आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंगचा बाजारी हीरो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून मेवेदर आणि पाकिआओ.
‘पुरुष खोटं बोलतात, तसंच बायकाही. पण असत्य बोलू शकत नसते ती आकडेवारी!’ ही दर्पोक्ती होती वेल्टरवेट गटातील एका ‘जगज्जेत्या’ बॉक्सर फ्लॉइड मेवेदरची. फिलिपाइन्सच्या मॅनी पाकिआओचं आव्हान परतावून लावणा-या मेवेदरची.

पण मेवेदरची होती ही दर्पोक्ती, गर्वोक्ती की स्पष्टोक्ती? आपलं नाणं खणखणीत आहे, आपण आजवर ४८ पैकी ४८ लढती जिंकलेल्या आहेत, पाकिआओविरुद्धही तीनपैकी तीनही पंचांनी आपल्यालाच विजयी ठरवलेलं आहे. तरीही आपल्यात उणंदुणं शोधणा-यांनी उणिवा शोधत राहाव्यात; पण आजवरची शंभर टक्के यशस्वी कारकीर्द, टीकाकारांना चपराक लगावेल, अशीच त्याची गर्वोक्ती-स्पष्टोक्ती.

बचावावर आधारित प्रतिहल्ले हे मेवेदरचे तंत्र जाणकारांच्या अंगवळणी पडलेलं आहे. मेवेदरचं वर्चस्व अधोरेखित करणारी आणि सतत सत्यच बोलत राहणारी या लढतीची आकडेवारी बघा. बारा फे-यांच्या या लढतीत मेवेदरने लगावले ४३५ ठोसे, तर पाकिआओने ४२९. पण त्यापैकी आघात करणारे ठोसे मेवेदरचे १४८, तर पाकिआओचे केवळ ८१. हलके ठोसे (जॅब) मेवेदरचे २५७, तर पाकिआओचे १९३, पण त्यातही आघात करणे जॅब, मेवेदरचे ६७, पण पाकिआओचे केवळ १९. जोरदार ठोसे (पॉवर पंच) यांची आकडेवारीही अशीच. मेवेदरच्या १६८ पैकी ८१ जोरदार ठोसे आघात करून गेलेले, तर पाकिआओचे २३६ पैकी फक्त ६३! लढत जास्तीत जास्त तीन-तीन मिनिटांच्या बारा फे-यांची. दोन फे-यांमध्ये मिनिटभर विश्रांती. ४७ मिनिटांच्या या लढतीचा ढाचा हा असाच होता. वरवर पाहता मेवेदर मागे मागे सरकत होता. मागे-पुढे जात वाहणा-या दोघा बॉक्सर्सचं पदलालित्य, फुटवर्क डोळ्यांना सुखावणारं होतं; पण दोघंही एकसाथ आक्रमक होत असल्याचे क्षण मोजके होते. त्यामुळे फटाके फुटत नव्हते. आतषबाजी होत नव्हती. ‘शतकातील सर्वोत्तम लढत’ या हाइपचा, या जाहिरातबाजीचा खोटारडेपणा स्पष्ट होत होता. लढतीतील अपुरेपणाचं एक कारण मागाहून उघडकीस आलं. या झुंजीआधीच पाकिआओचा उजवा खांदा बराच दुखावला होता. ही दुखापत त्याला मेवेदरपासून लपवून ठेवावीशी वाटली, हे समजू शकतं; पण डोपिंगविरोधी संस्थेकडे (अमेरिकी अँटी डोपिंग एजन्सी) त्याला ही दुखापत उघड करावी लागलीच होती; पण संयोजक-ठेकेदारांना शेवटच्या क्षणी त्या दुखापतीची कल्पना त्यानं दिली. त्यामुळे त्या दुखापतीवर इंजेक्शन आदी उपचार करून घेण्याची परवानगी त्याला मिळाली नाही. आता लाखो लोकांची व्यथा अशी की आम्ही शंभर डॉलर्सपासून पस्तीत हजार डॉलर्सची तिकिटं काढली, पण आमची फसगत झाली. आम्ही आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावू!

मुहूर्त लागत नव्हता!
हे युग अनिर्बंध मार्केटिंगचं. माल खपवण्याचं. त्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता केलेल्या जाहिरातबाजीचं. ही लढत म्हणे जगज्जेतेपदाची; पण तिचा मुहूर्त गेली पाच वर्षे लागत नव्हता! प्रथमत: सामन्याआधी केव्हाही, कधीही डोपिंगची उत्तेजके घेतल्याबद्दलची तपासणी करून घेण्यास पाकिआओ तयार नव्हता... मग आपल्या तीन मुलांच्या आईला मारहाण करण्याबद्दल मेवेदरला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला. बायको, मुलं, शरीरसंरक्षक यांना शिवीगाळ, मारहाण करण्याबद्दल त्याला शिक्षा होत राहिल्या. कुस्ती, ऑलिम्पिक, बॉक्सिंग, ज्युदो, तायक्वांदोपासून टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश, समशेरबाजी अशा कोणत्याही खेळात असली नाटकं होतात का?

