामत. हा चमत्कार सर्वात प्रथम घडवून दाखवला १९३० मध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडमध्ये. पाच वर्षांपूर्वी इंग्लंडने तो झटका दिला श्रीलंकेला.

विशेष म्हणजे, परदेशी संघाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी भारतानं पहिल्या दिवसापासून फिरणाऱ्या ‘आखाडा’ खेळपट्ट्यांचा आधार घेण्याचं टाळलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर व मोहाली येथील सामने आखाड्यात खेळवले गेले होते; पण मायदेशी आपल्याला सोयीस्कर खेळपट्ट्या तयार करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने भारतीय खेळपट्ट्यांबाबत चकार शब्द काढला नव्हता. इंग्लंडविरुद्धचं यश खेळकर खेळपट्ट्यांवरचं म्हणूनच निर्विवाद व भविष्यकाळाविषयी उमेद वाढवणारं. अँडरसनने विराटला काढलेल्या चिमट्यात जरूर तथ्य आहे. आणि विराट त्याला मैदानी उत्तर आगामी इंग्लिश दौऱ्यातच देऊ शकेल. अँडरसनने हे चिमटे काढताना स्वत:च्या इंग्लंडच्या सपशेल शरणागतीची कबुली दिली असती तर त्याची टीका एकांगी झाली नसती, हेही खरंच.

सचिन, द्रविड, सेहवाग व लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर उदयास आले कोहली, पुजारा, मुरली विजय व रहाणे. त्यातही केंद्रस्थानी आहे नवा नायक विराट कोहली. पण येथे हेही समजून-उमजून घेतलं पाहिजे की, विराटच्या इतकाच केंद्रबिंदू आहे रवी अश्विन, सी. के. नायडूंसह निस्सार-अमरसिंग, विजय मर्चंट, हजारेंसह सुभाष गुप्ते व विनू मांकड, सुनील गावस्करसह कपिलदेव, वाडेकरसह चंद्रा व बेदी, सचिन व राहुलसह कुंबळे, जहीर खान व हरभजन, अझरुद्दीनसह श्रीनाथ, तसाच विराटसह अश्विन.

मुंबईत विराटच्या दणदणीत २३५; पण अश्विनचे संहारक सहा अधिक सहा असे डझनभर बळी. डावात चार बळींचे मूल्य शतकाच्या बरोबरीचं, असं मी मानतो. या कसोटीवर अश्विनचे बारा बळी, किमान अडीचशे ते कमाल तीनशे धावांसारखे, त्यालाही दाद द्या, त्या खालोखाल जाडेजा व उगवता जयंत यादव यांना तसेच शर्मा व उमेश यादव यांचेही थोडे ऋण मान्य करा. एकनाथ सोलकरच्या (ज्याची उणीव सदैव भासते) झेलांना, चंद्रा-बेदी प्रसन्नाच्या बळींचा पंचवीस-तीस टक्के वाटा द्यावा, असं तेव्हाचे कर्णधार पतौडी-वाडेकर म्हणत. क्रिकेटमधील या साऱ्या रत्नांची कदर करूया.
वि. वि. करमरकर
(ज्येष्ठ क्रीडा पत्रकार-समीक्षक)
बातम्या आणखी आहेत...