आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On BJP After Delhi Assembly Elections Result By Abhilash Khandekar

गांधीनगर व दिल्लीमधील फरक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा रंगीबेरंगी मोठ्ठा फुगा एका छोट्या टाचणीने अचानक फाटकन फुटावा तसेच काहीसे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालांनी देशाला दाखवून दिले आहे. एक नवीन राजकीय चित्र ‘आप’च्या नेत्रदीपक व ऐतिहासिक विजयामुळे देशाला बघायला मिळणार आहे.

फक्त नऊ महिन्यांपूर्वी प्रचंड मताधिक्याने पहिल्यांदाच भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत (केंद्रात) सत्ता काबीज केली होती. त्यानंतरची मोदी व भाजपची देखणी घोडदौड अरविंद केजरीवालांची ‘केरसुणी’ अचानक थांबवेल, असे देशात अनेकांना वाटत नव्हते. त्याचे कारण, मागील मे महिन्यानंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीर अशा वेगवेगळ्या सामाजिक - राजकीय परिस्थिती व इतिहास असलेल्या भागातूनसुद्धा भाजपचा ध्वज उंचच उंच फडकत गेला. या सगळ्या यशाचे शिल्पकार गांधीनगरहून दिल्लीला आलेले गुजरातचे माजी व यशस्वी मुख्यमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी हेच होते. ‘अबकी बार मोदी सरकार’ हा नारा इतका अधिक लोकप्रिय झाला होता की, मोदी व भाजप दोघांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत असा भीषण पराभव होऊ शकेल, असे स्वप्नदेखील पडले नसावे. इथेच घात झाला.

गुजरातमध्ये सातत्याने निवडणूक जिंकणारे मोदी जेव्हा दिल्लीत स्थायिक होण्यास सज्ज झाले तेव्हा दिल्ली काय चीज आहे याबद्दल विशेष माहिती नसावी. त्यांना मे २०१४ मध्ये लोकप्रिय जनमताचा जो कौल मिळाला तो सर्वार्थाने सोनिया-मनमोहन सिंग यांच्या कॉँग्रेसला विटलेल्या, नाराज अशा भारतीयांचा कौल होता याचे बहुधा लवकरच विस्मरण झाले. प्रचंड भ्रष्टाचार, निर्णय न घेण्याची (अबोल) पंतप्रधानांची कार्यप्रणाली व गांधी कुटुंबशाही याला देश कंटाळला होता. हे समजूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने मिळून सर्व महत्त्वाच्या जुन्या नेत्यांना बाजूला सारून मोदींसारखा तडफदार नेता देशाला दिला. त्यांनी राज्ये जिंकूनही दाखवली. परदेशात भारताची मान ताठ झाली, हे दृश्यही निर्माण झालं. वेगळे, चांगले शासन देण्याच्या अनेकानेक घोषणासुद्धा केल्या गेल्या. सारा देश हे एखाद्या निरागस लहान मुलासारखा आशाळभूत नजरेने बघत राहिला. पाच वर्षांसाठी गांधीनगरहून दिल्लीत आलेल्या मोदींनी आम आदमीच्या आशा पराकोटीला नेऊन ठेवल्या. हे सगळं सुरू असताना एकदम ही नाचक्की कशी झाली? ७० जागांपैकी केवळ तीन जागा या प्रचंड लोकप्रिय पक्षाला मिळाव्यात! भाजपची लोकप्रियता एकदम धाडकन जमिनीवर का आदळून पडली?

