आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगग्रस्तांची स्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजही जे अतिशय दुर्धर आजार मानले जातात, त्यामध्ये कर्करोगाचा प्रामुख्याने समावेश होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. विकसित देशांत कर्करोगावरील अद्ययावत उपचारांच्या सोयी तुलनेने अधिक प्रमाणात आहेत. परिणामी कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्या रुग्णावर अद्ययावत उपचार करून जीवनमान वाढविण्याचे प्रमाण विकसित देशांतच जास्त आहे.
कर्करोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास उपचारांनी तो रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याची उदाहरणेही आहेत. कर्करोगाच्या दहा प्रकारांतले रुग्ण जगभरात सर्वाधिक संख्येने आढळतात. त्यापैकी ६७ देशांतील २६ दशलक्ष रुग्णांचा १९९५ ते २००९ या पंधरा वर्षांच्या कालावधीत डॉक्टरांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने सखोल अभ्यास केला. त्या अभ्यासाचे निष्कर्ष `लॅन्सेट' या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकामध्ये नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार कर्करोगाचे निदान झाल्यानंतरच्या पाच वर्षांपर्यंत हयात असलेल्या रुग्णांचे प्रमाण विकसित देशांपेक्षा भारतामध्ये निम्म्याहून कमी आहे. यकृताचा कर्करोग झालेल्या रुग्णांचे आजार निदान व उपचार सुरू झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षांपर्यंत जे हयात राहिले अशांचे प्रमाण विकसित देशांमध्ये १० ते २० टक्के इतके आहे. मात्र तेच प्रमाण भारतात फक्त चार टक्के इतके आहे. अशीच परिस्थिती कर्करोगाच्या इतर प्रकारांच्या रुग्णांबाबतही आहे. प्रारंभिक अवस्थेतच कर्करोगाचे निदान होणे व लगेच त्यावर अद्ययावत वैद्यकीय उपचार सुरू होण्यासाठीच्या सुविधा भारतातील ग्रामीण, निमशहरी तसेच शहरी भागातही अजून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. उशिरा निदान झाल्याने कर्करोगाने गंभीर स्वरूप धारण केल्याने तो रुग्ण उपचार घेऊनही बरा होण्याची शक्यता मंदावते.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारांमध्ये राखावे लागणा-या सातत्यात भारतातील जे रुग्ण अनियमितता दाखवितात, त्यांचे उपचारांनंतरही आयुष्यमान कमी उरते. कर्करोग व त्याच्यावरील उपचारांबद्दल भारतातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती आवश्यक आहे. कर्करोगावरील उपचारांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे राखणे हे जसे सरकारचे कर्तव्य आहे, तसेच स्वत:ची काही विशिष्ट काळानंतर वैद्यकीय तपासणी करून घेण्याची सवय भारतीयांनी लावून घ्यायला हवी, असेही `लॅन्सेट'मधील या लेखात म्हटले आहे.