आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांचे भरकटलेले आंदोलनास्त्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाईट कारभार करून मोदी यांनी अण्णा यांना आंदोलने करण्याची कितीही संधी दिली तरी त्यांच्या सातत्याने भूमिका बदलण्यामुळे अशी आंदोलने यशस्वी होण्याची शक्यता धूसर आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावाचा केलेला कायापालट हा एक आदर्श प्रकल्प आहे. मात्र, भ्रष्टाचार, लालफितीचा कारभार आदी वाईट गोष्टींपासून देशाला मुक्त करण्यासाठी अण्णा हजारे गेल्या काही वर्षांपासून ज्या रीतीने सामाजिक आंदोलन करीत आहेत ते आदर्शवत नव्हे, तर संपूर्णपणे भरकटलेले आहे. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसची ‘विकेट’ काढणारे अण्णा हजारे आता मोदी सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा जननेत्यांनी आंदोलन छेडताना कायदेतज्ज्ञांपासून अनेक क्षेत्रांतील मान्यवरांची मजबूत साथ घेतली होती. निश्चित विचारविनिमय करूनच हे नेते आंदोलनाच्या रणमैदानात उतरत. त्यामुळे काही प्रमाणात यश येऊन आंदोलनांचे संतुलनही नीट सांभाळले जात असे. महाराष्ट्रातील युती सरकार असो वा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार, त्यांच्या कारभारातील घोटाळे वेशीवर टांगून अण्णांनी काही मंत्र्यांना घरी बसवले. त्यानंतर लोकपाल विधेयक, माहितीचा अधिकार असे अनेक मुद्दे घेऊन अण्णा हजारे यांनी देशपातळीवर आंदोलन उभारले. तेही इतिहासजमा झाले.

लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींनी सही करून एक वर्ष झाले, मात्र हे विधेयक अमलात आणण्यासाठी काहीही हालचाल मोदी सरकारने केली नाही. म्हणजेच जनतेला दिलेली आश्वासने मोदी पाळत नाहीत, असा नवा साक्षात्कार अण्णा हजारे यांना झाला आहे. मुळात केंद्रातील काँग्रेसच्या राजवटीत अण्णांचे आंदोलन उभे राहिले त्यामागे रा. स्व. संघाच्या मंडळींचा सहभाग होता हे उघड सत्य आहे. आता नरेंद्र मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे बोलू लागल्यानंतर संघीय मंडळींची खूपच पंचाईत झाली असणार. अण्णांची सारी वक्तव्ये व आंदोलने ही लाटेवरच्या अक्षरांसारखी आहेत. त्यामुळे समजा वाईट कारभार करून नरेंद्र मोदी यांनी अण्णा यांना आंदोलने करण्याची कितीही संधी दिली तरी अण्णांच्या सातत्याने भूमिका बदलण्यामुळे अशी आंदोलने यशस्वी होण्याची शक्यता धूसर आहे.