भारतीय क्रिकेट बोर्डाने निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली या तीन महान फलंदाजांना नोकरी देऊ केली आहे, या घटनेचा
आपण काय अर्थ लावायचा? ही समिती जगातील सर्वात श्रीमंत अशी क्रिकेट समिती आहे. महान फलंदाजांची सेवा घेण्यासंदर्भात या समितीने त्यांची बाजू मांडणारं विधान प्रसिद्ध केलं. त्यात म्हटलं होतं की, या दिग्गज खेळाडूंची पहिली जबाबदारी ही आताच्या राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करणे ही असेल, जेणेकरून संघाची परदेशातील कामगिरी सुधारेल, शिवाय आमच्याकडे दर्जेदार खेळाडू तयार होण्याचा जो मार्ग आहे तोही सुधारेल आणि स्थानिक क्रिकेटचा दर्जा उंचावून त्यांना बलाढ्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आव्हान पचवता येईल.
हे वक्तव्य फारच संदिग्ध आहे. कारण, सौरव गांगुली ही घोषणा झाल्यावर म्हणाला, भविष्यात काय भूमिका बजावावी लागणार याची आपल्याला काहीच कल्पना नाही. याचाच अर्थ खेळाडूंना व्यवस्थित विचारण्यातच आले नव्हते किंवा गांभीर्यपूर्वक सल्लामसलत झालीच नव्हती. फक्त हे महान खेळाडू बीसीसीआयशी काही करून जोडले जावेत एवढाच हेतू त्यामागे दिसत होता.
पण मग भारताच्या क्रिकेट बोर्डामध्ये सध्या नेमकं चाललंय तरी काय? त्यात ‘द वॉल’ या उपाधीने गौरवल्या गेलेल्या व ‘महान’ या श्रेणीत शोभून दिसणा-या राहुल द्रविडने या सल्लागार समितीत दाखल व्हायला नकारच दिला आहे, त्याचे काय?
या संदर्भात आतील गोटाची बातमी सांगते, जिथे सौरव गांगुली असतो अशा कुठल्याही ठिकाणी जायला राहुल द्रविड नाखुश असतो. याचे कारण त्यांच्यातले जुने शत्रुत्व. द्रविडच्या संदर्भातील आणखी एक बातमी अशी की, तो १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि भारताच्या ‘अ’ संघाला प्रशिक्षित करणार आहे. पण जर त्याच्यावरची जबाबदारी इतकी ठळकपणे नमूद केली असेल तर नेमकी त्याच्याच नावाची घोषणा का नाही करण्यात आली?
स्पष्टवक्ता म्हणून प्रसिद्ध असलेले माजी कप्तान बिशनसिंग बेदी म्हणाले, ‘जी काही नवी समिती बनते आहे, तिचे स्वरूपच मला कळत नाही.’ आता त्यांच्यासारख्या दिग्गजाला जर कळणार नसेल तर इतरांना ते कसे कळेल? या सगळ्यांतला मुद्दा हा आहे की, बीसीसीआयला माजी खेळाडू आपल्या बाजूने हवे आहेत. सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी गुप्तपणे बीसीसीआयशी संदिग्ध कामाबद्दल कित्येक कोटींचे करार केले आहेत. करार पदरात पाडून ते समालोचक म्हणूनही काम करताहेत. याची वर्तमानपत्रांनी वाच्यता केल्यानंतर या दोघांनी तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखी काही स्पष्टीकरणं दिली, जी कोणालाच पटलेली नाहीत. रवी शास्त्री आज बीसीसीआयचा अनधिकृत, पण पगारी प्रवक्ता आहे आणि म्हणे तो ‘नि:पक्ष’ समालोचक आहे आणि आता तर टीमचा संचालकदेखील आहे. गंमत म्हणजे, हे नवे पद कालपर्यंत अस्तित्वातच नव्हते.