नुकताच जन्म झालेली आम आदमी पार्टी व तिचा अननुभवी नेता अरविंद केजरीवाल यांना हे घवघवीत यश निश्चितच एका रात्रीत नाही मिळाले. दिल्लीत राहणा-या माझ्यासारख्या अनेक लोकांना हे दिसत होते की, मोदी -अमित शहा या जोडीने पक्षावर आपली पकड इतकी घट्ट केली की, मोठमोठ्ठाले नेते स्वत:ला असुरक्षित समजू लागले होते; अस्वस्थ झाले होते. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आधीच बाजूला फेकले गेले होते; परंतु नंतर दिल्लीतील स्थानिक नेत्यांनासुद्धा बाजूला सारण्यात आले. त्यातूनच किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून अचानक पुढे आल्या. स्वत: मोदींनी दिल्लीत पाच सभा घेतल्या व सरळसरळ केजरीवालांवर आरोप केले. नको ते बोलले. राजकीय प्रेक्षकांचे मत पडले की, पंतप्रधान स्वत:ला खूप खालच्या पातळीवर घेऊन गेले. त्यांची स्वत:बद्दल बोलण्याची सवय, विरोधकांवर सुमार दर्जाची टीका तसेच स्थानिक जाहिरातींची भाजपची आक्षेपार्ह भाषा पक्षाच्या अंगलट आली. एका जाहिरातीत तर केजरीवालांचे गोत्र काढण्यात आले होते. मोदीप्रणीत केंद्र सरकारने काहीच ठोस काम गेल्या नऊ महिन्यांत न करून दाखवल्याचा एक जनतेत संदेश गेला की, मोदी फक्त बोलतच राहतात आणि स्वत:वरच मुग्ध (नार्सिसिस्ट) असतात.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाच्या भारत यात्रेत त्यांना सारखं बराक, बराक म्हणून संबोधणे किंवा महागड्या कोटावर स्वत:चे नाव शिवून घेणे हे सगळं एक सामान्य, परंतु हुशार दिल्लीकर बघत होता. दुसरीकडे केजरीवाल व त्यांची तरुण टीम शांतपणे, खोलात जाऊन व्यूहरचना आखत होती. लोकांना खेचून घेत होती. वर्ष २०१३ मधील केजरीवाल व २०१५ मधील केजरीवाल यामध्ये खूप अंतर पाहायला मिळाले. अरविंद एक निगर्वी, समजूतदार, विनम्र असा नेता देशाच्या समोर आला, ज्यास खरंच भ्रष्टाचाराची चीड आहे व वेगळ्या प्रकारचे सुराज्य देण्याची खरी इच्छा!

भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेवटी - शेवटी माझ्याजवळ हे कबूल केले की, पक्षाचे मोठे नेते स्थानिक नेत्यांवर अविश्वास दाखवत होते. काही निवडक केंद्रीय मंत्र्यांना व गुजरात, मध्य प्रदेशातील नेत्यांना दिल्लीत प्रचारासाठी त्यांनी जुंपले होते. किरण बेदींना मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करण्याची बातमी दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांना दुस-याच कोणी तरी सांगितली. कारण तो निर्णय वरच्या वर घेण्यात आला होता. दिल्लीतील नोकरशहा, गरीब जनता, पोलिसवाले व व्यापारी सर्वांनाच किरण बेदी नको होत्या. त्या स्वत: भाजपच्या खिशातील कृष्णानगर जागेवरून पराभूत झाल्याने त्यांची जनतेच्या मनात कशी प्रतिमा होती ती स्पष्ट झाली. अर्थात त्यांच्या पराजयात भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचेही योगदान होतेच! दिल्लीत ही लढत होती ती सर्वसाधारण लोकांचा नेता अरविंद केजरीवाल विरुद्ध एक जुना ‘चहा विक्रेता’ जो लाखो रुपयांचा सूट घालतो - मिरवतो, अशा मोदींमध्ये झाली. मोदी हिंदूवादी नेते आहेत, विकासासाठी नेहमीच नवीन विचारांना प्राधान्य देतात व ‘सबका साथ, सबका विकास’ अशा घोषणा देऊन देशाला प्रगतिपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे, याबद्दल कोणालाच संशय नाही. तरीही, भाजपला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. या निकालानंतर जर प्रतिमा बदलली तर ती पक्षाला तो पल्ला गाठायला चांगली मदत करेल हेही तेवढंच खरं!

(लेखक दैनिक भास्कर समूहाचे राष्ट्रीय राजकीय संपादक आहेत.)
abhilash@dbcorp.in