आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समजूतदार आंबेडकरवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत किती क्षमतेचे डीजे वाजवायचे, यावरून सामाजिक संघटना आणि पोलिस प्रशासनात निर्माण झालेला तणाव सहा दिवसांनंतर निवळला. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. कारण एकीकडे सारा देश महामानवाच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनात गुंतला असताना औरंगाबादेत मात्र मिरवणुकीत आवाज किती कमी, किती जास्त यावर वाद सुरू झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाची भूमी असलेल्या औरंगाबादेत आंबेडकरवादी चळवळीचे मोठे स्थान आहे. सर्वच जाती, धर्मांचे आणि पंथाचे लोक येथे उत्साहाने आंबेडकर जयंतीत सहभागी होत असतात. त्याचे नेतृत्व गेल्या काही वर्षांत खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे गेले आहे. त्यातून काही प्रश्नही निर्माण होत आहेत. डीजे प्रकरण त्यापैकीच एक आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक मिरवणुकीत किती डेसिबल्स आवाज असावा, याविषयी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याचे पालन झालेच पाहिजे, असा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचा आग्रह होता. तो योग्यच होता. मात्र, तो सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अवलंबलेली पद्धत पोलिसी खाक्याची होती. त्यामुळे मुद्दा कायद्याच्या पालनाचा असला तरी त्याला पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला. आयुक्तांच्या विरोधात मोर्चाची तयारी सुरू झाली. कायद्याचे पालन करावे, याकरिताच पोलिस असतात. मात्र, प्रत्येक ठिकाणी पोलिसी जरब दाखवून उपयोग होतोच असे नाही. विशेषत: संवेदनशील प्रकरणात तर जरबेऐवजी समजुतीचा मार्ग अत्यावश्यक असतो. अमितेशकुमार त्यावर चालण्यास फारसे राजी नसल्याचे लक्षात आल्यावर विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांनी हस्तक्षेप केला. चार-सहा साउंड बॉक्सऐवजी दोन बॉक्सचे डीजे लावण्याचा उपाय समोर आला. तो आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही मान्य केला. समजूतदारपणा दाखवत कायद्याच्या पालनाचे महत्त्व त्यांनी जाणले, याबद्दल औरंगाबादकर त्यांना निश्चितच धन्यवाद देतील.