आणखी एक भयानक प्रकार : व्यावसायिकांच्या बॉक्सिंगमध्ये आहेच. चार संघटना, चार मठ (असे कराटेतही आहेत). यापैकी वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिल व वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशन या संघटनांचा वेल्टरवेट ‘जगज्जेता’ मेवेदर! वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशन या तिस-याच मठाचा ‘जगज्जेता’ मठाधिपती पाकिआओ! आणि या दोघा बड्यांना प्रकाशझोतात ठेवणा-या मार्केटिंग यंत्रणेनं उपेक्षित ठेवलेला चौथा ‘जगज्जेता’ म्हणजे इंटरनॅशनल बॉक्सिंग फेडरेशनचा एक्का इंग्लंडचा केली ब्रुक! वेल्टरवेट म्हणजे १४० ते २४७ पौंड या एकच एका वजनी गटात पण एकाच वेळी चक्क चार जगज्जेते! दिवसाढवळ्या वर्षानुवर्षे महासत्ता अमेरिकेतील मार्केटिंगची जबरदस्त यंत्रणा हा डोलारा जोपासत राहिलेली आहे. अमेरिका आहे मोठं विलक्षण मिश्रण. बॉब वुडवर्ड व कार्ल बर्नस्टिन यांच्या व्यासंगी शोधपत्रकारितेमुळे ‘वॉटरगेट’ घडलं व रिचर्ड निक्सन यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं! पण त्याचबरोबर याच अमेरिकेत चाळीस कोटी डॉलर्सचा (सुमारे पंचवीसशे कोटी रुपयांचा) हा जगज्जेतेपदाचा विकृत फड प्रचंड गाजावाजा करून भोळ्याभाबड्या व चंगळवादी दुनियेसमोर दिमाखात मिरवला जात आहे.

फुटबॉलमधील सम्राट रोनाल्डो याची गतसालातील मिळकत आठ कोटी डॉलर्स (सुमारे ५०५ कोटी रु.), तर मेवेदरची साडेदहा कोटी डॉलर्स- ६६५ कोटी रु.! आज त्याची मालमत्ता २८ कोटी डॉलर्स वा सुमारे सोळाशे कोटी रुपये! शतकातील सर्वोत्तम लढतीच्या फडातील दुसरा भिडू पाकिआओ हाही मालमत्तादार, मेवेदरच्या जवळपास निम्म्यावर पोहोचलेला! पैसा हेच क्रीडा कौशल्याचं व चारित्र्याचं प्रमुख मोजमाप मानणा-या सामाजिक व्यवस्थेत व मानसिकतेत मेवेदरच अतुलनीय व ‘शतकातील सर्वोत्तम लढतीस’ सत्पात्र! शुगर रे रॉबिन्सन व रॉकी मार्सियानो यांच्यापासून ते महंमद अली ऊर्फ कॅशस क्ले व क्युबाचा टिओफिलो स्टीव्हन्सन ही बॉक्सिंगच्या दुनियेतील असली दैवतं. ऑलिम्पिकमध्ये सुपर हेविवेट वजनी गटात सुवर्णपदकांची हॅट््ट्रिक रचणारा टिओफिलो स्टीव्हन्सन होता रुबाबदार, देखणा, तगडा अन् सव्वासहा फुटांपेक्षा उंच. अमेरिकेतील भांडवली ठेकेदार त्याच्या मागे लागले. त्याला वीस-पंचवीस लाख डॉलर्सची ऑफर देऊ लागले. वीस-तीस लाख डॉलर्स १९७२ चे अन् त्याचे आजचे मूल्य भरमसाट ठरेल, पण देशभक्त स्टीव्हन्सन म्हणाला, ‘तुम्ही माणसाकडे एक वस्तू, उपयुक्त वस्तू म्हणून बघता. त्या वस्तूला म्हणजे त्या माणसाला वापरावं व उपयोग कमी झाल्यावर फेकावं, हा तुमचा खेळ! मी माझ्या क्युबात, डॉ. फिडेल कॅस्ट्रो यांच्या क्रांतीच्या प्रयत्नात साथ देत राहीन.’ शतकातील सर्वोत्तम लढत ही शतकातील सर्वोत्तम खेळाडूंतच होऊ शकते. बाजारी प्रवृत्तीचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा मेवेदर बॉक्सिंगच्या तंत्रात कुशल आहे. बस्स, तेवढंच! भांडवल तेवढंच! त्याची महती तेवढीच!