आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On BJP Politics By Rajendra Sathe, Divya Marathi

भाजपच्या चुका नव्हे, गुन्हे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजनाथसिंह यांची तारीफच करायला हवी. भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर भाजप माफी मागायला तयार आहे असे मुसलमानांना थेटपणे त्यांनी सांगून टाकले. तारीफ अशासाठी की, पहिल्यांदा काँग्रेसने त्यांच्या कुठल्या-कुठल्या चुकांबद्दल माफी मागावी, मग आम्ही मागू असे ते म्हणाले नाहीत. नाहीतर, सध्या राजकीय पक्षांना त्यांच्या चुका, गफलती, दोष, उणिवा, गुन्हे याबद्दल काही सांगायला जावे तर ते प्रतिस्पर्ध्याने काय केले हे आधी ऐकवतात. आधी समोरच्यांकडून माफी आणा वा त्यांना शिक्षा करा असे ते जनतेला सुनावतात.


राजनाथ मुसलमानांच्या मेळाव्यात बोलत होते. भाजपला 272 हून अधिक जागा मिळवून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यात मुसलमानांची भूमिका अशा नावाने हा मेळावा भरवण्यात आला होता. एबीपी-नेल्सनचे नुकतेच जे सर्वेक्षण आले आहे त्यात भाजपला 217 जागा मिळतील असे म्हटले आहे. म्हणजेच 272 साठी ज्या काही जागा कमी पडताहेत त्यासाठी मुसलमान उपयोगी पडतील असा हिशेब दिसतो.


भूतकाळात भाजपच्या नेमक्या काय चुका झाल्या हे राजनाथ यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांची माफी हीदेखील काल्पनिकच आहे. तरीही चर्चेसाठी असे गृहीत धरू की, राजनाथ यांच्या मनात अयोध्याकांड आणि 2002 ची गुजरात दंगल या दोन घटना असाव्यात. भाजपच्या मुस्लिमविरोधी राजकारणातले हे दोन ठळक टप्पे आहेत. मुद्दा असा आहे की, या दोन प्रकारांना निव्वळ चुका या सदरात टाकता येईल काय?


अयोध्येतील अमुक मशीद पाडून त्या जागीच रामाचे मंदिर व्हायला हवे ही काही या देशातील हिंदू श्रद्धाळूंची निरागस धारणा नव्हती. तो विश्व हिंदू परिषद आणि भाजपवाल्यांचा राजकीय कार्यक्रम होता. बाबराने समजा राममंदिराच्या जागी मशीद बांधली असेल तर देशातल्या सध्या हयात मुसलमानांनी त्या कथित पापाची जबाबदारी वाहिली पाहिजे ही या देशातील सामान्य लोकांची भावना नव्हती. तो भाजपचा राजकीय अजेंडा होता. भाजपच्या या कार्यक्रमामुळे देशात अनेक दंगे, बाँबस्फोट आणि कत्तलींना निमित्त मिळाले.


2002 ची गुजरात दंगल हाही याच कार्यक्रमाचा परिपाक होता. साबरमती एक्स्प्रेसमध्ये अयोध्येतून परतणारे कारसेवक होते. गोध्रा इथे त्यांनाच जाळण्याचा प्रयत्न झाला अशी पार्श्वभूमी तयार झाली. त्यानंतर राज्यभर दंगल उसळली. मुसलमानांना धडा शिकवा असे वातावरण निर्माण झाले. बाबू बजरंगी किंवा माया कोदनानी यांच्यासारखे मोठे नेते चिथावणी देत हिंडत होते हे तर आता सिद्ध झाले आहे. पण पडद्याआडून मिळालेली चिथावणीही काही कमी नव्हती. क्रिया झाली की प्रतिक्रिया उमटणारच असे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. नंतर खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांना राजधर्माची आठवण करून द्यावी लागली.


