आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण जेटलींची रास्त नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या राड्यावर आणि केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांबाबत आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यांनी ती जाहीरपणे बोलून दाखवली हे महत्त्वाचे आहे. भाजपचे विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकणाऱ्या शिवसैनिकांचा 'मातोश्री'त जाहीर सत्कार केल्यामुळे भाजप पुरता दुखावला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे वृत्त पसरल्यानंतर परकीय गुंतवणुकीपासून पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबतही संशयाचे व कटुतेचे वातावरण प्रसारमाध्यमांतून उमटू लागले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे नाव अशा राडेबाज राजकारणामुळे बदनाम होते व राज्याची प्रतिमा कलंकित होते, अशीही प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर देशाचे अर्थमंत्री म्हणून जेटलींनी शिवसेनेवर टीका केली ते योग्यच झाले.
केंद्रात दीड वर्ष व राज्यात आता जवळपास एक वर्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय वर्तनात तसा काहीच फरक पडलेला नाही. केंद्रात फारसा विरोध न करता राज्यात मात्र भाजपच्या विरोधात सातत्याने असहकाराचे राजकारण शिवसेनेने सुरू ठेवले आहे. शिवसेनेचे जन्मापासूनचे राजकारणच रस्त्यावरचे, राडेबाज आहे. पूर्वी विरोधात असताना या दोघांना पाकिस्तानविरोध एकमुखाने करणे सोपे होते. आता सत्तेत आल्यानंतर भाजपला आपला पाकिस्तानविरोध विविध आंतरराष्ट्रीय कारणांमुळे-दबावांमुळे मवाळ करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात आर्थिक प्रश्नांपेक्षा सामाजिक-धार्मिक प्रश्नांवर देशाचे राजकारण ढवळून निघत असताना मोदींचे विकासवादी राजकारण पुरते मागे पडत आहे, याची चिंता जेटलींना नक्कीच वाटत असेल. उन्मादाला उधाण यायला वेळ लागत नाही; पण शांतता प्रस्थापित होण्यासाठी दीर्घकाळ लागतो हे देशाने अनेक वेळा अनुभवले आहे. जेटली आज उजव्या गटांना ज्या कानपिचक्या देत आहेत त्या गटांच्या मुसक्या बांधणाऱ्या हालचालीही सरकारने केल्या तर ठीक आहे. शिवसेनेच्या वर्तनात बदल होण्याची वाट पाहणे निरर्थक ठरेल.