माझ्या मते, एकमेकांशी मेळ न साधणारी, स्पष्टीकरण करणारी बीसीसीआय ही एक विचित्र संस्था आहे. प्रभावी लोकांचा, पण अत्यंत छोटा गट इथे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून आहे. त्यात काही जण मुरलेले उद्योजक आहेत, काही राजकारणी आहेत, तर काही जण माजी खेळाडू आहेत. पण हा गट इतका छोटा आणि गुप्तता राखणारा का आहे? यामागचं एक कारण असं की, तो अनेक प्रकारच्या घोटाळ्यांत गुंतलेला आहे. स्पष्ट सांगायचं तर रंगारंग क्रिकेट पेश करणा-या ‘आयपीएल’चा संस्थापक फरार आहे. ‘आयसीसी’च्या चेअरमनचा जावई बेटिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. आयपीएल टीमचे अनेक प्रमुख मालक आणि इतर संदर्भातल्या आरोपाखाली चौकशीच्या फे-यात अडकलेले आहेत. काही क्रिकेटर्सना ‘मॅच फिक्सिंग’ करताना पकडले गेले आहे.
पण हे सारं कोण बोलून दाखवणार? अर्थात, कुणीही नाही. मी बीसीसीआयबद्दल तर प्रचंड साशंक आहे. जे म्हणे स्वत:लाच नियंत्रित करण्याचा म्हणजे स्वयंनियंत्रण असल्याचा दावा करतात आणि म्हणे खेळाचा दर्जा उंचावू पाहतात. खरे तर हे पैसे तयार करणारं मशीन आहे आणि सर्व राजकारण्यांना त्याच्यात आपापला हिस्सा हवा आहे. अगदी नरेंद्र मोदींनाही, जे गुजरात क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत.
बीसीसीआयचे नियमितता आणि पारदर्शकत्व याबद्दलचे रेकॉर्ड अगदीच खराब आहे. आयपीएलसारख्या पैसे देणा-या दुभत्या गाईबद्दल तर अगदीच वाईट परिस्थिती आहे. एका वर्तमानपत्राच्या बातमीत म्हटलं होतं, ‘महान खेळाडूंच्या या नव्या पॅनलला आयपीएलबद्दल वस्तुनिष्ठ मतं विचारली जातील, ही शक्यता अगदीच कमी आहे.’ असे असेल तर मग कशासाठी सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांना आमंत्रित करण्यात आले आहे? आणि द्रविडसारखा माणूस दूर का राहतो आहे? माझा अंदाज असा आहे की, बीसीसीआयमधल्या योग्य-अयोग्य व्यवहारांची इत्थंभूत माहिती असणारी वजनदार माणसं बोर्डाला आपल्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर असणे परवडणारे नाही. म्हणूनही सचिन-सौरव-लक्ष्मण त्यांना त्यांच्या तंबूत हवे आहेत. बीसीसीआय सीनियर किंवा ज्युनियर टीमचा दर्जा सुधारावा म्हणून हे करत नसून हा सारा स्वत:ची कातडी बचावण्याचा उद्वेगजनक खटाटोप आहे.
त्यांना क्रिकेटबद्दल खरोखर आस्था अन् पुरेपूर जाण असलेल्या माजी खेळाडूंनाच काम द्यायचे होते तर सय्यद किरमाणीसारखा क्रिकेटशी वादातीत निष्ठा असलेला माणूस आपल्याला हेतुपुरस्सर दूर का ठेवण्यात आले आहे , अशी तक्रार का करतो आहे? याचं कारण असं की, आज तो फारच कमी लोकांच्या स्मरणात आहे. शिवाय तेंडुलकरसारख्या माजी खेळाडूंच्या सडेतोड मतप्रदर्शनाला बीसीसीआय घाबरते आहे. क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार आणि वसुलीबाबत तो किंवा इतर खेळाडू बोलू लागले तर कित्येकांचा विचार करता हे सारंच नुकसान करणारं ठरेल. म्हणून सचिन तेंडुलकर बोर्डाला कळपात हवा आहे.
पण या कळपात येण्याला द्रविडने नकार दिला आहे. याचे कारण त्याला माहीत आहे की, हे काम दुसरे-तिसरे काही नसून बीसीसीआयचा बचाव करण्याचे तंत्र आहे. एकूणच बीसीसीआयच्या या सल्लागार समितीकडे या दृष्टिकोनातून बघायला हवं, परंतु या खेळाडूंचा इतिहास पाहता विश्वासार्हता निर्माण करण्याची सगळी जबाबदारी अखेर त्यांच्यावर येऊन पडली आहे.