चुका अजाणता घडतात. जाणूनबुजून केलेल्या चुकांना गुन्हे असे म्हणतात. अयोध्या किंवा गुजरात या चुका नव्हत्या. ते गुन्हे होते. भाजपने जाणूनबुजून, हेतूत: ते केले होते. त्यांचा परिणाम म्हणजे समाजातले वातावरण अत्यंत गढूळ झाले. फाळणीच्या वेळी झाली असेल अशाच प्रकारची दरी हिंदू-मुसलमानांमध्ये निर्माण झाली.
आज नरेंद्र मोदी हे विकासाची भाषा बोलत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण 1990 च्या दशकात भाजपवाले फक्त आणि फक्त राममंदिराची भाषा बोलत होते. कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की त्यावेळी विश्व हिंदू परिषदवाले कोणता ना कोणता यज्ञ सुरू करीत. अयोध्येत एखादी कारसेवा सुरू होई. त्याला विरोध झाला तर पुन्हा तणाव निर्माण होई. दंगे घडत. त्याचा सूड म्हणून पाकिस्तानी दहशतवादी गट इथे स्फोट घडवत. आज हे सर्व थांबले आहे. हे चांगलेच आहे. पण याचाच दुसरा अर्थ असा की, ते यज्ञ, कारसेवा आणि रामाचे मंदिर होणे हाच एकमेव प्रश्न असल्याची हिंदू समाजाची तथाकथित भावना इत्यादी गोष्टी म्हणजे समाजाच्या स्वाभाविक प्रतिक्रिया नव्हत्या, तर भाजपने जाणीवपूर्वक आखलेला तो सर्व कार्यक्रम होता. जनतेच्या जिवावर उठणारे असे राजकीय कार्यक्रम जाणीवपूर्वक आखणे या चुका नसतात, ते गुन्हेच ठरतात आणि ते कबूल असतील तर त्यांची कायदेशीर शिक्षा घेण्याची नम्र तयारी लागते.


भाजपला खरा पश्चात्ताप व्यक्त करायचा असेल तर तो या सर्व तयारीसकट हवा. आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेत तर यासाठी अनेक दाखले आहेत. आपल्या भूतकाळाबद्दल लाज वाटली म्हणून लगेच वाल्या कोळ्याचे सर्व अपराध धुतले गेले नाहीत. त्यासाठी त्याला तप करावे लागले. भाजपलादेखील, मुस्लिम हे या देशाचे सन्माननीय नागरिक आहेत हे मनापासून मान्य करावे लागेल. याची एक साधी कसोटी म्हणजे हिंदूंचे हिंदू म्हणून संघटन करण्याची भाषा बंद करावी लागेल. इत्तेहादुल मुसलमिन किंवा अबू आझमीसारख्या माथेफिरू भाषा करणा-या मुसलमानांनी तसे केले तरीही त्याचा प्रतिवाद संसदीय राजकारण आणि कायदेशीर मार्गानेच करण्याची भूमिका ठेवावी लागेल. भाजपला हे जमणारे आहे काय?


मुसलमान हा एक वेगळा गट मानून काँग्रेस आपले राजकारण करते, त्यांना सोईसवलती देते आणि त्यांची एकगठ्ठा मते मिळवते असा भाजपचा आजवरचा आरोप होता. यालाच ते स्यूडो सेक्युलर म्हणून हिणवत. याउलट आपणच खरे सेक्युलर असून आपण सर्व भारतीयांना एकसमान मानतो असा भाजपचा दावा होता. आज मात्र तो पक्ष मुसलमानांची माफी मागू पाहत आहे. म्हणजे भाजप नावाच्या हिंदू संघटनेने भारत देशातल्या मुस्लिम नागरिकांना विषम वागवले आणि माफी मागायला लागावी अशी कृत्ये त्यांच्यासोबत केली हे राजनाथ आणि भाजपच्या बाकीच्या नेत्यांना आता मान्य आहे असे समजायचे काय?


मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे म्हणून आज राजनाथ त्यांच्यापुढे आम्ही झुकायला तयार आहोत असे म्हणत आहेत. पण मग ते ख्रिश्चनांचे काय करणार? भाजपची भ्रातृसंघटना असलेल्या बजरंग दलाने गुजरातेत चर्चवर हल्ले केले होते किंवा ओडिशात तर डेल स्टेन यांना जाळून मारले होते. आपल्या राजकारणाचाच हा अप्रत्यक्ष परिणाम होता असे राजनाथ मानतात की नाही हेही या निमित्ताने कळले पाहिजे. किंबहुना, राजनाथ यांनी मुसलमानांचीच केवळ माफी मागणे हे योग्य नाही. प्रत्यक्षात त्यांनी सर्व भारतीयांची माफी मागायला हवी. कारण त्यांच्या राजकारणापायी गेल्या पंचवीस वर्षांत देशात अनेकदा हिंसक यादवीचे वा दूषित वातावरण निर्माण झाले. त्याचा देशाच्या प्रगतीवरही विपरीत परिणाम झाला. हे योग्य नव्हते आणि हे यापुढे होणार नाही असे राजनाथ यांनी म्हणायला हवे. पण राजनाथ आणि त्यांचा पक्ष खरोखरच इतक्या गांभीर्याने आपल्या चुकांची वा गुन्ह्यांची कबुली देणे शक्य आहे काय? याचे उत्तर हो असेल तर स्वागत आहे. पण नाही असे असले तर त्यांना ते का शक्य नाही याचा विचार ज्याने त्याने करावा.