आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Appointment Of Pakistan Spy Agency ISI, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवाझ शरीफ सरकारला शह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)च्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची झालेली नेमणूक पाकिस्तानच्या सरकार व लष्कर यांच्यातील संघर्षाचे एक उदाहरण आहे. प्रथेनुसार पाकिस्तानचे लष्कर गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदाचे नाव निश्चित करते, पण त्याची घोषणा मात्र पाकिस्तानच्या सरकारकडून केली जाते. या वेळी रिझवान यांचे नाव सरकारने नव्हे तर लष्कराने परस्पर जाहीर केले. ही घटना वरवरची वाटत असली तरी नवाझ शरीफ सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने त्यांच्याशी फारशी सहकार्याची भूमिका घेतलेली नाही.
पाकिस्तानच्या राजकारणात आयएसआयचा प्रमुख हा एक महत्त्वाचा घटक असतो. तो पंतप्रधानांच्या निर्देशानुसार काम करत असला तरी लष्कर आणि आयएसआय यांच्या कारवाया आजपर्यंत जगाने पाहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवाझ शरीफ सरकारविरोधात इस्लामाबादमध्ये झालेली तीव्र निदर्शने, माजी क्रिकेटपटू व राजकीय नेते इम्रान खान यांना मिळणारी छुपी राजकीय रसद लष्कराकडून होती हे स्पष्ट दिसून आले होते. त्यानंतर पाकिस्तानमधील मीडियामधून लष्कर व लोकनियुक्त सरकार यांच्या सुप्त संघर्षाबद्दल बातम्या सातत्याने येत आहेत. दुसरीकडे भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने काश्मीरविषयीच्या धोरणात थेट हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. लष्करातील काही भारतविरोधी गट कार्यरत झाले आहेत.
काश्मीरमधील पूरग्रस्तांना मानवतेच्या भूमिकेतून मदत करण्याऐवजी पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवाद्यांना जम्मू व काश्मीरमध्ये घुसवण्याचे प्रयत्न केले. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराविरोधात गैरसमज पसरवणे व मदतकार्यात अडथळे आणून जम्मू आणि काश्मीर सरकारची प्रतिमा मलिन करणे, असे पाकिस्तानी लष्कराचे हेतू होते. ही चाल प्रामुख्याने उभय देशांमधील संबंध अधिक कटू कसे होतील या दिशेने होती. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातला राजकीय पेच संपुष्टात आल्याने त्याचा फायदा भारताला होऊ नये म्हणून पाकिस्तानच्या लष्कराने भारतविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. आयएसआयचा नवा प्रमुख हे राजकारण कसे सांभाळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.